computer

'बेगुनाह'-या चित्रपटाची रिळे नष्ट करण्याचा हुकूम कोर्टाने का दिला ?

एखाद्या चित्रपटाची रिळं कायमची नष्ट करण्याच्या घटना फारच कमी वेळा घडल्या आहेत. आणीबाणीच्या काळात 'किस्सा कुर्सीका' या चित्रपटाची रिळं सरकारी आदेशाने  जाळून नष्ट करण्यात आली होती पण तो किस्सा वेगळाच आणि आजची कहाणी तर वेगळीच आहे.वेगळेपणा असा आहे की किशोरकुमारच्या 'बेगुनाह' चित्रपटाची सरकारच्या नाही तर कोर्टाच्या आदेशाने विल्हेवाट लावण्यात आली होती. 
१९५७ साली 'बेगुनाह' चित्रपटगृहात झळकला. दहा दिवस व्यवस्थित चाललाही पण त्यानंतर कोर्टाचा आदेश आला की या चित्रपटावर बंदी असून , चित्रपटाची रिळे कायमची नष्ट करण्यात यावीत. कोर्टाने असा सनसनाटी आदेश देण्याचं कारण काय होतं ? चित्रपट देशाच्या विरोधात होता ? धार्मिक तेढ वाढवणारा होता ? राजकारणाचा विपर्यास करणारा होता ? यापैकी कोणतंही कारण या आदेशामागे नव्हतं.

हा चित्रपट संपवण्याचं एकच कारण होतं ते म्हणजे हा चित्रपट म्हणजे ' चोरीचा मामला' होता. आजकालच्या भाषेत ज्याला Rip Off म्हणतात तसा हा प्रकार होता. 
त्याचं झालं असं की १९५४ साली हॉलीवूड्मध्ये Knock on Wood  नावाचा चित्रपट आला. या चित्रपटाची थोडक्यात कहाणी होती ती अशी ! या चित्रपटाचा नायक वेन्ट्रिलक्विस्ट असतो. वेन्ट्रिलक्विस्ट म्हणजे  बोलणार्‍या कठपुतळ्यांचा शो करणारा कलाकार ! हा कलाकार प्रेमात पडतो एका मुलीच्या आणि त्याचा राग येतो त्याच्या कठपुतळीला . इथून ही कहाणी सुरु होते आणि पुढे धमाल रंगत जाते.
 त्यानंतर आला बॉलीवूडचा 'बेगुनाह' चित्रपट - या चित्रपटाचा नायक होता किशोर कुमार- संगीत होतं शंकर जयकिशन यांचं - गाणी लिहिली होती शैलेंद्र यांनी आणि मुख्य गायक होते मुकेश !  थोडक्यात अगदी सुपर हीट व्हावा असा संच होता. पण हा चित्रपट अनुपचंद शहा आणि महिपती शाह या बॉलीवूडच्या निर्मात्यांनी Knock on Wood ची कॉपी मारून बनवला होता. 
बेगुनाह म्हणजे Knock on Wood आपल्या चित्रपटाची कॉपी असल्याची  खबर पॅरामाऊंट पिक्चर्स या अमेरिकन कंपनीला लागली आणि ते कोर्टात पोहचले. पॅरामाऊंट पिक्चर्सने कॉपीराइट्स कायद्याचा भंग झाल्याचे  सर्व पुरावे कोर्टात आणले. ते तपासल्यावर कोर्टाने 'बेगुनाह' चित्रपट कायमचा नाहीसा करण्याचा आदेश दिला. बॉलीवूडच्या इतिहासात असा खटला आणि आदेश फारच क्वचित घडलेला दिसेल.
 

आता हा जुनापुराणा किस्सा सांगण्याचा बोभाटाचा काय उद्देश आहे असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेलच ! तर आमच्या वाचकांना कॉपीराईट्स कायद्याची ताकद आणि हक्कभंगाचे परिणाम या विषयी जागृत करणे हाच उद्देश या लेखामागे आहे. दिवसेंदिवस 'कंटेंट' या क्षेत्रात मागणी ज्या प्रमाणात वाढते आहे  ती बघता'क्रिएटीव्हिटी'ची चोरी होण्याचे प्रमाणही वाढत जाणार आहे. तुम्ही लेखक -कवी - संगीत दिग्दर्शक असाल तर वेळीच सावध व्हा आणि आपल्या कलाकृतींची नोंद कॉपीराईट्सच्या कायद्यानुसार करून घ्या ! 
(हा लेख बोभाटाच्या क्रेडिटसह मित्रांसोबत शेअर करण्यास आमची काहीच हरकत नाही -आम्ही कॉपीराईट्सचा दावा करणार नाही)

सबस्क्राईब करा

* indicates required