computer

ऑनलाईन खरेदीचा नवीन फंडा - ONDC!!!

आता काही दिवसात दिवाळी येतेय. दिवाळीत सगळ्यात मोठी आणि आनंदाची गोष्ट म्हणजे खरेदी. हल्ली प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे आणि कोणतीही गोष्ट त्यावरून अगदी सहज ऑर्डर करता येते. याचं पूर्ण श्रेय जात ते म्हणजे डिजिटल कॉमर्स या संकल्पनेला. 
'द ग्रेट इंडियन फेस्टिवल' किंवा बिग बिलियन डेज' हे शब्द ज्यांनी ऐकले नाहीत असा माणूस विरळाचं म्हणायचा.तर अगदी खाण्याच्या अ‍ॅपल पासून अ‍ॅपल फोन पर्यंत सर्व काही या ॲप वरून आपण मागवू शकतो. आपल्याला ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, स्विग्गी, झोमॅटो, ओला, उबर हे ॲप नवीन नाहीत.पण ऑनलाईन खरेदी म्हणलं की अजून बाकीचे बरेच ॲप असताना सुद्धा आपल्याला ही मोजकीच नावे का बरे आठवतात कधी विचार केलाय का? 
हाच खूप महत्वाचा आणि दूरदर्शी विचार करून भारत सरकार ने डिसेंबर 2021 मध्ये एका नवीन संकल्पनेची घोषणा केली ONDC  (Open Network for Digital Commerce.)
ONDC हा भारत सरकारचीचे एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. ज्यामुळे सर्व प्रकारच्या विक्रेते आणि खरेदी करण्याऱ्यास फायदा होणार आहे.

ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण आधी ऍमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या कशा कार्य करतात ते समजून घेऊया.

ऍमेझॉन असो वा फ्लिपकार्ट अथवा अन्य कोणत्याही ॲप असेल ह्या कंपन्या दोन प्रकारे काम करतात.

1. मार्केट प्लेस मॉडेल.
2. इन्व्हेंटरी मॉडेल.

मार्केट प्लेस मॉडेल मध्ये  विक्रेत्याकडून माल घेऊन थेट खरेदी करणाऱ्यास दिला जातो, यामध्ये संपूर्ण काम जसे की माल घेणे तो पोहचवणे तसेच इतर तांत्रिक गोष्टी आणि पेमेंट हे सर्व ऍमेझॉन पाहते. त्यामुळे त्यासाठी ते विक्रत्या कडून मोठ्या प्रमाणात कमिशन घेते. त्यामुळे अगदी छोट्या विक्रेत्यांना याचा फटका बसतो. 

दुसरे म्हणजे इन्व्हेंटरी मॉडेल यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर समजा की एक शर्ट तयार करणारी कंपनी आहे त्यांच्या कडून ऍमेझॉन मोठ्या प्रमाणात माल अगदी कमी दरात विकत घेते व आपल्या गोडाऊन मध्ये साठवून ठेवते.  मागणीप्रमाणे ग्राहकापर्यंत पोहचवते. या मॉडेल मध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात मार्जिन मिळते. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात सुट (discount) देतात जो 'ऑफलाईन मार्केट' किंवा इतर कोणत्याही ठिकाणी मिळणाऱ्या डिस्काउंट पेक्षा जास्त असतो. साहजिक लोक त्यांच्याकडून ऑर्डर करणे पसंत करतात आणि अर्थातच इतर विकेत्यांचा तोटा होतो.यालाच deep discounting असेही म्हणतात.

तर या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर असे दिसून येते की या डिजिटल कॉमर्स च्या विश्वात काही मोजक्याच कंपनींचे वर्चस्व निर्माण झाले आहे.  आणि हेच वर्चस्व कमी करून सर्व विक्रेत्यांना समान संधी मिळावी यासाठी भारत सरकारने ONDC ही संकल्पना राबवायचे ठरवले. इन्फोसिसचे सह संस्थापक नंदन नीलकणी जे आधार क्रमांक योजनेचे भाग होते यांच्या मास्टरमाईंड मधून  ONDC संकल्पना साकारलेली आहे.
यामध्ये अगदी लहानात लहान व्यापारी सुद्धा नाव नोंदवू शकतात ज्यामुळे कोणा एका मोठ्या नावाची मक्तेदारी राहणार नाही. 
यावरून सर्व प्रकारची खरेदी किंवा बुकिंग करता येईल. अगदी खाद्यपदार्थ, किराणा सामान, मोबाईल फोन, कपडे, तसेंच ओला, उबर मधून करता येणारे टॅक्सी सुद्धा यावरून बुक करता येईल. सर्व प्रकारचे विक्रेते इथे असल्याने ग्राहकाला एकाच ठिकाणी कमीतकमी दरामध्ये चांगला माल खरेदी करण्यास मदत होईल.
ONDC सध्या पेटीएम, पिनकोड, माय स्टोअर, क्राफ्ट्सव्हिला या काही ॲप मध्ये वापरता येऊ शकते. या मार्केटची ही सुरुवात असल्या कारणाने अजूनही त्यांच्या समोर खूप मोठी आव्हाने आहेत. पण भारतामध्ये ऑनलाईन पेमेंट ज्या जगतात UPI ने जी क्रांती घडवली तशीच  क्रांती ONDC डिजिटल कॉमर्स च्या जगात घडवेल की नाही हे येणारा काळच ठरवेल. 
तुम्हाला या उपक्रमात भाग घ्यायचा असेल तर https://ondc.org/ या संकेतस्थळाला भेट द्या आणि सुरु करा खरेदी-विक्रीला !

- मोनाली कुलकर्णी.

सबस्क्राईब करा

* indicates required