हजाराची खोटी नोट ओळखण्याच्या दहा खुणा

एखादी हजाराची किंवा पाचशेची नोट हातात आली की उजेडात धरून खरी की खोटी ओळखण्याचा खटाटोप लगेच चालू होतो. चुकून खोटी नोट पदरी आली तर मोठं नुकसान होऊ शकतं.  म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत खोटी नोट ओळखण्याचे सोपे मार्ग...

१. गांधीजी आणि १०००चा आकडा- नोट उजेडात धरली असता १ या क्रमांकाने दाखवलेल्या  जागेत महात्मा गांधींचे लपलेले चित्र  आणि १००० हा आकडा दिसतो. 

२. काळा उठावदार छोटा उभा चौकोन- अंधांना नोटा ओळखू याव्यात म्हणून नोटेवर डाव्या बाजूला असलेल्या या काळ्या चौकोनावरून हात फिरवला की त्याचा उठावदारपणा बोटांना जाणवतो. 

३. सुरक्षा धागा-  सुरक्षा धाग्यावर RBI, 'भारत’ आणि १००० लिहिलेले दिसते. वेगवेगळ्या कोनांतून हा धागा पाहिला असता त्याचा रंग हिरवा आणि निळा असा बदलतो. 

४. रंग बदलणारी शाई-नोटेच्या मधोमध असलेला १००० या आकड्याची शाई मोठी गंमतीदार आहे. नोट आडवी धरली की तो अंक हिरवा दिसतो, तर थोडी तिरकी केली की निळा. 

५. लपलेलं चित्र- गांधीजींच्या शेजारी , एकदम उजव्या बाजूला पण नोटेच्या  उभ्या मध्यभागी गुलाबी आडव्या रेषा आहेत. नोट डोळ्यांच्या पातळीवर आणून तिथे पाहिलं असता १००० हा लपलेला अंक दिसून येतो. 

६. उठावदार अक्षरे- महात्मा गांधींचे चित्र, RBI चे सील आणि ’एक हजार रूपिए’ हे सगळं उठाव असलेल्या शाईने छापलं आहे. बोट तिथून फिरवल्यास या सार्‍या गोष्टींचा उठावदारपणा लक्षात येतो. 

७. एकमेकांत मिसळून जाणारी फुले-  या क्रमांकाने दाखवलेल्या ठिकाणी पुढे आणि मागच्या बाजूस फुलांचे डिझाईन छापले आहे. उजेडात धरले असता ती फुले एकमेकांत मिसळून एकसंध चित्रच दिसून येते. 

८. प्रिंटिगचे वर्ष- नोटेच्या मागच्या बाजूस नोट छापल्याचे वर्ष  असायला हवे. 

९. सूक्ष्म आकडे- महात्मा  गांधी आणि शेजारची गुलाबी उभी पट्टी या भागात गांधीजींच्या वरच्या बाजूस अतिशय बारीक अक्षरांत RBI आणि १००० या दोन गोष्टी छापलेल्या दिसतात. 

१०. नोटेचा आकार- प्रत्येक नोटेचा ठराविक असा एक आकार असतो. हजाराच्या नोटेचा ठरवून दिलेला आकार ७३ मिलीमीटर X १७७ मिलीमीटर असा आहे.

 

वरच्या  यादीतल्या काही गोष्टी १०००च्या नोटेसंबंधी असल्या तरी बर्‍याचशा गोष्टी इतर नोटांनाही लागू पडतात. काढा मग पाकिटातल्या नोटा, आणि स्वत:च खात्री करून घ्या नोटांच्या अस्सलतेची. 

 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required