computer

भारतीय सेलिब्रिटीज आणि त्यांची भांडणं....यातलं कोणतं भांडण तुम्हाला आठवतंय ?

सेलीब्रिटी आणि वादंग हे नातं खूप जुनं आहे. भारतातील बहुतांश सेलिब्रिटींच्या कुठल्या ना कुठल्या वक्तव्यावरून, कृतीवरून अनेकदा वादंग निर्माण झालेला आहे. काही काही सेलिब्रिटी तर फक्त त्यांच्या वादग्रस्त वक्तव्ये आणि कृत्यांसाठीच ओळखले जातात. अशाच काही सेलिब्रिटींचे बहुचर्चित वाद-विवादांची माहिती देणारा हा लेख. यातील काही वाद तर आजही संपलेले नाहीत.

१. सलमान आणि शाहरुख यांच्यातील तूतू-मैंमैं

सलमान आणि शाहरुख दोघांचाही बॉलीवूडमध्ये खूप सन्मान केला जातो. परंतु एकदा कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये ऐश्वर्या रॉयवरून त्यांच्यात काहीतरी बाचाबाची सुरु झाली आणि प्रकरण थेट हातापाईवर गेले. या प्रकरणावर खुलासा करताना शाहरुख म्हणाला होता, “माझ्याबाबतीत तरी हे असे काही होईल वाटले नव्हते. पण जे झाले त्याबद्दल मला खूपच शरम वाटत आहे. पुन्हा कधी माझ्यासोबत असे काही होऊ नये, एवढीच अपेक्षा करतो.” सलमानने अशाप्रकारे हातघाईला येण्याचे हे काही पहिलेच उदाहरण नाही, पण शाहरुखसाठी मात्र निश्चितच ही बाब लाजिरवाणी ठरली असणार.

२. हरभजनने जेव्हा श्रीशांतच्या थोबाडीत दिली होती

हा किस्सा २००८च्या आयपीएल सामन्या दरम्यान घडला होता. हरभजन मुंबई इंडियन्सकडून तर श्रीशांत किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत होता. दोघांमध्ये थोडाशी शाब्दिक चकमक झाली आणि राग अनावर झाल्याने भज्जीने सरळ सरळ श्रीशांतला थोबाडीत दिली होती. भज्जीने थोबाडीत दिल्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला नाही पण श्रीशांतचा रडका चेहरा टिपण्यास कॅमेरा आणि प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी जराही उशीर केला नाही. त्यानंतर बराच काळ यावर चर्चा होत राहिली. भज्जीच्या अशा सणकी आणि आक्रमक वागण्याचा अनेकांनी निशेष केला होता.

३. सलमान खानने विवेक ओबेरॉयला दिलेली धमकी

ऐश्वर्या रॉयवरून सलमान आणि विवेक यांच्यातील प्रकरण किती ताणले गेले होते हे तर सगळ्यांनाच चांगले ठाऊक आहे. सलमानने तेव्हा विवेकला रात्री फोन करून धमक्या दिल्या होत्या. दुसऱ्या दिवशी विवेक ओबेरॉयने पत्रकार परिषद घेऊन सर्वांसमोर सलमानने केलेल्या कॉलची लिस्ट दाखवली होती. सलमानने रात्री पिऊन नशेत त्याला ४१ वेळा फोन केला होता. असे म्हणतात की यानंतर विवेक ओबेरॉयचे करियर उतरणीला लागले.

४. कंगना राणावत आणि ह्रितिक रोशन

कंगना तर नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतेच. ह्रितिक आणि कंगना यांच्यातील वाद जेव्हा चव्हाट्यावर आले तेव्हा देखील खूप तमाशा पाहायला मिळाला. दोघांनी एकमेकांवर कोर्टात खटला देखील दाखल केला होता. कंगनाने हृतिकवर आपला गैरफायदा घेतल्याचा आरोप केला होता. ह्रितिकच्या मते कंगनाच्या आरोपात काहीच तथ्य नव्हते, पण नंतर त्यांच्यातील इमेल्स लिक झाले आणि दोघांच्याही बोलण्यातील विसंगती स्पष्ट झाली. पण कंगना-ह्रितिक हा विषय नेमका काय होता हे जाणून घेण्याची आजही अनेकांना उस्तुकता आहे.

५. शाहरुख खान आणि शिरीष कुंदर

रा.वन हा शाहरुखचा एक मोठा प्रोजेक्ट होता आणि त्याला या चित्रपटाकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, पण चित्रपटाचा जेवढा गाजावाजा झाला तेवढा तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. यावरून शाहरुख थोडा नाराज झाला होता. नेमकं त्याचवेळी एका पार्टीत शिरीष कुंदरने रा.वन. फ्लॉप झाल्याचा विषय काढला आणि त्यावरून शाहरुखला काहीतरी टोमणे मारले. आधीच निराश झालेल्या शाहरुखला हे टोमणे सहन झाले नाहीत आणि त्याने शिरीष कुंदेरवर हात टाकला. 

६. सलमान खान- गुजारीश आणि ह्रितिक रोशन

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गुजारीशला हवे तितकेसे यश मिळाले नाही, तेव्हा सलमानने या चित्रपटाची थट्टा केली होती. या चित्रपटात मुख्य भुमिका साकारलेल्या ह्रितिकला सलमानचे हे वागणे आवडले नाही. बॉक्स ऑफिसवर होणाऱ्या कमाईवरून एकमेकांना हिणवण्यात काही अर्थ नाही, असेही ह्रितिकने म्हटले होते. पण या एका विधानामुळे संजय लीला भन्साळी आणि सलमानमध्ये वितुष्ट आले.

७. धोनी आणि विरू यांच्यातील वाद

एम एस धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात बऱ्याच मुद्द्यांबाबत असहमती असायची. खरे तर त्यांच्यातील मतभेदांवर कधी उघड चर्चा झाली नाही, पण टीमच्या बैठकीत कधीही कॅप्टन कुल आणि विरू एकमेकांसमोर यायचे नाहीत. याबाबत एकदा पत्रकारांनी धोनीला छेडले असता त्याने सरळ सरळ तो प्रश्नच नाकारला, पण तरीही ते एकमेकांशी बोलत नव्हते हे मात्र सत्य आहे.

८. ग्रेग चॅपेल आणि सौरव गांगुली

सौरव गांगुली आणि ग्रेग चॅपेल यांच्यातील कुरबुरीमुळे दोघेही बराच काळ चर्चेत राहिले. ग्रेग त्यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. दोघांच्याही व्यक्तीमत्वात तसा काही दोष नाही, पण तरीही दोघांचे अजिबात पटत नसे. व्यक्तिगत हेव्यादाव्यावरून ग्रेग यांनी गांगुलीला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. ग्रेग यांच्या या निर्णयावर चोहीकडून टीकेचा भडीमार झाला होता. पण ग्रेग प्रशिक्षकपदी असेपर्यंत सौरभ गांगुलीचे भारतीय संघात पुनरागमन झाले नाही. ग्रेग यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर मात्र सौरभ पुन्हा भारतीय संघात सामील झाला.

९. अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यातील भाऊबंदकी

रिलायन्सची व्याप्ती आणि श्रीमंती याबद्दल कुणालाही अधिक काही माहिती देण्याची गरज नाही. धीरूभाई अंबानींच्या निधनानंतर त्यांची दोन्ही मुले अनिल आणि मुकेश अंबानी यांच्यात संपत्तीच्या वाटणीवरून वाद उफाळला होता. आपल्याला संपत्तीतील योग्य वाटा मिळाला नसल्याची दोघांची भावना होती. धीरूभाई अंबानी यांनी मृत्युपत्र केले नसल्याने त्यांच्यातील संपत्तीची वाटणी करण्यावरून वाद सुरु झाला. शेवटी त्यांची आई कोकिलाबेनने दोघांच्यात कंपनीची वाटणी करून दिली. तेल आणि केमिकल कंपनी मुकेश यांना तर टेलिकॉम आणि इलेक्ट्रिसिटी अनिल यांना दिली. तरीही अनिल अंबानींनी मुकेश अंबानी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला होता.

१०. कुशल टंडन आणि अमिषा पटेल यांच्यातील ट्विटर युद्ध -

अमिषा पटेल थिएटरमध्ये राष्ट्रगीत सुरु असताना उभी राहिली नव्हती म्हणून कुशल टंडनने तिच्या त्या वागण्याबद्दल ट्वीट करून जाब विचारला होता. यावर अमिषा पटेलने म्हटले की, 'मला पिरियड्स सुरू होते म्हणून मी उभी राहू शकली नाही'. पण कुशलने यावरही घाणेरडी टिप्पणी करून तिला ट्रोल केले. दोघांतील हे ट्विटर युद्ध बराच काळ सुरू राहिले. इतरांना कुणालाही यांच्या या बाचाबाचीत रस नव्हता. पण दोघांच्यातच हा विषय खूप ताणला गेला होता.

११. संजय खानच्या पत्नीने झीनत अमानला केलेली मारहाण 

बॉलीवूड मध्ये अफेअर आणि त्याची चवीने केली जाणारी चर्चा ही काही नवी गोष्ट नाही. झीनत अमान ही सत्तरच्या दशकातील एक गाजलेली अभिनेत्री. तिचे आणि अभिनेता संजय खानचे सूर जुळले. संजय खान खूपच चक्रम डोक्याचा माणूस होता. एकदा त्याने झीनतला फोन करून भेटण्यासाठी बोलवून घेतले, पण झीनत शुटींगमध्ये व्यस्त असल्याने त्याला भेटायला जाऊ शकली नाही. शुटींग संपल्यावर ती त्याला भेटायला त्याच्या घरी गेली तेव्हा तिला समजले की संजय खान आपल्या पत्नीसोबत हॉटेल ताज मध्ये पार्टीसाठी गेला आहे. झीनत पार्टीमध्ये पोहोचताच संजय खान अक्षरश: तिच्यावर तुटून पडला. तिच्या पत्नीनेही त्याला साथ देत झीनतला मारहाण केली. पार्टीत जमलेले सारे लोक अक्षरश: बघे होऊन उभे राहिले होते. झीनतला इतकी मारहाण झाली होती की, तिचा जबडा फॅक्चर झाला होता. नंतर ऑपरेशन करून तिचा जबडा ठीक करण्यात आला, पण तिचा डावा डोळा पूर्ण निकामी झाला. संजय खानला नंतर याचा खूप पश्चाताप झाला होता. 

१२. अरिजित सिंह आणि सलमान खान

अरिजित सिंहने इंडस्ट्रीत स्थान मिळवण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत हे तर जगजाहीर आहेच आणि त्यासोबत सलमानचा अहंकारही. २०१४ च्या एका अवार्ड शो मध्ये अरिजितने सलमानच्या एका विनोदावर उत्तर म्हणून दुसरा विनोद केला आणि तेव्हापासून सलमान अरिजित सिंह वादाला सुरुवात झाली. सलमानला वाटले की अरिजितने त्याचा अपमान केला, पण अरिजितने तर सरळ नम्रपणे त्याला उत्तर दिले होते. तेव्हापासून सलमान अरिजितवर खार खाऊन आहे. सलमानच्या चित्रपटात तो अरिजितला गाणे गाऊ देत नाही, अशीही अफवा मध्यंतरी उठली होती. अरिजितने अनेकदा सलमानची माफी मागितली, पण सलमान त्याच्या या माफीनाम्यांना जराही भिक घालत नाही असे दिसते. 

 

खेळ आणि चित्रपट सेलिब्रिटींचे हे वाद-विवाद म्हणजे कधी कधी तर नुसतेच गर्दी खेचण्याची क्लृप्तीही असते. असेच काही वाद तुम्हाला आठवत असतील तर त्याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. 

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required