computer

या ११ बॉलीवूड कलाकारांना हे टुकार सिनेमे केल्याबद्दल होतोय पश्चाताप!!

एखादी गोष्ट केल्यानंतर अपेक्षित यश मिळाले नाही की अरेरे आपण हे करायलाच नको होतं, अशी हळहळ बऱ्याचदा व्यक्त केली जाते. याला कुणीही व्यक्ती अपवाद असू शकत नाही. चित्रपट हिट झाला त्यातील व्यक्तिरेखा उत्तमरीत्या साकारता आल्याबद्दल कौतुक झाले की कोणाही कलाकाराला आपल्या कामाचे चीज झाल्याचे समाधान मिळेल, पण काही चित्रपटांच्या बाबतीत मात्र दुर्दैवाने असे घडत नाही. काही कलाकार असेही आहेत ज्यांनी काही चित्रपटात विशिष्ट प्रकारची भूमिका साकारल्याबद्दल त्यांना पश्चातापही व्यक्त केला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील व्यक्तिरेखेबद्दल किंवा कथानकाबद्दल पश्चाताप व्यक्त करणाऱ्यांमध्ये अक्षयकुमारपासून कॅटरिना कैफपर्यंत अनेकजण आहेत.

चला तर मग बघूया बॉलीवूडमधल्या कोणत्या कलाकारांना कुठला चित्रपट केल्याबद्दल पश्चाताप होतो आहे. 

१. अभय देओल – आयेशा

‘ओय लकी, लकी ओय,’ ‘देव डी’ सारखे चित्रपट दिल्यानंतर अभयने आयेशा सारख्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल फेल ठरला. समीक्षकांच्याही पसंतीस उतरला नाही. शिवाय, स्वतः अभय देओललाही त्याच्या कामाबद्दल कसलेही समाधान मिळाले नाही. त्यानंतर या प्रकारचे चित्रपट कधीच स्वीकारणार नाही अशी त्याने शपथच घेतली.

खरे तर त्याला सांगण्यात आले होते की या चित्रपटाचे कथानक हे ब्रिटीश लेखिका 'जेन ऑस्टिन'ची प्रसिद्ध कादंबरी एम्माच्या कथानकावर अवलंबून आहे. प्रत्यक्षात मात्र तसं काहीच नव्हतं. अभिनय करतानाही त्याला हे जाणवलं पण आधीच करार केला असल्यामुळे ऐनवेळी माघार घेणे शक्य नव्हते. 

२. शाहीद कपूर – शानदार

मोठमोठे सेट्स, दमदार स्टार कास्ट, चांगली गाणी इतका सगळा मसाला असूनही जर कथानकच चांगले नसेल तर अशा चित्रपटाला कुणीही वाचवू शकत नाही. शाहीद कपूरनेही हे स्वतः मान्य केले आहे. शानदार केल्यानंतर त्याला याची प्रचीती आलीच. 'छुप छुपके' आणि 'वाह! लाईफ हो तो ऐसी' हेही चित्रपट करण्याची त्याची इच्छा नव्हती. खरे तर आपल्याकडे चांगले कंप्युटर ग्राफिक्स करणारे कलाकार नाहीयेत म्हणून अशा चित्रपटांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे त्याने एका फिल्म फेअर अवॉर्डमध्ये म्हटले होते. 

३. सैफअली खान –हमशकल्स

हमशकल्स चित्रपटाने टुकार सिनेमांचा नवीन पायंडा घालून दिला. सैफ, रितेशच्या अभिनयापासून ते राम कपूरला मुलीच्या कपड्यात बघण्यापर्यंत या चित्रपटाने इंटरटेंनमेंटच्या नावाखाली लोकांना छळले होते. लोकांनी आजवर या चित्रपटाचा भरभरून पाणउतारा केला आहे. सैफअली खान तर म्हणतो या चित्रपटात काम करणे ही माझी मोठी चूक होती. एकदा चूक झाली ती झाली ती काही पुसून तरी टाकता येत नाही. या चित्रपटाला काही विशेष कथानक नव्हते. 'कदाचित या चित्रपटामुळे या क्षेत्रात थोडी माझी डिमांड वाढेल अशी मला आशा होती पण ती फोल ठरली', असे सैफअली खान म्हणाला होता. हमशक्ल्स सारखी चूक पुढे घडूच नये असे त्याला वाटते.

४. गोविंदा – किल दिल

गोविंदाच्या अभिनयाबद्दल कुणाचेही दुमत असण्याची गरज नाही. किल दिल मधील त्याची खालनायकाची भूमिकाही त्याने चांगलीच वठवली आहे. चित्रपटाचे कथानकच तितकेसे प्रभावी नसल्याने हा चित्रपट विशेष चालला नाही. गोविंदाला हा चित्रपट केल्याचा पश्चाताप होतो. उलट तो तर म्हणतो की, अनेकांनी हा चित्रपट पाहिलाही नाही याचेच मला कौतुक आहे. मला हव्या तशा भूमिकाच मला मिळत नव्हत्या. केवळ स्पर्धेत टिकून राहण्यासाठी म्हणून ही भूमिका मी स्वीकारली असेही त्याने कबूल केले.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या रणवीर सिंगलाही हेच वाटते. त्याने अनेकदा इंटरव्ह्यूजमध्ये किल दिल चित्रपटात काम केल्याबद्दल पश्चाताप व्यक्त केलाय.

५. अजय देवगण – रास्काल्स आणि हिंमतवाला 

अजय देवगणने स्वतःच त्याचे हे दोन्ही चित्रपट पाहिलेले नाहीत, मग प्रेक्षक सिनेमागृहात या चित्रपटांसाठी गर्दी करतील अशी अपेक्षा तरी तो कशी काय करू शकतो? चित्रपटाचे शुटींग करतानाच मला जाणवले होते की, हे चित्रपट फारसे चालणार नाहीत. हे चित्रपट मी अजूनही पाहिले नाहीत. असे तो स्वतःच कबूल करतो. यावरून त्याला किती तीव्र पश्चाताप होत असेल ते दिसून येते.

६. इम्रान हाश्मी – गुड बॉय बॅड बॉय

फक्त निर्माता आणि चित्रपटात काम करणाऱ्या इतर सहकलाकारांना निराश करायला नको म्हणून मी हा चित्रपट स्वीकारला असल्याचे इम्रान म्हणतो. नाहीतर या चित्रपटात काहीही तथ्य नव्हतेच. सगळ्यात वाईट चित्रपट केल्याचा मला नेहमीच पश्चाताप होतो हेही त्याने कबूल केले.

७. कॅटरिना कैफ – बूम

बूम चित्रपटातूनच कॅटरिनाने पदार्पण केले. आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटाबद्दलच तिला पश्चाताप होतो. ती म्हणते, “भारतीय मानसिकता आणि संस्कृती यांची मला थोडी जरी समज असती तरी मी हा चित्रपट केलाच नसता. इथून पुढेही मी कधीच या प्रकारचे चित्रपट स्वीकारणार नाही. भलेही मला चित्रपट मिळालेच नाहीत तरी बेहत्तर. यावरून तिच्या भावना काय असतील ते आपण समजू शकतो.

८. ट्विंकल खन्ना – मेला

एक कलाकार म्हणून आपल्याच कामावर टीका करण्याची हिंमत ट्विंकलमध्ये आहे. तिने अनेकदा स्वतःच्याच कामाचे वाभाडे काढलेले आहेत. 'मेला' बद्दलही तिचे हेच म्हणणे आहे. मेलाने तिच्या आयुष्यावर कायमचा ओरखडा उमटवला आहे, असे ती म्हणते. आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून तिने या भावना व्यक्त केल्या होत्या.
 

९. अमिताभ बच्चन – आग

चांगल्या कारकिर्दीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या महानायकाला देखील आपल्या एका चित्रपटाचा पश्चाताप होतो. अर्थातच राम गोपाल वर्माच्या आग मध्ये काम केल्याबद्दल बिग बी ला पश्चाताप होतो. ते म्हणतात की, 'चित्रपट यशस्वी झाल्याबद्दल जसे नायकाला श्रेय दिले जाते तसेच चित्रपट अपयशी ठरला तर त्याचीही जबाबदारी आपण घेतली पाहिजे. आग मध्ये काम करणे हा सर्वस्वी माझा चुकीचा निर्णय होता.' 
 

१०. राहुल बोस – मान गये मुघल-ए-आझम

चित्रपट निवडण्याचा जेव्हा आपला निर्णय चुकतो तेव्हा खरंच रात्रीची झोप उडते असे राहूल म्हणतो. त्याने हे मान्य केलं की, मान गये मुघल-ए-आझम केल्यानंतरही माझी अवस्था अशीच झाली होती. हा चित्रपट करणे म्हणजे नुसता वेळेचा अपव्यय होता बाकी काही नाही असे तो म्हणतो.

११. प्रियांका चोप्रा – जंजीर

बर्फी सारखा सुपरडुपर हिट चित्रपट दिल्यानंतर प्रियांकाची पुढची निवड जंजीर असेल हे पाहून काहींना धक्का बसला होता. कधी कधी आपल्या हातूनही चुका होतात. एवढीच मर्यादित प्रतिक्रिया देऊन तिने ही चूक कबुल केली. 

 

कथानक वाचल्यानंतर चित्रपट हिट होईल न होईल याचा थोडाफार अंदाज तरी कलाकारांना येतोच. तरीही फक्त काम टिकवणे, स्पर्धेत टिकणे, एवढ्याच उद्देशाने काही कलाकार असे चित्रपट स्वीकारतात, पण त्यांच्या एका चुकीच्या निर्णयाने त्यांना चांगला धडा शिकवलेला असतो. बरोबर ना?
 

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required