computer

महामारीची देणगी.. स्वतः तयार केलेल्या विमानातून केरळी कुटुंब फिरत आहे युरोप..

गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. ही म्हण मानवी इतिहासाचे सार आहे. माणसाला जसजशी गरज भासत गेली तसतसे नवीन शोध लागत गेले. आपले आजचे बदललेले जग हे त्याचेच फळ आहे. कधीकाळी चाकाचा शोध लागला आणि जमिनीवरचा प्रवास सोपा झाला. मग राईट टायमिंगला राईट बंधूंनी विमान शोधून काढले आणि माणूस हवेत प्रवास करू लागला. सोप्या भाषेत, गरज भासली तर माणूस जुगाड करतोच.

अशोक थमारक्षण या केरळ राज्यातील अलापुज्जा येथील व्यक्तीने गरजेपोटी कुणाला खरा वाटणार नाही इतका भन्नाट शोध लावला आहे. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या या सरांना आपल्याला कुटुंबाला अमेरिकेत फिरण्यासाठी घेऊन जायचे होते. पण अनेक कारणांनी त्याला ते शक्य नव्हते. नंतर कोरोनात तर आंतरराष्ट्रीय प्रवास बरेच महिने बंदच होता. मग पठ्ठ्याने काय करावे? तर थेट ४ सीटर विमान तयार करून टाकले.

सध्या अशोक हे लंडनमध्ये नोकरीला आहेत. तिथून अमेरिका जायचा जुगाड काय होत नव्हता. त्यातही त्यांना एयरक्राफ्ट तयार करायची आधीच हौस असल्याने आता निमित्त सापडले होते. त्यांनी काम सुरू केले. दक्षिण आफ्रिकेतून सामान मागवून घेतले. जवळपास १८ महिने हे काम सुरू होते. ब्रिटनच्या उड्डयन विभागाचे सर्व तयारीकडे पूर्ण लक्ष या काळात होते. या विमानाचे नाव त्यांनी स्वतःच्या मुलीच्या नावावरून जी- दिया असे ठेवले आहे.

अशोक यांनी २०१९ च्या सुरुवातीला या एयरक्राफ्टवर काम सुरू केले. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले. नंतर अनेक दिवस ते त्याची टेस्ट फ्लाईट घेत होते. त्यानंतर मग ब्रिटिश उड्डयन विभागाने विमान चालवायचा परवाना दिला. शेवटी मग ते आपल्या कुटुंबाला अमेरिकेत घेऊन जायला यशस्वी झालेच.

आधी अमेरिका, नंतर ऑस्ट्रेलिया, जर्मनी असे दौरे सुरू झाले. घरचेच विमान. काढले विमान, गेले फिरायला असा सगळा माहोल आहे. अशोक यांची पत्नी अभिलाषा सांगतात की या काळात त्यांना हे स्वप्न साकार करण्यासाठी पै-पै जमा करावा लागला आहे. घरात येणारी पूर्ण कमाई विमान तयार करण्यासाठी खर्च होत होती.

अशोक यांनी २००६ साली पलक्कड विद्यापीठातून आपले इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि ते पुढील शिक्षणासाठी ब्रिटनला गेले. विशेष म्हणजे अशोक यांचे वडील ए.व्ही. तमारक्षण हे केरळमध्ये आमदार होते. ऑटोमोबाईल इंजिनिअर असलेले अशोक यांनी फोर्ड आणि होंडा या कंपन्यांमध्ये काम केले आहे.

अशोक सांगतात की, "आपण अधिकृत विमान तयार करण्याचे कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही. इंटरनेटवर रिसर्च करून आपण विमान कसे तयार करावे हे शिकून घेतले आहे." एखाद्या गोष्टीची गरज भासली आणि त्यात आवड असली तर नवनिर्मिती करायला जास्त कठीण नसते हेच अशोक सिद्ध करून दाखवत आहेत.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required