देवदास येत आहे आता मराठीत...टीझर पाहिलात का ?

Subscribe to Bobhata

बंगाली लेखक शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या कादंबर्‍या खूप गाजल्या आहेत. पण त्यातल्या एकीनं खूप लोकांना भुरळ घातलीय. तिचं नांव आहे ’देवदास’.

ऐकलंय ना नांव? शाहरूखचा देवदास तर पाहिलाच असेल! अगदीच रसिक असाल तर अनुराग कश्यपचा देव डी पण पाहिला असेल. आणि घरी विचारलंत तर आजोबांच्या काळात त्यांनी  के. एल. सैगलचाही देवदास बघितला असेल.

अहो, पण हे तर फक्त आपले हिंदी सिनेमे झाले. बंगाली, हिंदी, तमिळ, तेलगु इतकंच नाही उर्दू, आसामी अशा कितीतरी भाषांत १५ हून अधिक सिनेमे या एकट्या कादंबरीवर आहेत. पहिला सिनेमा आला १९२८ साली.  तो होता  मूकपट. मूकपट असूनही त्या सिनेमाच्या कथेनं, कलाकारांच्या अदाकारीनं आणि  त्यांच्यातल्या प्रेमाच्या उत्कट  आविष्कारानं अनेकांना भुरळ घातली.

एवढ्या भाषांत आता एवढे चित्रपट आल्यानंतर आता देवदास पहिल्यांदाच अस्सल मराठी रूपात येत आहे. देवदास, पारो, चंद्रमुखी यांना मराठी ढंगात बघताना नक्कीच मजा येईल. या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. ऋतुराज धालगडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत तर देवदासच्या रुपात आपल्याला दिसणार आहे आपला मराठमोळा ‘एक अलबेला’ कलाकार ‘मंगेश देसाई’. पारो आणि चंद्रमुखीच्या भूमिका कोण करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण२०१७ च्या अखेर पर्यंत सिनेमा रिलीज होईल हे नक्की. 

योगायोग म्हणजे देवदास  ही कादंबरी १९१७ रोजी प्रकाशित झाली आणि या वर्षी म्हणजे ३० जून २०१७ रोजी पुस्तकाला १०० वर्ष पूर्ण होत असतानाच याच कादंबरीवर आधारित आणखी एक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.

देवदासच्या कथेतच अशी काही जादू आहे की प्रत्येकालाच ती आकर्षित करते. याच कादंबरीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर तेही आपल्या मराठीत बघायला आपण सारेच उत्सुक असू.. हो ना?

 

सबस्क्राईब करा

* indicates required