computer

दिल दोस्ती आणि बोभाटाचा हटके प्रयोग...प्रेमगीत स्पर्धेच्या टॉप ३ स्पर्धकांचे व्हिडीओ पाहा !!

मंडळी, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत गाण्यांच्या एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेविषयी. आगळीवेगळी का? कारण इथे भलामोठा रंगमंच, समोर बसलेले परीक्षक आणि एकामोमाग येऊन गाणी म्हणणारे स्पर्धक असं काहीही नव्हतं. ही गाण्यांची स्पर्धा संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडली. त्यात जगभरातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि परीक्षकांनी ऑनलाइन परीक्षण करून निकालही दिला. आश्चर्य वाटलं ना? नेमकी कशी होती ही स्पर्धा? चला तर मग जाणून घेऊया…

आजकाल सोशल मीडिया मुळे जग जवळ आलं आहे. अगदी खरं आहे ते! सोशल मीडियाच्या माध्यमातून समविचारी लोक एकत्र जमतात, संवाद साधतात आणि माहितीची देवाणघेवाण करतात. फेसबुकवर असाच एक ग्रुप आहे-  'दिल दोस्ती आणि बरंच काही…'. इथे भारतासोबत इतर देशांतले लोकही आहेत. बरेचदा अनेकांना आपली कला सादर करायची असते, विचार मांडायचे असतात पण त्यांची कला पाहण्यासाठी कुणीच उपलब्ध नसते. याच कारणामुळे  या ग्रुपची संकल्पना अनुप कुलकर्णी यांना सुचली आणि त्यांनी हा ग्रुप बनवला.

या ग्रुपच्या उपक्रमांचाच एक भाग म्हणून 'बोभाटा' पोर्टल व 'दिल दोस्ती आणि बरंच काही…' ग्रुप या दोघांच्या संयुक्त विद्यमाने व्हॅलेंटाईन आठवड्याच्या निमित्ताने गाण्यांची ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या अभिनव स्पर्धेचे नाव होते 'दिल दोस्ती बोभाटा प्रेमगीत स्पर्धा'.

स्पर्धा नेमकी काय होती? तर दिनांक ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत ग्रुपमधील सदस्यांना आपल्या गाण्यांचे व्हिडीओ बनवून पोस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले. हे व्हिडीओ कुठल्याही ऍप, कराओके किंवा वाद्यांची साथ न घेता बनवायचे होते. या स्पर्धेसाठी हिंदी आणि मराठी प्रेमगीत टाकण्याची मुभा होती आणि वयाचे कुठलेही बंधन नव्हते. स्पर्धेची संकल्पनाच इतकी नाविन्यपूर्ण होती की स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दोनशेपेक्षा अधिक स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला. हे स्पर्धक महाराष्ट्रच काय, इतर राज्यांमधून आणि परदेशातुनही सहभागी झाले होते. इतकंच नव्हे तर काही सदस्यांनी आपल्या लहान लहान मुलांची गाणीही पोस्ट केली आणि जेष्ठ नागरिकांनी सुद्धा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 

विशेष नमूद करण्याची बाब अशी की, प्रख्यात संगीतकार निलेश मोहरीर यांना या स्पर्धेबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी खालील उत्स्फूर्त शब्दात आपल्या शुभेच्छा समूहाला आणि स्पर्धकांना दिल्या. 

(निलेश मोहरीर)

"बोलून दाखवण्यापेक्षा प्रेम हे संगीतातून अधिक उत्कटपणे व्यक्त होतं असं मला वाटतं, आणि त्यासाठी कुणाला व्यावसायिक गायक, कवी किंवा संगीतकार असण्याची गरज नाही... प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्याला जितकं संगीत येतं तितकं पुरेसं असतं. बोभाटा. कॉम व दिल दोस्ती आणि बरंच काही यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या "प्रेमगीत" गायन स्पर्धेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं समजलं. आतापर्यंत १०० हुन अधिक व्हिडिओ आले आहेत, आणि हा आकडा अजून वाढत जाईल असं वाटतंय. फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना आणि उद्या वॅलेंटाईन्स डे असल्याने प्रेमगीत गायनाची स्पर्धा घेण्याचं प्रयोजन अगदी उत्तम आहे. ह्यासाठी बोभाटा. कॉम व दिल दोस्ती आणि बरंच काही ह्या ग्रुपचं आणि उत्साहाने भाग घेणाऱ्या रसिकांचं मनःपूर्वक अभिनंदन." 

- निलेश मोहरीर. 
13/02/2020

मंडळी, बोभाटा पोर्टल नेहमीच कलागुणांना प्रोत्साहन देते हे तर तुम्हांला माहित आहेच. यामुळे स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारण्याचा निर्णय बोभाटाने घेतला. या स्पर्धेतून टॉप २५ विजेते निवडण्यात आले आहेत त्या सर्व विजेत्यांना बोभाटातर्फे कौतुकपत्र देण्यात येणार आहे. त्यातल्या टॉप ३ विजेत्यांना बोभाटातर्फे कौतुकपत्रासोबत बक्षिस म्हणून गिफ्ट कार्ड्स देण्यात येणार आहेत. 

या ऑनलाइन स्पर्धेचे परीक्षण करणे तसे कठीण काम. पण हे शिवधनुष्य पुण्याच्या 'सुरपालवी म्युझिकल इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट' या कंपनीने लीलया पेलले. सुरपालवीच्या प्रख्यात गायिका पल्लवी पत्की-ढोले व नामांकित दिग्दर्शक संजय हिवराळे यांनी प्रत्येक व्हिडीओ काळजीपूर्वक बारकाव्यांसह तपासून विजेत्यांची निवड केली. विशेष बाब म्हणजे स्पर्धकांपैकी वरदा देशपांडे या गायिकेला त्यांनी सुरपालवीच्या मंचावर गाण्यासाठी आमंत्रितही केले आहे. 

आम्ही तुमच्यासाठी खास पहिल्या तीन विजेत्यांचे व्हिडीओ इथे देत आहोत. स्वानंद जोशी, संगीता काटे-भाटे आणि विपुल आपटे या स्पर्धक गायकांना लवकरच मोठ्या मंचावर गाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. 

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनुप, संहिता, मंगेश, वीणा, निलेश आणि शिल्पा या समूह संचालकांनी मेहनत घेतली. ही स्पर्धा यशस्वी होण्याचे श्रेय त्यांनी समूहातील सर्व सदस्यांना, सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आणि परीक्षकांना दिले आहे. 

तर मंडळी, 'दिल दोस्ती आणि बरंच काही' या समूहाने व 'बोभाटा' पोर्टलने हा ऑनलाइन गाण्यांच्या स्पर्धेचा नवीन पायंडा पाडला आहे. यापुढेही अश्या अनेक वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्याचा मानस आहे. तुम्हाला कशी वाटली ही आगळी वेगळी स्पर्धा? कमेंटबॉक्समध्ये आपले मत जरूर नोंदवा…

सबस्क्राईब करा

* indicates required