computer

फ्रेडी मर्क्युरी : इंग्लिश रॉक संगीतातला भारतीय बादशाह !!

‘वुई विल् वुई विल् रॉक यू!’ हे गाणं किंवा ‘वुई आर् द चॅम्पियन्स!’ हे गाणं माहिती नसलेला भारतीय सहसा सापडत नाही. इंग्लिश रॉक संगीत ऐकणार्‍या प्रत्येकानं ही गाणी ऐकलेली असतात. पण ही गाणी गाणारा बँड क्वीन आणि त्यांचा गायक फ्रेडी मर्क्युरी यांच्या भारताशी असलेल्या कनेक्शनविषयी अनेक भारतीय अनभिज्ञ असतात.

ही आणि यासारखी अनेक हिट गाणी गाणारा फ्रेडी हा मुळात भारतीय आई-बापाच्या पोटी जन्मलेला, पारशी समाजातला आणि बालपण भारतात व्यतित केलेला कलाकार आहे. ५ सप्टेंबरला झांजिबारमध्ये जन्मलेला (मृत्यू : २५ नोव्हेंबर १९९१) लहानपणी मुंबईमध्ये दादर पूर्वेकडच्या पारशी कॉलनीमध्ये राहायचा. याचं शिक्षण पाचगणीच्या सेन्ट पीटर्स शाळेत झालं.

पुढे शिक्षणासाठी तो इंग्लंडला गेला. गीत-संगीतामध्ये लहानपणापासून रस असणार्‍या फारूखनं लंडनमध्ये कलेचं रीतसर शिक्षण घेतलं आणि संगीतामध्येच करीअर केलं. संगीत क्षेत्रासाठी त्याने स्वतःचं नाव फ़्रेडी मर्क्युरी असं बदललं. इंग्लिश रॉक संगीतामध्ये त्याने इतकं नाव मिळवलं की जगातल्या सर्वोत्तमांपैकी एक म्हणून तो गणला जातो. आजही "फ्रेडी मर्क्युरी" म्हणताच दर्दी रसिक नि संगीतज्ञ कान टवकारल्याशिवाय राहायचे नाहीत.

 

 [ फ्रेडीने बनवलेला एब्लम . त्याच्याकडे ग्राफीक डिझायनिंगची डीग्री होती...]

'फ्रेडी'ने १९७१ मध्ये 'ब्रायन मे', 'रॉजर टेलर' आणि 'जोन डेकन' यांच्याबरोबर ग्रूप बनवला आणि त्याला नाव दिलं 'क्वीन'.

'फ्रेडी' नि 'क्वीन' ची अनेक गाणी गाजली. काहींचा इथेही परामर्श घेऊच, पण सुरुवात एका अतिशय कॉम्प्लेक्स गाण्याने करुया. "Bohemian Rhapsody". 'फ्रेडी'चं तुफान लोकप्रिय गाणं. या गाण्याला सर्वोत्तम इंग्लिश रॉक गाणं असा सन्मान काही वर्षांपूर्वी दिला गेला आहे.

यातले 'फ्रेडी'चे सांगीतिक प्रयोग भल्याभल्यांना अचंबित करतात. सुरुवातीला त्याचे पियानोवरचे सुंदर इंट्रोडक्शन, त्यानंतर बेले संगीत, पुढे 'ब्रायन मे'ची भन्नाट गिटार आणि अचानक सुरु होणारं ओपेरा स्टाईलचं संगीत, ते संपता संपता चालू होणारं हार्ड रॉक म्युझिक आणि शेवटाकडे जाता जाता आर्त करणारा 'फ्रेडी'चा पियानो आणि त्याचा स्वर! अशाप्रकारे आपल्यावर 'फ्रेडी' संगीतातून गारुड करत असताना त्याचे शब्द छळू लागतात. अजूनही या गीताचा अर्थ काय आहे यावर रसिकांच्या चर्चा झडतात. स्वत: 'फ्रेडी'ने हा भाग गुलदस्त्यातच ठेवलाय. तेव्हा या "Bohemian Rhapsody" चा आनंद लुटू या......

'फ्रेडी' आणि त्याचा ग्रूप 'क्वीन' म्हणजे एक भन्नाट रसायन होतं. मूळचा अंतर्मुख 'फ्रेडी' 'लाईव्ह' कार्यक्रम सादर करू लागला की प्रचंड बहिर्मुख व्हायचा. संपूर्ण स्टेजभर वावरायचा, जसा तिथला अनिभिषिक्त सम्राट, सळसळती उर्जाच जणू!  

दोन वर्ष सलग टूरिंग केलं 'क्वीन'नं. अगदी पार दक्षिण अमेरिकेपर्यंत. एकेका शोमध्ये लाखालाखाने प्रेक्षक असायचे. संगीताचा ध्यास इतका की आंतरराष्ट्रीय बॉयकॉट असलेल्या दक्षिण आफ्रिकेतही कार्यक्रम केले.
गाणीही जबरदस्त. त्यांचं "We Are The Champions" हे गीत क्रीडाक्षेत्रात सर्वच खेळांमध्ये 'विजयगीत' म्हणून वाखाणलं गेलं. 'फ्रेडी'च्या गाण्यांचा आनंद घ्यावा त्याच्या लाईव्ह शोज मध्येच......

'क्वीन'चं आणखी एक गाणं न देऊन राहावत नाही आहे. 'ब्रायन मे'चं "We Will We Will Rock You".

एका कार्यक्रमात 'क्वीन' प्रेक्षकांना आपल्या संगीतात सहभागी करत असताना प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून 'ब्रायन मे'ने या गाण्याची निर्मिती केली. शब्दही त्याचेच आणि 'फ्रेडी' गायक. रॉक संगीताचं हे 'एन्थम' बनून गेलं. केवळ पायाचे स्टेम्पिंग (आपटणे) आणि टाळ्या यांचा ताल असणा-या गाण्यात शेवटी 'ब्रायन'ची गिटार सॉल्लिड वाजते.....

१९९२च्या बार्सिलोना ऑलिम्पिकचं 'थीम साँग' बनवण्यासाठी 'फ्रेडी'शी संपर्क साधला गेला. बार्सिलोनामध्येच जन्मलेली आणि तिथेच वास्तव्यास असलेली प्रसिद्ध ओपेरा गायिका 'मोंटेसेरा कबाल' हिच्यासह ओपनिंग सेरेमनीमध्ये गाण्यासाठी द्वंद्वगीत बनवण्याची जबाबदारी 'फ्रेडी'वर टाकण्यात आली आणि 'फ्रेडी'ने गीत लिहिले "Barcelona!"

'मोंटेसेरा'चे स्पॅनिश बोल आणि 'फ्रेडी'चे इंग्लिश शब्द यांचा अप्रतिम मिलाप आणि त्याला कर्णमधुर ओपेरा संगीताची जोड, एक अद्वितीय गाणं तयार झालं.  पण ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये 'फ्रेडी'ला ते गाता आलं नाही. कारण त्यापूर्वीच १९९१ला त्याचं एड्समुळं निधन झालेलं. या रोगाने घास घेतलेला पहिला मोठा संगीतकार!

पण तरीही या गाण्यातली त्याची जागा कोणी भरून काढूच शकणार नव्हतं. ओपनिंग सेरेमनीमध्येही 'मोंटेसेरा'सोबत तोच गायला, फक्त त्याच्या ध्वनिचित्रमुद्रणाद्वारे. ती जागा केवळ 'फ्रेडी'चीच होती, त्याच्याखेरीज कुणीही ती भरू शकणार नव्हतं.

 

वुई विल्.... वुई विल् .... मिस् यू...!

लेखक -प्रास

सबस्क्राईब करा

* indicates required