computer

मल्टीप्लेक्सचं काय होणार? मल्टीप्लेक्सचा बाजार उठणार का? वाचा बोभाटाचा विशेष लेख !!

अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात येत्या १५ ऑक्टोबरपासून थिएटर्स पुन्हा एकदा सुरु होणार आहेत अशी बातमी आहे. लवकरच चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी प्रमाणित कार्यप्रणाली म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर पण उपलब्ध होणार आहे. ही नियमावली एकल सिनेमागृह (सिंगल स्क्रिन) आणि मल्टीप्लेक्सेस यांना एकसारखीच लागू असेल. 

चित्रपटगृहात फक्त ५०% क्षमतेचाच वापर करता येणार होणार आहे. असे झाले तर चित्रपटगृहांचा विशेषतः मल्टिप्लेक्सचा धंदा कायमचा बसण्याची शक्यता किती आहे? असा प्रश्न आमच्या मनात आला म्हणून आम्ही थोडी शोधाशोध केली तेव्हा काही गंमतीदार माहिती वाचायला मिळाली. 

म्हणून बोभाटाचा आजचा लेख मल्टीप्लेक्स म्हणजे मल्टी स्क्रिनचा धंदा बंद पडेल का? या विषयावर आहे.

हा लेख वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की मल्टीप्लेक्सने त्यांच्या हुशारीने आपल्याला गेली कित्येक वर्षे कसे 'गिर्‍हाईक' बनवले आहे. तर असं ते 'बिझीनेस मॉडेल' आहे तरी काय हे आज समजून घेऊया!!

यासाठी आपण पीव्हीआर या मल्टीप्लेक्सचे उदाहरण घेऊ या.

या लॉकडाऊनच्या दरम्यान मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात त्यांची मल्टिप्लेक्सेस व्यवस्थित चालत होती. मार्चअखेरीस मांडलेल्या हिशोबाप्रमाणे कंपनीला ७४ कोटींचे नुकसान झाले. त्यानंतर लॉकडाऊन सुरु झाला आणि कंपनीची कमाई ९८ % घसरली. उरलेले २% म्हणजे बँकेतल्या पैशावर मिळालेले व्याज वगैरेचे आहेत. म्हणजेच जर आता येत्या दिवसात फक्त ५०% क्षमता वापरायला मिळणार असेल तर  नुकसान ५०% भरून निघेल का ?  हे असे गणित नाही. आता वाचा या मागचे गमतीदार गणित!

१. आपण समजतो तसे तिकीटविक्री करून पिव्हीआरला कधीच मोठा नफा मिळत नसतो. जो काय मिळतो तो दुर्लक्ष करण्याइतपतच असतो.

२. पिव्हीआरमध्ये सुटीचे दिवस वगळता कधीच ३० ते ३५% वर प्रेक्षक नसतात. त्यामुळे ५०% क्षमतेवर मल्टीप्लेक्स चालवणे हे आव्हान नाही.

३. पिव्हीआरचा खरा सणसणीत नफा असतो पॉप कॉर्न- सॉफ्ट ड्रिंक विकण्यात! गेल्या वर्षी पिव्हीआरचा पॉपकॉर्नचा गल्ला होता ९४८ कोटी रुपये. या ९४८ कोटींसाठी खरा खर्च आला २६० कोटी. म्हणजे सिनेमा दाखववण्यापेक्षा पॉपकॉर्न विकण्यातच कितीतरी फायदा कंपनी कमावते. त्यात भरीत भर म्हणून वेगेवेगळ्या काँबो स्किम लावल्या जातात, ज्यामुळे बरेचसे प्रेक्षक ठरलेल्या बजेटपेक्षा जास्त खर्च करतात.

४.  पिव्हीआरसारख्या कंपन्या त्यांचे गणित Spend per Head (SPH) म्हणजे सिनेमा बघायला आलेला माणूस तिकीटाव्यतिरिक्त किती जास्त खर्च करतो त्याचा विचार करतात. गेल्या ५ वर्षांत हा (SPH) ६४ रुपयांपासून ९९ रुपयांपर्यंत पोहचला आहे. थोडक्यात तिकीटामागे ९९ रुपये गल्ला वाढतो. पण हे नफ्याचे गणित मांडताना आणखी एक विचार केला जातो- तो म्हणजे तिकीटाची किंमत आणि इतर खर्च याचे गुणोत्तर पण ३६% वरून ४९% पर्यंत पोहचला आहे. 

थोडक्यात सांगायचे तर, नफ्याचा केंद्रबिंदू पॉपकॉर्न आणि सॉफ्ट ड्रिंक विकण्यात आहे. 

परंतु पिव्हीआरसमोर आव्हान आहे ते वेगळेच! लोक का मल्टिप्लेक्समध्ये येतील या प्रश्नाचे उत्तर त्यांना शोधून काढावे लागेल. लॉकडाऊनच्या दरम्यान बरेच चित्रपट अर्धवट झालेले आहेत. सुशांत सिंग आत्महत्येच्या प्रकरणानंतर अनेक चित्रतारकांची नावे बातम्यांमध्ये चर्चेस आली आहेत. त्यांना मिळालेल्या निगेटीव्ह पब्लीसीटीमुळे त्यांचे चित्रपट लोकं बघतील का? हा नव्याने उभा राहिलेला प्रश्न आहे. म्हणजेच जर नवे बॉक्स ऑफीसवर हिट होतील असे चित्रपट आले नाहीत तर लोकं मल्टीप्लेक्स्मध्ये जाणार नाहीत. ते गेले नाहीत तर पॉपकॉर्न कोण घेणार? आणि पॉपकॉर्न नाही विकले तर नफा येणार नाही. हा केवळ अंदाज नाही. २०१५ साली जेव्हा चांगले चित्रपट आले नाहीत तेव्हा लोक मल्टीप्लेक्स्मध्ये आले नाहीत, परिणामी त्यांचा नफा ५०% पर्यंत घसरला होता.

आता दुसरी एक समस्या बघू या. लॉकडाऊनच्या काळात नेटफ्लिक्स आणि इतर स्ट्रीमिंग व्हिडीओ दाखवणारे चॅनेल्स वापरायला प्रेक्षक सरावले आहेत. त्यामुळेही थिएटरला जाऊन चित्रपट बघणार्‍यांची संख्या घटणार आहेच. या चॅनेल्सवर नाहीत तेच चित्रपट मल्टीप्लेक्सला जाऊन बघण्याची गरज भासेल. त्यात आता भर पडली आहे आयपीएलची! क्रिकेटच्या चाहत्यांसोबत फँटसी गेम खेळणार्‍यांची संख्याही वाढली आहे.
 
एकूण मल्टिप्लेक्सच्या धंद्याची वाटच लागली आहे का? म्हणजे थिएटरचा धंदा कायमचा बंद पडेल का?

हा प्रश्न थोडा जुनाट आहे. कारण हा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला गेला तेव्हा तेव्हा या क्षेत्रातून अपेक्षेबाहेर उत्तर मिळालं आहे. उदाहरणार्थ, व्हिडीओ कॅसेटच्या जमान्यात हाच प्रश्न विचारला गेला. जेव्हा केवळ चित्रपटांना वाहिलेली टीव्ही चॅनेल्स आली तेव्हाही हाच प्रश्न विचारला गेला. आयपीएलच्या पहिल्या सिझनच्या आधी हाच प्रश्न उभा होता. या सर्व समस्या आल्या तेव्हा सुरुवातीला काही दिवस धंदा कमी झाला हे सत्य आहे, पण नंतर बर्‍याच चित्रपटगृहांच्या मालकांनी परिवर्तनाचे धोरण राबवले आणि धंदा पहिल्यापेक्षा जोरात चालायला लागला.

आता महत्वाचा प्रश्न असा की हे इतकं मोठं किर्तन करण्याची 'बोभाटा' ला काय गरज आहे? तर वाचकहो, त्याचं असं आहे की चित्रपट- थिएटर - या उद्योगातून मोठी रोजगार निर्मिती होते. फारसे शिक्षण न घेतलेल्या पण थोडेसे काही कौशल्य असलेल्या अनेक तरुणांना भरपूर उत्पन्न मिळवून देणारे हे क्षेत्र आहे.  त्यावर या मंदीचे काय परिणाम होतील याचा आम्ही अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमधून नक्की सांगा.

(या लेखात पिव्हीआर या कंपनीचे नाव केवळ योग्य संदर्भ म्हणून घेतले आहे. पिव्हीआरच्या बिझनेस मॉडेलवर टिका करणे हा लेखाचा उद्देश नाही. )

सबस्क्राईब करा

* indicates required