द गेमचेंजर : निलेश साबळे !!!

सिनेमात काम करायचं  म्हणून धडपडणाऱ्या हजारो तरूणांमधे तो ही होता. डाॅक्टरकीचं शिक्षण घेतल्यानंतर मेडिकलची प्रॅक्टीस करायची सोडून भलतीच प्रॅक्टीस करायला निघाला होता. 

हे रूपेरी स्वप्नच माणसाला नादी लावतं. तोही या स्वप्नानं पूर्णपणे पछाडला होता. त्याकरता लागणारं सर्व स्ट्रगल त्याने मनापासून आणि प्रामाणिकपणे केलं. त्याचवेळी त्याच्या बरोबरचे काही स्ट्रगलर्स थोडेफार यशस्वी होत होते, पण याचं स्ट्रगल काही संपायचं नाव घेत नव्हतं.  पण त्याने जिद्द सोडली नाही.

लहान मोठ्या पडद्यावर दिसणारे आणि लीड रोल्स करणारे तेवढे स्टार आणि बाकीचे सगळे लवंगी बार अशी परिस्थिती होती. कदाचित त्याच्याकडे ते हीरो मटेरियल नसावं. किंवा या चंदेरा दुनियेच्या खेळाचे नियम त्याला जमत नसावेत. 

पण या चंदेरी दुनियेच्या एथिक्सना तो जागला. त्यानं खेळाचे नियम बदलायचा अट्टहास केला नाही की त्याबद्दल कधी तक्रार केली नाही. या रंगमंचावर आपलं स्थान निर्माण करण्याकरता त्याने खेळच बदलून टाकला. वक्तृत्व , नकला करण्याची हातोटी, हजरजबाबीपणा, कुशाग्र बुद्धीमत्ता आणि प्रचंड मेहनत या जीवावर त्याने हिरो बनण्याची चाकोरी सोडून स्वत:चा नविन ट्रेन्ड आणला. 

'फु बाई फू'च्या रंगमंचावरून ॲंकर म्हणून पदार्पण करीन त्याने यशाची नवनवीन शिखरं काबीज केली. ॲंकर, लेखक, दिग्दर्शक, निर्माता .. एक एक पायरी दमदारपणे चढत गेला.

आजच्या घडीला त्याला स्वत:लाच नाहीतर इतर अनेक विनोदवीरांना चंदेरी दुनियेत मानाचं स्थान मिळवून देण्यात त्याचा मोठा हातभार आहे. भारतरत्न सचिन असो की सल्लूभाय,  प्रत्येकजण त्याच्या कार्यक्रमात शोमधे हजेरी लावून जायला उत्सुक असतो.

कार्यक्रमाच्या नामावळीत कोणीही असो, आज ॲंकरच्या जागी असणारा डाॅ.  निलेश साबळे पूर्ण पडदा व्यापून उरतोय.

 

लेखक : यशोधन वर्तक

सबस्क्राईब करा

* indicates required