computer

घरातून पळून आलेल्या प्रेमी युगुलांना या महादेवाच्या मंदिरात संरक्षण मिळते.कुटुंब लग्नासाठी सहमत होईपर्यंत मंदिराचे पुजारी त्यांची काळजी घेतात

प्रत्येक गावाची वेगवेगळी ओळख असते. गावात असे एकतरी जुने देवस्थान असते ज्यावर तिथल्या लोकांची अपार श्रद्धा असते. तिथे काही परंपरा पिढ्यानपिढ्या पाळल्या जातात. हिमाचल प्रदेशातील कुल्लूच्या शांगढ गावात एक शंकराचे मंदिर आहे. या मंदिराची खूप मनोरंजक कथा आहे. इथल्या शांगचुल शंकर मंदिराबद्दल असे सांगितले जाते की घरातून पळून आलेल्या प्रेमी युगुलांना इथे संरक्षण मिळते. स्वतः महादेव त्यांचे रक्षण करतो. चला पाहूयात या मंदिराची रंजक कथा!
 

हिमाचल प्रदेश आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तिथल्या परंपरांमुळेही ओळखला जातो. हिमाचल प्रदेशात सुमारे दोन हजार मंदिरे आहेत आणि जवळजवळ प्रत्येक मंदिराची स्वतःची मनोरंजक कथा आहे. कुल्लूचे शांगढ हे गाव सैंज खोऱ्यात वसलेले आहे. इथे असलेले शांगचुल महादेव मंदिराचे क्षेत्र १०० गुंठ्याच्या जमिनीवर पसरलेले आहे. याच्याभोवती दाट पाइन वृक्ष आहेत. वुडकट शैलीत बांधलेले हे मंदिर शानगडच्या सौंदर्यात आणखीनच भर घालते. असे मानले जाते की महादेव स्वतः घरातून पळून या मंदिरात आलेल्या प्रेमी युगलांचे रक्षण करतात. जोपर्यंत हे जोडपे मंदिराच्या हद्दीत आहेत, त्यांचे नातेवाईक त्यांना काहीही करत नाहीत. यांचे कुटुंब दोघांच्या लग्नासाठी सहमत होईपर्यंत मंदिराचे पुजारी त्यांची काळजी घेतात. गावातील लोक देवाच्या आज्ञेने या जोडप्यांचे रक्षण करतात.

इथे काही नियम काटेकोरपणे पाळले जातात. जसे दारू, सिगारेट आणि चामड्याच्या वस्तू इथे आणण्यास मनाई आहे. येथे शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे. इथे कोणीही मारामारी किंवा भांडणे करू शकत नाही. उत्तर भारताच्या सर्व भागातून हजारो लोक दरवर्षी या मंदिराला भेट देतात. पांडवांनी वनवासात येथे काही काळ घालवला होता अशीही या मंदिराबद्दल एक धारणा आहे. लोककथांमध्ये असे म्हटले आहे की वनवासात राहिलेल्या पांडवांचा पाठलाग करून कौरवही तेथे पोहोचले. तेव्हा शांगचूल महादेवाने कौरवांना थांबवले होते आणि असे आशीर्वाद दिले होते की या मंदिराच्या आश्रयाखाली आलेल्या कोणालाही समाज काहीही करू शकणार नाही.

काही श्रद्धा या कुठल्याही शास्त्रीय नियमात बसत नाहीत. ही गोष्ट खरी खोटी हे सांगता येणार नाही.पण प्रेमी जीवांसाठी हे एक सुरक्षित स्थान मानले जाते हे नक्की!!

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required