computer

२०१६ चे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट :यांतला तुमचा फेव्हरिट कोणता ??

      बघता बघता २०१६ हे वर्ष संपलंही. या वर्षात बॉक्स अॉफीसवर अनेक चित्रपट आले आणि गेलेही. पण काही मोजक्या चित्रपटांनी यावर्षीही भरपूर गल्ला जमवलाय. बघूया कमाईच्या बाबतीत कोणते चित्रपट टॉपवर राहिले ते... 

फॅन

चेन्नई एक्स्प्रेस आणि दिलवाले या चित्रपटांना दमदार यश मिळाल्यानं शाहरुखचा हा चित्रपटही एप्रिल मध्ये मोठ्या दिमाखात प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाला फक्त ८५ कोटींपर्यंतच मजल मारता आली. यशराज फिल्म्सचं बॅनर आणि शाहरुखची स्टारडमही इथे फिकी पडली. 

शिवाय

या सिनेमातून बर्‍याच दिवसांनी अजय देवगण पडद्यावर दिसला. अजयनं स्वतः निर्मिती केलेला हा चित्रपटही प्रेक्षकांना हवा तितका आवडला नाही. अजय शिवाय यात दुसरा ओळखीचा चेहराच दिसत नाही. तरीही या चित्रपटाने कशीबशी १००.२५ कोटी रुपयांची कमाई केली.

हाऊसफुल्ल 3

हाऊसफुल्ल आणि हाऊसफुल्ल 2 या चित्रपटांच्या या पुढच्या सिक्वेलनं १०७.७० कोटींचा गल्ला जमवला. अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, बोमन ईराणी या टोळीने जमेल ती रटाळ कॉमेडी करून १०० कोटी क्लब मध्ये स्थान मिळवलंच. 

ऐ दिल है मुश्किल

करण जोहरचा हा प्रेमसंबंधावर आधारित चित्रपट मात्र प्रेक्षकांना आवडला. अनुष्का शर्मा, रणबीर कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन या तगड्या कलाकारांच्या जीवावर या चित्रपटानं ११२.३९ कोटींची कमाई केली. 

रूस्तम

एकेकाळी गाजलेल्या नानावटी हत्याकांडावर आधारित या चित्रपटात अक्षयच्या नेवी अॉफीसर लुकने बरीच हवा केली. या चित्रपटातने १४२.२७ कोटी रुपयांची कमाई केली.

एयरलिफ्ट

भारताकडून करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या बचाव कार्यावर बेतलेला हा चित्रपट २२ जानेवारीला प्रदर्शित झाला होता. अक्षय कुमारच्या या चित्रपटानंही १३२ कोटींची कमाई केली. 

एम.एस.धोनी - द अनटोल्ड स्टोरी

क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीच्या खऱ्याखुऱ्या जीवनावर बनवलेल्या या बायोपिकनं १३२ कोटींची कमाई केली. सुशांत सिंग राजपूतनंभूधोनीच्या भुमिकेवर घेतलेली मेहनत बर्‍यापैकी फळाला आली. 

सुलतान

या वर्षी प्रदर्शित झालेला सलमान खानचा हा एकमेव चित्रपट. आणि सलमान खान आहे म्हटल्यावर चित्रपटाची कमाईही दमदारच असणार. या चित्रपटानं चक्क ३०० कोटींची गल्लाभरू कमाई केली. कुस्तीवर आधारीत हा चित्रपट होता. यात अनुष्काचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 

दंगल

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या दंगलनं फक्त ३ दिवसात १०७.९० कोटींचा टप्पा गाठलाय. महावीर फोगट, गीता फोगट आणि बबिता फोगट यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट सर्वांची वाहवा मिळवताना दिसतोय. सुलतान नंतर दंगल हा कुस्तीवर आधारीत यावर्षीचा दुसरा चित्रपट आहे. 


एकंदरीत यावर्षी शाहरुखचा बोलबाला नसला तरी आमिर आणि सलमाननं मात्र बॉक्स अॉफीसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. दुसरीकडं यावर्षी अक्षय कुमारचे एकापाठोपाठ एक असे तीन चित्रपट १०० कोटी क्लब मध्ये सामील झालेत. पाहूया आता येणाऱ्या नविन वर्षात आणखी कायकाय पहायला मिळतं ते....

सबस्क्राईब करा

* indicates required