computer

हसत खेळत समजून घ्या शेअर बाजार कसा वरखाली होतो !

आपल्या वाचकांपैकी ज्यांनी गेल्या आठवड्यात  शेअर बाजारावर नजर ठेवली असेल त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की बाजार दिवसभरात बराच वरखाली होतो आहे. बाजार मिनीटा मिनीटाला वरखाली होतो आहे. सकाळी ७०० पॉइंट वर असेल तर दुपारी २०० पॉइंट खाली घसरलेला असेल. तर बंद होता होता पुन्हा उसळून वर आला असेल. बाजाराच्या भाषेत या हालचालींना 'अनप्रेडीक्टेबली व्होलाटाइल' असे म्हणतात. 'अनप्रेडीक्टेबली व्होलाटाइल' म्हणजे अगदी तज्ञ माणसं पण ज्याच्या हालचालीवर भाष्य करू शकत नाही असे मार्केट ! 

पण शेअर बाजार  नेहेमीच असा असतो का ? - नाही. शेअर बाजार रोजच वरखाली होत असतोच पण दिशाहीन कधीच नसतो.  चला आज समजून घेऊ या शेअर बाजार कसा चालतो.

स्रोत

बुल मार्केट - म्हणजे सगळं काही चांगलंच होणार आहे असा मूड असलेला बाजार. 

बेअर मार्केट - म्हणजे आता काही खरं नाही असा मूड असलेलं मार्केट. 

लिस्टलेस मार्केट म्हणजे - काय कळत नाही बॉ नक्की काय होणार आहे या जगाचं ! असा मूड असलेलेलं मार्केट.

रेंज बाउंड मार्केट -  हा सावध पवित्रा असलेला बाजार !

पण ही माहिती अगदी रुक्ष अशा शब्दात झाली. 

स्रोत

खर सांगायचं तर हे सगळे मनाचे खेळ असतात. डोळ्यांना दिसणारी, कानावर पडणारी, मेंदूला पेलणारी, मनाशी खेळ करणारी माहीती बाजारातले शेअरचे भाव खालीवर करत असते . मनातल्या भावना आणि विचार यांच्या कुस्तीत जी हारजीत होईल त्यावर खरेदी आणि विक्री अवलंबून असते. 

आता तुम्ही म्हणाल फंडामेंटल थिअरी वाले पैलवान - टेक्नीकल थिअरीवाले कविलोक हेच मार्केट ठरवतात. पण वाचकहो ती कोणी काही असू देत आहेत तर माणसंच नाही का ?

चला आमचे हे फंडे आपण आज जरा मनोरंजक पध्दतीने समजून घेऊ या ! 

कल्पना करा, एका मोठ्या हॉलमध्ये लग्नासाठी योग्य आणि उत्सुक तरुणींचा मेळावा जमला आहे. स्टेजवर मॅरेज काउन्सीलर येऊन मुलाची माहीती देणार आहे. मुलाबद्दल मोजक्या काही विधानात ही माहीती दिली जाणार आहे. जे विधान आवडेल त्या विधानाला संमती देण्यासाठी हात उंचावून होकार द्यायचा आहे. समजा पुढचे विधान नाही आवडले तर हात खाली घेण्याची मुभा आहे.

१ मुलगा अमेरीकेत असतो.

काँप्युटरवाला असेल तर बरंच आहे, आजकाल त्यांना खूप पैसे मिळतात म्हणे, या विचाराने बहुतेक मुलींचे हात वर जातात.  

 

२ मुलगा सिलीकॉन वॅलीत नाही-

मुली विचार करतात "म्हणजे नुस्ताच इंजीनीयर दिसतोय म्हणजे नोकरीचा काही भरवसा नाही या काळात" काही हात खाली येतात.

३ मुलगा टेक्सासला असतो ,भारतासारखं हवामान आहे

मग ठीकच आहे बाई, नाहीतरी मला थंडी नस्ती सहन झाली आणि टॅक्स पण कमी आहेत म्हणतात त्या टेक्सासात ! असा विचार करून काही मुलींचे हात हात वर जातात.

४ अमेरीकेत असला तरी भारतीय नाही

म्हणजे तिकडचा असेल आमच्या घरचे काही ऐकणार नाहीत, 'आमच्या आख्ख्या खानदानाचं नाव खराब होईल' असा काही विचार करून बरेचसे हात खाली जातात. (पण वैयक्तिक विचार वेगळा असल्याने आधी हात खाली घेऊन काही वर पण येतात)

५ आईवडील भारतीय होते आता अमेरीकेचे नागरीक आहेत.

अय्या, आधी सांगायचं ना !

असं पुटपुटत बरेचसे हात पुन्हा वर येतात

६ मुलगा सावळा आहे

हे नुस्तच सांगायला ,प्रत्यक्षात काळा डोंब असणार असा विचार करून काही हात खाली येतात.

७ वार्षिक उत्पन्न ३ कोटी रुपयाच्या आसपास आहे.

काळा तर काळा, रंग काय आपल्या हातात असतो का ?

तो  काळा कृष्ण, मी गोरी रुक्मिणी असं म्हणायचं आणि घालयची गळ्यात माळ !!

खाली गेलेले हात पुन्हा वर येतात.

८ मुलगा चेन स्मोकर आहे.

ईईई !! नको गं बाई, कसली स्थळं आणतात हे लोक / अय्या, कसलाच हिरो दिसत असणार, मला आवडतो सिगरेटचा वास  !!

एकाच वेळी संमिश्र विचाराने हात -वर -खाली -वर अशा हालचाली होतात.

९ मुलाचे काका इकडे खासदार आहेत

कसलंच छान स्थळ म्हणायचं, इकडे चांदी, तिकडे सोनं लॉटरीच लागली गं बाई !!

बहुतेक मुलींचे हात वर जातात.

१० काही दिवसांनी मुलगा भारतातच कायम यायचा विचार करतोय

काय बाई हे ? उगाचाच हात वरखाली करण्याचा व्यायाम करायचा . मी तर आता गप्पच बसणारे !

जवळजवळ सगळेच हात खाली येतात.

 

११ खासदार काकांना मूलबाळ नाही म्हणून नंतर त्यांचं सगळं काही त्यालाच मिळणारे !!

हा तर अगदी माझ्यासाठीच ! मनात आलं तर इथे मनात आलं तर तिकडे, सगळ्या मुलींचे हात वर जातात.

 

तर वाचक मंडळी , बघीतलंत प्रत्येक विधानानंतर प्रत्येक मुलीचे मन वर खाली होत असते . शेअरबाजारात पण बातम्या अशाच पध्दतीने येत असतात आणि त्या ऐकून वाचून समजून खरेदी -विक्री होत असते. सकाळी नऊ ते दुपारी साडे तीन या सहा तासात कितीतरी इन्फर्मेशनचे तुकडे येत असतात, जात असतात . प्रत्येक तुकड्यासोबत एक दोन रुपयांचा फरक पडत असतो. 

मार्केट चालत असतं ते असं !

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required