भाग २- २०२२ सालचे फोर्ब्स 30 under 30!! पाहा या युवापिढीची गरूडझेप!!
आजची तरुण पिढी म्हणजे आळशी आणि फक्त मोबाईलमध्ये घुसलेली असा सूर सगळीकडे ऐकायला मिळतो. मोबाईलमध्ये घुसून गेम्स खेळणे आणि गप्पा मारणे. फोटो ,व्हिडीओ काढणे एवढ्याच गोष्टी मुलं करतात का? खरंतर ही नाण्याची एकच बाजू आहे.आज जग झपाट्याने बदलत आहे. नवनवीन टेक्नॉलॉजीचा आविष्कार होत आहे. आजची हुशार तरुणाई शिकून मिळालेल्या संधीचे सोने देखील करत आहे. आपापले कौशल्य दाखवून यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करत आहे. Quick and fast अशी ही पिढी आहे. आपल्या मेहनतीच्या, कल्पकतेच्या जोरावर आपले अस्तित्व सिद्ध करत आहे. म्हणूनच फोर्ब्स इंडियाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. फोर्ब्स 30 under 30 २०२२ची यादी जाहीर झाली आहे. आणि त्यात आपली भारतीय युवकांनी वर्चस्व सिद्ध केले आहे.
आपण या लेखमालिकेद्वारे थोडक्यात त्यांची आणि त्यांच्या कार्याची ओळख करून घेऊया...
विवान मारवाह, लेखक
कोणत्याही लेखकाला त्याने लिहिलेले पुस्तक जास्तीत जास्त वाचकांनी वाचावे असे वाटते. त्यासाठी त्याचे लेखन कौशल्य महत्वाचे असतेच, याशिवाय त्याची मेहनतही असते. लेखक विवान मारवाह यांचे 'व्हॉट मिलेनियल्स वॉन्ट' हे भारतातील बेस्टसेलर पुस्तक ठरले आहे. त्यासाठी त्यांनी १३ भारतीय राज्यांमध्ये ३०,००० किलोमीटरहून अधिक प्रवास केला आणि ९०० हून अधिक मिलेनियल्स (१९८१ ते १९९६ या काळात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती ) च्या मुलाखती घेतल्या आहेत. यामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्ती आहेत. त्यांचा आयुष्याचा दृष्टीकोन आणि विचार कसे आहेत याविषयी माहिती घेतली आणि त्यावर आधारित पुस्तक लिहिले आहे. ते वाचकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे.
मासूम मिनावाला, कंटेट क्रिएटर
मिनावाला ही इंस्टाग्रामवर ब्युटी आणि फॅशन ब्लॉगर आहे. २०१९ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणारी ती पहिली भारतीय फॅशन इन्फ्लुएंसर आहे. मिनावाला अनेक मोठ्या ब्रॅण्डची ॲम्बेसेडरही आहे आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक बजेटमध्ये फॅशन व्हिडीओ बनवून चांगल्या ब्रँडची माहिती देते. पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय फॅशन ब्लॉगर म्हणून तिने इतिहास रचला. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
निहारिका एनएम, कंटेट क्रिएटर
लॉस एंजेलिसमध्ये राहणारी भारतीय तरुणी निहारिका एनएम सध्या शिकत आहे. ती विनोदी व्हिडिओ क्रिएटर आहे. तिचे ७० लाखाहूनहून अधिक YouTube फॉलोअर्स आणि इंस्टाग्रामवर २ कोटी फॉलोअर्स आहेत. तिचा व्हिडिओ, 'लिव्हिंग अलोन 101,' इंस्टाग्रामवर व्हायरल झाला होता. १५ दिवसांत त्याला १ कोटी पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. निहारिका NM ला कान्स येथे 'युथ आयकॉन - एंटरटेनमेंट ऑफ द इयर 2022' हा किताब सुद्धा मिळाला आहे .
सोनिया कुंदनानी आणि दर्शन शाह, सहसंस्थापक - न्यूजरीच
अहमदाबादमध्ये न्यूजरीच ही एक मीडिया कंपनी आहे. ती स्थानिक व्यावसायिक आणि पत्रकारांना डिजिटल प्लॅटफॉर्म देते. २०१८ मध्ये दर्शन शाह आणि सोनिया कुंदनानी यांनी ही कंपनी सुरू केली होती. NewsReach प्रकाशकांना स्थानिक बातम्यांचे डिजिटायझेशन करु देते आणि त्यासाठी मेंबरशीप फी आकारते. लॉन्च झाल्यापासून NewsReach ने २००० हून अधिक स्थानिक बातम्या प्रकाशकांचे नेटवर्क तयार केले आहे. यामध्ये भारतातील २०० शहरांचा समावेश आहे. NewsReach ने JITO एंजल नेटवर्क, CIIE इनिशिएटिव्ह स्टार्टअप ओएसिस आणि मार्क वॉल्श यासह विविध गुंतवणूकदारांकडून तब्बल $१५०,००० इतका निधी उभारला आहे.
रणवीर अल्लाबदिया आणि विराज शेठ, सहसंस्थापक - मॉन्क एंटरटेनमेंट
२०१७ साली विराज शेठ आणि रणवीर अलाहाबादिया यांनी मॉन्क एंटरटेनमेंट ही एक डिजिटल मार्केटिंग फर्म सुरु केली. त्यावेळी त्यांच्याकडे ऑफिससाठी मोठी जागाही नव्हती. एका गॅरेजमध्ये त्यांनी काम सुरु केले. त्यांची कंपनी व्हिडीओ प्रोडक्शन, सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि मार्केटिंग करते. दोघांनी खूप मेहनत घेऊन आज मॉन्क एंटरटेनमेंटला ३० करोड दर्शकांपर्यंत पोहचवले आहे. सध्या त्यांचे ८० पेक्षा जास्त ग्राहक आहेत. फॅशन ते फिटनेस या सर्व क्षेत्रात त्यांनी नाव कमावले आहे.
आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.
शीतल दरंदळे




