जगात सर्वाधिक इन्स्टा-लाईक्स मिळवणाऱ्या या अंड्यात काय खास आहे? आता तर हे गिनिज बुकातही पोचले!!

भल्या भल्या मोठ्या सेलब्रिटींना टक्कर देणारी माणसे तुम्ही आजवर अनेक पाहिली असतील. या सेलब्रिटींना अनेक बाबतीत सामान्य लोक ओव्हरटेक करतात याचीही उदाहरणे सापडतील. पण २०१९ साली एक अफाट म्हणावी अशी घटना घडली. कायली जेन्नर नावाच्या कोट्यवधी लोकांच्या गळ्यातल्या ताईत असलेल्या हॉलीवूड सेलेब्रिटीला एका कोंबडीच्या अंड्याने ओव्हरटेक केले होते.

जगभरातील अनेक सेलेब्रिटी असे असतात, ज्यांच्या इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोअर्स असतात आणि त्यांच्या एकेका पोस्टवर लाखो लाईक्स किंवा रिॲक्शन्स येतात. कायली जेन्नर ही जगभर प्रसिद्ध असलेली रिऍलिटी स्टार त्यातलीच एक. तिचे इन्स्टाग्रामवर २९८ मिलियन असे अगडबंब फॉलोवर आहेत.

२०१८ साली या कायलीताईंनी त्यांना झालेल्या मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. त्यांच्या स्टोर्मी नावाच्या मुलीच्या या फोटोला तब्बल १८ मिलियन लाईक्स आले. जगात एखाद्या पोस्टला असलेले हे सर्वाधिक इंस्टाग्राम लाईक्स ठरले होते. याला उत्तर म्हणून एक इन्स्टाग्रामवर एक अकाऊंट सुरू झाले. वर्ल्ड रेकॉर्ड एग असे नाव या अकाऊंटचे नाव होते. यात एका अंड्याचा फोटो अपलोड करण्यात आला आणि त्याला कॅप्शन देण्यात आले की, "आपण सर्व मिळून कायली जेन्नरच्या सर्वाधिक लाईक्सचा विक्रम मोडून या फोटोला सर्वाधिक लाईक्स मिळवून देऊया."

४ जानेवारी २०१९ ला ही पोस्ट करण्यात आली. खरंतर एक साधी पोस्ट होती. पण ही पोस्ट भराभर शेअर होत गेली आणि के कमाल!! एका अंड्याने जगातल्या प्रमुख सेलेब्रिटींच्या लाईक्सचा विक्रम फक्त १० दिवसांत मोडून काढला. या फोटोला आजवर तब्बल ५५ मिलियन लाईक्स मिळाले आहेत. म्हणजे कायलीच्या फोटोपेक्षा तिप्पट झेप या फोटोने घेतली.

या गोष्टीचा पुन्हा विषय येण्याचे कारण म्हणजे आता या अंड्याचे नाव थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. गिनीज बुककडून अधिकृतपणे तसे जाहीर करण्यात आले आहे. या घटनेवरून एक गोष्ट पक्की झाली आहे ती म्हणजे सोशल मीडियावर सुरू झालेला ट्रेंड जगात कोणतीही उलथापालथ घडवू शकतो.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required