मनी हाईस्टचा नवा सीझन बघण्यासाठी कंपनी म्हणतेय सुटी घ्या, 'नेटफ्लिक्स अँड चिल'चा हा नवा मंत्र लोकांना कसा वाटतोय?

देशात लॉकडाऊन लागला आणि लोकांकडे वेळच वेळ असायला लागला. जगात आणि देशात तोवर वेबसिरीजचा चाहता वर्ग वाढला होता. वेबसिरीज म्हणजे बिंज वॉचिंग आणि बिंज वॉचिंग म्हणजे किमान ५ ते १० तासांचा वेळ!! त्यातही अनेक सीझन असतील तर अजून जास्तवेळ खर्च होतो. मग सिरीजप्रेमी रात्र रात्र जागून संपूर्ण सिरीज बघून काढतात.

काही सिरीजनी लोकप्रियतेचे सर्वच विक्रम मोडले. मनी हाईस्ट ही अशीच एक वेबसिरीज. 'ला कासा दा पापेल' असे तिचे मूळ स्पॅनिश नाव. तर या मनी हाईस्टचा नवा सीझन आज रिलीज होत आहे. लोक तर कधीपासून वाट पाहत असल्याने कित्येकांनी आज ऑफिसला सुट्ट्या टाकल्या असतील.

पण जयपूरच्या एका आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ही सिरीज पाहण्यासाठी चक्क एक दिवसाची सुट्टी दिली आहे. एखादा शो पाहण्यासाठी पूर्ण ऑफिसला सुट्टी दिली जाण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. आता या कंपनीची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

जयपूर येथे वेर्वेलॉजिक नावाची मोबाईल ऍप डेव्हलपमेंट कंपनी आहे. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना रोजच्या बोअरिंग मेल्सचा कंटाळा येत असला तरी काल आलेला मेल त्यांना सुखद धक्का होता. कारण त्यांना नेटफ्लिक्स अँड चिल असा मेल करत कंपनीने सिरीज पाहण्यासाठी एका दिवसाची सुट्टी घोषित केली होती.

कंपनीने दिवसभराचा टाईमटेबलच कर्मचाऱ्यांना बनवून दिलाय जो पूर्णपणे गंमतीशीर आहे आणि त्यात कामाचा कुठलाही समावेश नाही. यावर खुद्द नेटफ्लिक्स इंडियाने ट्विट केले आहे. त्यांनी उद्या आता लोकांना बँकेचे काम सांगून ऑफिसला दांडी मारायची गरज नाही असे ट्विट केले आहे.

सिरीजप्रेमी नेटकऱ्यांनी पण यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ही कंपनी जॉईन करायची प्रोसेस काय असे पण विचारले आहे. काहींनी कंपनीने कर्मचाऱ्यांना सुट्टी देऊन त्यांना पण खुश केले आणि स्वतःची मार्केटींग पण करून घेतली असे म्हणत कंपनीच्या डोक्यालिटीचे कौतुक केले आहे. काहीही असले तरी त्यांचे कर्मचारी मात्र आज खूप खुशीत असतील.

सबस्क्राईब करा

* indicates required