भारतातल्या पहिल्या महिला कलाकाराच्या चार पिढ्यांनी गाजवली मराठी सिनेसृष्टी.. सांगू शकता का हे चारजण कोण असावेत?

पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला म्हणून ३ मे हा दिवस  खास मानला जातो. तसाच ६ सप्टेंबर हा दिवससुद्धा तितकाच खास आहे बरं. विशेषतः मराठी माणसासाठी तर नक्कीच खास आहे. ६ सप्टेंबर आहे भारतातील पहिल्या स्त्री कलाकाराचा  जन्मदिवस. त्यांचं नाव होतं कमलाबाई गोखले !!

साल १९१३ - दादासाहेब फाळकेंनी राजा हरिश्चंद्र तयार केला होता आणि ते त्यांच्या दुसऱ्या फिल्मच्या तयारीत होते. फिल्मचं नाव होतं ‘मोहिनी भस्मासुर’ !! ‘राजा हरिश्चंद्र’ तयार करताना एकही स्त्री कलाकार मिळाली नव्हती.  म्हणून शेवटी त्यांना अण्णा साळुंखेंना तारामतीच्या वेशात उभं करावं लागलं होतं. दुसऱ्या फिल्ममध्ये मात्र त्यांना मुख्य स्त्री भूमिकेसाठी खरीखुरी स्त्री हवी होती. पुन्हा राजा हरिश्चंद्रच्या वेळी केलं तसा त्यांनी शोध सुरु केला. यावेळी त्यांना कोणी तरी कमलाबाई कामत यांचं नाव सुचवलं. सुदैवाने कमलाबाई या भूमिकेसाठी तयार झाल्या आणि नुकत्याच जन्मलेल्या चित्रपट सृष्टीला पहिली स्त्री कलाकार मिळाली.

मोहिनी भस्मासुर मधला एक प्रसंग (स्रोत)

कमलाबाई गोखले त्याकाळात रंगमंचावर वयाच्या अवघ्या ४ वर्षापासून काम करत होत्या. त्यांनी रंगभूमी गाजवली होती. त्यांनी फिल्ममध्ये काम करण्यास तयारी दाखवल्यावर त्यांना चारी बाजूने विरोध झाला. सामान्य लोक तर बोलत होतेच, पण दिनानाथ मंगेशकर यांच्यासारख्या बड्या कलाकारांनी सुद्धा त्यांना विरोध केला. शेवटी सर्व विरोध झिडकारून त्यांनी ‘मोहिनी भस्मासुरम’ मध्ये काम केलंच. त्यांच्यासोबत पार्वतीच्या रोलसाठी त्यांच्या आईची निवड झाली. दोघींनी फिल्ममध्ये काम करून नवीनच पायंडा घालून दिला. 

कमलाबाई कामत यांनी त्यांच्या आई दुर्गाबाईंसोबत लहान वयात नाटकात काम करायला सुरुवात केली होती. एक वेळ अशी आली की त्यांची संस्था ६ महिन्यांसाठी बंद पडली आणि त्यांच्याकडे काम नव्हतं. याच काळात दादासाहेबांनी त्यांना फिल्ममध्ये काम देऊ केलं. त्याकाळात त्यांना निर्णय घेणं अवघड गेलं. पण शेवटी त्यांनी पहिलं पाऊल उचलेलं बघून इतर महिला पुढे आल्या. आज चित्रपटातल्या स्त्री कलाकारांना जे महत्व आहे त्याची सुरुवात इथूनच झाली.

कमलाबाई गोखले (स्रोत)

कमलाबाई कामत यांचं रघुनाथराव गोखले यांच्या सोबत लग्न झालं आणि त्या कमलाबाई गोखले झाल्या. कमलाबाई काम करत होत्या तो काळ नाटकांच्या सुवर्णयुगाची समाप्तीचा काळ होता. कारण किर्लोस्करसारखी प्रमुख नाटक कंपनी बंद पडली होती. रघुनाथ गोखले यांनी किर्लोस्करची कमी भरून काढण्यासाठी ‘चित्ताकर्षक नाटक मंडळी’ची स्थापना केली. या कंपनीच्यामार्फत नव्याने नाटकांची निर्मिती होऊ लागली. या कंपनीमधून कमलाबाईनी काम केलं. पुढे चित्ताकर्षक नाटक कंपनीचं दिवाळं निघालं आणि कंपनी बंद पडली. पण कमलाबाई इथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी फक्त स्त्रियांची अशी ‘मनोहर स्त्री संगीत मंडळी’ ही संस्था उभी केली. महिलांना घराबाहेर पडू न देणाऱ्या काळात त्यांनी फक्त महिलांची नाटक कंपनी काढून काळाच्या पुढची उडी घेतली होती असं म्हणायला हरकत नाही.

चंद्रकांत गोखले (स्रोत)

कमलाबाईंबद्दल अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या तिन्ही मुलांनी कलाक्षेत्रात मोठं नाव कमावलं. चंद्रकांत गोखले, लालजी गोखले आणि सुर्यकांत गोखले अशी त्यांची नावे. यापैकी चंद्रकांत गोखले यांच्या मुलाला आपण सगळेच ओळखतो. त्यांचं नाव विक्रम गोखले !! आज विक्रम गोखले यांचं नाव नाट्यक्षेत्रासह चित्रपटक्षेत्रातही आदराने घेतलं जातं. त्यांच्या अभिनयाला कमलाबाईंचा मोठा वारसा लाभला आहे.

कमलाबाईंसोबत चंद्रकांत गोखले आणि विक्रम गोखले  (स्रोत)

कमलाबाई जवळजवळ वयाच्या ८५ वर्षांपर्यंत चित्रपटात काम करत होत्या. त्यांनी त्यांच्या करियर मध्ये जवळजवळ ३५ चित्रपट आणि २०० नाटकांमध्ये काम केलं. १८ मे १९९७ साली त्यांचं निधन झालं.
मंडळी, अशा या पहिल्यावहिल्या महिला कलाकाराला बोभाटाचा सलाम.

सबस्क्राईब करा

* indicates required