computer

कोटा फॅक्टरी सीझन २: नक्की कुठे आणि काय चुकलंय?तुम्हांला काय वाटतं?

कोव्हीडमुळे आपण घरात बसायला लागलो त्याला आता दीड वर्ष झालं. शाळाकॉलेजेस बंद, क्लासेस बंद, ऑफिसला जायचं तरी अधूनमधून. घरी बसण्याचा कितीही कंटाळा आला तरी पर्याय नाही. सध्या ऑफिस, शाळा, कॉलेज, क्लास, आणि मुख्यतः या ठिकाणी होणारं सोशलायझेशन याचीच बहुतेक लोकांना सगळ्यात जास्त गरज भासत आहे. प्रत्यक्षात नाही तरी टीव्हीवर वगैरे कॉलेजचा एखादा सीन दिसला तरी बरं वाटणारे, त्या आठवणींनी नॉस्टॅल्जीक होणारेही अनेकजण आहेत. त्यामुळेच कदाचित नेटफलिक्सवरील कोटा फॅक्टरी सीझन २ ही मालिका सुरुवातीला आशादायक वातावरण निर्माण करते. कोटा येथील महेश्वरी क्लासेस, डोळ्यांत असंख्य स्वप्नं घेऊन तिथे आलेले विद्यार्थी, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा हा सगळा माहौल डोळ्यांना सुखावून जातो. आधीच्या सीझनमध्ये या मालिकेतलं देखणेपण, वास्तवाच्या जवळ जाणारी गोष्ट, कलाकारांचा उत्तम अभिनय अशी भट्टी चांगली जमलेली असल्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा अजूनच उंचावतात. पण ...

हा 'पण' बराच बोलका आहे.

आयआयटी, त्याभोवती गुंफलेली स्वप्नं, त्यासाठी घ्यायची मेहनत, त्यासाठीची गळेकापू स्पर्धा, आशा-निराशा आणि जय-पराजय यांचा खेळ हा सध्याच्या लेखकांसाठी हिट टॉपिक आहे. यावर थ्री इडियट्ससारखा सिनेमाही येऊन गेला. कोटा फॅक्टरी या मालिकेचा पहिला सीझनपण यावरच आधारित आहे. पण सीझन १ मुळे अपेक्षा उंचावल्या तरी दुसरा सीझन अळणी, बेचव, पचपचीत वाटतो. एखादीला पोळ्या उत्तम जमल्यावर पुढच्यावेळी तिच्याकडून पुरणपोळीची अपेक्षा करणं आणि तिने पुरणपोळी तर जाऊच दे, पोळीही धड न करणं असा हा प्रकार आहे.

कोटा फॅक्टरी सीझन २ मनाचा ठाव घेणं तर सोडाच, पुरेसं मनोरंजनही करत नाही.

एकतर ब्लॅक अँड व्हाईट मीडियमचा अतिवापर नजरेस खुपतो. आयुष्याचे रंग उडून गेलेले विद्यार्थी दाखवण्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट रंगाचा वापर ही कल्पना म्हणून छान वाटते, पण ती डोळ्यासमोर सतत प्रत्येक फ्रेममधून येताना तिचं सौंदर्य कुठल्या कुठे लुप्त होतं. पथ्याचं खाणं तब्येतीला चांगलं म्हणून कोणी अख्खं ताट भरून बेचव, अळणी अन्न खाऊ शकणार नाही तसंच इथेही होतं. त्यामुळे एखादी फ्रेम देखणी असली तरी ती फारसा प्रभाव पाडत नाही.

पहिल्या सीझनमध्ये काही ठिकाणी कॅमेरा अँगल्सचा वापर फार खुबीने केला होता. उदाहरणार्थ, वैभवचं प्रवाहाविरुद्ध पोहणं दाखवताना प्रॉडिजी क्लासमधून बाहेर पडणारा वैभव आणि त्याचवेळी त्या क्लासमध्ये शिरणाऱ्यांची गर्दी हे सर्व टॉप अँगलने दाखवल्याने प्रभावी ठरलं होतं. दुसऱ्या सीझनमध्ये त्या कल्पनेसाठी पुन्हा तेच अँगल्स वापरल्याने मजा निघून गेली आहे. या ठिकाणी एखादा नवीन, हटके प्रयोग केला असता तर निदान कल्पनेची श्रीमंती तरी दिसली असती. पण तेही झालेलं दिसत नाही. उलट सगळीकडे जाणवणारा तोचतोचपणा अंगावर येत राहतो.

'वो भी क्या दिन थे' म्हणून जुन्या काळात रमणाऱ्यांना कदाचित ही मालिका आवडेलही. शिक्षक, बरोबरचे विद्यार्थी, लेक्चर्स, कट्ट्यावर केलेला टाईमपास, बाहेरच्या टपरीवर मिळणारा कटिंग चहा या सगळ्या आठवणी कितीही जुन्या झाल्या तरी शिळ्या होत नाहीत. पण नॉस्टॅल्जीक फील देणारी एक कलाकृती इतपतच या मालिकेची व्याप्ती राहते. नेटफ्लिक्ससारख्या दर्जाच्या बाबतीत अत्यंत चोखंदळ समजल्या जाणाऱ्या चॅनेलकडून यापेक्षा चांगल्या कन्टेन्टची नक्कीच अपेक्षा आहे.

बारावीपर्यंत बऱ्यापैकी करिअर असणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आयआयटी हाच 'सक्सेस मंत्रा' आहे. जणू इतर क्षेत्रं अस्तित्वातच नाहीत! इथे 'बऱ्यापैकी' हा शब्द वापरण्याचं कारण अनेक विद्यार्थी आपली कुवत, आवडनिवड यांचा विचार न करता केवळ आयआयटीचं ग्लॅमर पाहून त्यासाठीच्या रॅट रेस मध्ये धावत राहतात. आपण इथे फिट नाही हे लक्षात येतं तेव्हा अनेकदा वेळ निघून गेली असते. कोटासारख्या कोचिंगच्या 'पंढरी'त इतर आयआयटीभक्तांच्या मेळ्यात एखाद्याला आपलं उणेपण जास्तच तीव्रतेने जाणवू शकतं. त्यातून नैराश्य, न्यूनगंड निर्माण होऊ शकतात. हा पैलू इथे मांडला जाईल अशी अपेक्षा होती. ती इथे फोल ठरते. उलट आयआयटीचं ग्लोरिफिकेशनच केलेलं दिसतं.

दुसऱ्या सीझनमध्ये खुपणारी अजून एक गोष्ट म्हणजे याचा भर मनोरंजनापेक्षा उपदेशावर जास्त दिसतो. त्यामुळे रुटीनला कंटाळून काहीतरी नवीन पाहण्याच्या अपेक्षेने टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांनी मालिकेला नाकारलं तर त्यात नवल नाही. यात जितूभैया How to be awesome या शीर्षकाखाली जे काही सांगतो तो तर अक्षरशः कहर आहे. त्याच्यातल्या अभिनयकौशल्याचा सुमार पटकथेने विचका केल्याचं हे उत्तम उदाहरण! आधीच कोरोनाकाळात स्वच्छता आणि फिटनेस या मुद्द्यांचा चावून चोथा झालेला असताना परत तेच 'ग्यान' सिरीयलमधून मिळणं म्हणजे बसप्रवासाने हाडं खिळखिळी झाल्यावर बैलगाडीत बसण्यासारखं आहे. त्यात फक्त सहनशीलतेचाच कस लागणार.

मात्र इथे बैलगाडीतून उतरण्याचा पर्याय आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे या सफरीदरम्यान तुम्ही सफर (suffer) होत असलात तर खुश्शाल उतरून जा. तुम्ही जितेंद्र कुमारचे अगदीच फॅन वगैरे असाल तर त्याच्या इतर मालिका बघण्याचा पर्याय आहेच की!

सबस्क्राईब करा

* indicates required