क्या बोलते बंटाई?? भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला !!

मुंबई ७० मधून आज आपण वळूया मुंबई ५९ मध्ये. मुंबई ५९ म्हणजे अंधेरी ईस्ट, त्यातल्या त्यात जे. बी. नगरकडे. तर मंडळी, पहिल्या भागात आपण नेझीला भेटलो. दुसऱ्या भागात आपण भेटणार आहोत डिवाइनला. गल्ली बॉय या सिनेमाची कथा जितकी नेझीची आहे तितकीच ती दिवाईनची पण आहे. खरंतर मुंबईच्या अंडरग्राउंड रॅपला गल्ली रॅप ही ओळख मिळवून देण्यात डिवाईनचा मोठा वाटा आहे.
मुंबई ५९ जवळ असणाऱ्या सहारची वस्ती आहे. तिथं डिवाइन राहत असे. डिवाइनचं खरं नाव विवियन फर्नांडिस. त्याच्या घरी परिस्थिती बेताचीच होती. त्यात त्याच्या वडिलांना दारूचं व्यसन. घरची परिस्थिती सुधारण्याचा निर्णय आईने घेतला आणि ती सरळ वर्क व्हिजा मिळवून कतारला कामासाठी निघून गेली. तिथं तिनं कष्ट करून पैसे कमावले आणि इकडे मुंबईत स्वतःची झोपडी विकत घेण्यासाठी पाठवले. डिवाईनच्या कुटुंबानं मुंबईच्या सहारच्या वस्तीत घर विकतही घेतलं. पण वडिलांचं दारूचं व्यसनही तसंच चालू होतं. एकेदिवशी वडिलांनी डिवाईन आणि त्याच्या भावाच्या हातात काही पैसे ठेवले आणि त्यांना सांगितलं, "मी घर विकलं. हे घ्या पैसे आणि निघा इथून". सख्ख्या बापाने घराबाहेर काढल्यानंतर या भावंडांना आईच्या आईनं म्हणजेच आजीनं त्यांना आधार दिला.
डिवाईनला हिप-हॉपची ओळख कशी झाली हीसुद्धा एक गंमत आहे. एके दिवशी त्याच्या एका मित्राने एक टी शर्ट घातला होता. त्या टी-शर्टवर एका आर्टिस्टचा फोटो होता. डिवाईनला तो टी शर्ट आवडला. त्यानं मित्राला हा कोणाचा फोटो म्हणून विचारलं. मित्रानं त्याला फिफ्टी सेंटचं नाव सांगितलं आणि एक mp3 सीडी दिली. त्या एका सीडीत फिफ्टी सेंट, इमिनेम, टुपाक, बिगी स्मॉल या सगळ्यांची गाणी होती. डिवाइन हे सगळं ऐकून भारावून गेला. त्यानं इंटरनेटवरून गाण्यांचे बोल शोधले आणि ती गाणी पाठ करायला सुरुवात केली. या सगळ्यात त्याला मजा येत गेली आणि इथूनच डिवाईनचा रॅपिंगचा प्रवास सुरु झाला.
बाबांनी झोपडी विकल्यावर डिवाइन आजीकडे राहायला गेला होता. ती त्याला दर रविवारी चर्चला घेऊन जायची. त्याच्यावर धर्माचा बऱ्यापैकी प्रभाव होता. याच प्रभावातून डिवाइननं धार्मिक रॅप करायला सुरुवात केली. या कारणामुळंच त्याचं स्टेजनाव म्हणून त्यानं डिवाईन हे नाव निवडलं. सुरुवातीच्या काळात डिवाइन इंग्रजीतून रॅप करायचा. पण मग लवकरच हिंदीमध्ये गाणं करणं कदाचित जास्त फायद्याचं असेल हे त्याच्या लक्षात आलं. त्यानं हिंदीत गाणं तयार केलं आणि त्याचा व्हिडिओ युट्युबवर टाकला. हे गाणं होतं 'ये मेरा बॉम्बे'.
हे गाणं बर्यापैकी हिट झालं. ते इंटरनेटवर टाकल्यानंतर बऱ्याच लोकांनी डिवाइनसोबत संपर्क साधायला सुरुवात केली. याच काळात नेझीने पण त्याचं गाणं युट्यूबवर अपलोड केलं होतं. एके दिवशी सेझ या म्युझिक प्रोड्यूसरने डिवाईनला एक म्युझिक बिट पाठवलं आणि यावर काहीतरी करू या अशी त्याला ऑफर दिली. पण गंमत म्हणजे सेझला स्वतःलाच ते बिट तेवढं आवडलं नव्हतं. दरम्यान डिवाईननं नेझीसोबत संपर्क साधला आणि आपण सोबत हे गाणं करू अशी ऑफर दिली. नेझीलाही सुरुवातीला ती बिट आवडली नव्हती. पण नेझी आणि डिवाईन यांच्या मिलाफातून "मेरे गली मे गली गली गली में" हे गाणं जमून आलं. या गाण्याचा व्हिडिओ अजून रिलीज व्हायचा होता. त्याआधीच एक दिवस या दोघांनी ते गाणं एका ठिकाणी परफॉर्म केलं. तिथे योगायोगाने सोनी म्युझिक कंपनीचा एक अधिकारी हजर होता. हे गाणं ऐकून सोनीनं डिवाईनला साईन केलं आणि हे गाणे स्वतः रिलीज करण्यात रस दाखवला. "मेरे गली में" हे गाणं वायरल झालं आणि या गाण्याने मुंबई अंडरग्राउंड रॅपसाठी एक मैलाचा दगड पार पाडला.
सोनी म्युझिकने साईन केल्यानंतर डिवाईनची गाडी अगदी सुस्साट निघाली. एकापाठोपाठ एक त्याने वेगवेगळी गाणी काढली. त्याच्या एकट्याच्या नावावर शो विकले जाऊ लागले. वेगवेगळ्या रॅपर्ससोबत त्यानं कोलॅबरेशन केलं आणि रॅपमध्ये तो विविध प्रयोग करत राहिला. त्याला बॉलीवूडमध्ये गाण्याची संधी पण मिळाली. मुक्काबाज या पिक्चरमधलं 'पैंतरा' गाणं आठवत असेलच. हे गाणं डिवाईननेच गायलं होतं. आता गल्लीबॉईज सिनेमातही त्याने लिहिलेली गाणी असणार आहेत. कालच रिलीज झालेले आपणा टाईम आयेगा हे गाणं पण त्यांनंच लिहिलंय. "मुंबई अंडरग्राउंड का टाइम आयेगा" म्हणणारा डिवाईन हाच खरा गल्ली बॉय आहे.
https://www.youtube.com/watch?v=jFGKJBPFdUA
आणखी वाचा :