computer

६४ दिवस सलग चाललेला विमानप्रवास!! कुणी आणि का केला हा प्रवास?

विमानात बसायला कुणाला आवडणार नाही? पण तुम्ही किती दिवस विमानात बसू शकाल असे तुम्हाला वाटते? एक दिवस? दोन दिवस? की एक दोन महिने?

हा काय प्रश्न झाला का? विमानात बसायला आवडते म्हणून कोण बरे एक दोन महिने विमानातच बसून राहील? हे झालं तुमचं म्हणणं. पण काही अवलिया असेही असतात ज्यांना जगावेगळे काही तरी धाडसी कारनामे करायची हौस असते. हो दोन महिने म्हणजेच ६४ दिवसांचा विमान प्रवास करणारे अवलिये या जगात आहेत. दोन महिने विमानातच बसून राहण्याची कल्पना कदाचित तुम्हाला अगदीच कंटाळवाणी किंवा खूपच भीतीदायक वाटली असेल, पण वैमानिकांच्या एका जोडगोळीने ही कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणून हिंमत ए मर्दा तो मदद दे खुदा ही म्हण सार्थ करून दाखवली आहे.

तर ही गोष्ट आहे १९५९ मधली. त्यावर्षी लास वेगास येथे हॉटेल हसिंडाचे उद्घाटन होणार होते. हॉटेलचे उद्घाटन अगदी थाटामाटात व्हावे अशी हॉटेल मालकांची इच्छा होती. अर्थातच आपण सुरु केलेल्या एखाद्या प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात जाहिरात व्हावी आणि अनेक लोकांनी तो कौतुक सोहळा पाहण्यास हजर असावे असे वाटणे साहजिक होते. पण लास वेगासच्या धावपट्टीपासून हॉटेलचे अंतर खूप असल्याने मोठ्या संख्येने लोकांना उपस्थित राहता येणार नाही, हेही त्या मालकांना ठाऊक होते. मग आता वाजतगाजत जाहिरात करण्यासाठी काय करावं बरे अशा विचारात असतानाच त्यांना सर्वात अधिक काळ विमान उड्डाण करण्याची कल्पना सुचली. अर्थात त्यांनी स्वतः हे उड्डाण केले नाही. कारण निष्णात वैमानिकांनाही दीर्घकाळ विमानउड्डाण ही कल्पनाच अशक्य वाटली असती.

मग हॉटेल हासिंडाच्या मालकांनी सेस्ना172 नावाचे एक विमान विकत घेतले. विमानातले इंटिरिअर चेंज करून घेतले. त्यात एक बेसिन आणि बेड बसवून घेतला जेणेकरून वैमानिकांना आलटूनपालटून विमान चालवता येईल आणि मधल्या काळात त्यांना विश्रांती घेता येईल. या विमानावर बाहेरच्या बाजूने हॉटेल हासिंडा ही अक्षरे प्लास्टर करून घेतली. सुरुवातीला फक्त पन्नास दिवस उड्डाण करायचे असे ठरले होते, पण नंतर हेच उड्डाण ६४ दिवसांवर गेले. यासाठी बॉब टीम आणि कुक हे दोन वैमानिक निवडण्यात आले.

५० दिवस विमान फक्त आकाशात उडत राहणार. मग त्यात इंधन किती भरावे लागेल आणि जे वैमानिक हे विमान चालवणार त्यांच्या खाण्यापिण्याची सोय काय? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर यावरही त्यांनी एक भन्नाट तोडगा काढला. या विमानासोबत जमिनीवरून एक कार धावत होती जी विमानाला इंधन आणि वैमानिकांना जेवण पुरवत होती.

सलग ६४ दिवस विमानात बसून घालवण्याचा हा विक्रम अर्थातच वैमानिकांसाठी कसोटीचा ठरला हे वेगळे सांगण्याची गरजच नाही. सलग विमान चालवण्यामुळे येणारा थकवा, विमानात कुणीही प्रवासी किंवा सोबती नसल्याने आलेला एकटेपणा, विमानाच्या इंजिनमधून येणारा आवाज असे कित्येक अडचणी तर होत्याच. पण एकदा तर झोप अनावर झाल्याने विमान क्रॅश होता होता वाचले होते. अनेक शारीरिक आणि मानसिक अडचणींना तोंड देत, दीर्घकाळ उड्डाण करण्याचा आपला संकल्प या दोघांनीही पूर्ण केलाच.

हा विक्रम पूर्ण होऊन आज ६० वर्षे झाली. आज तर कितीतरी आधुनिक तंत्रज्ञान अवगत आहे, तरीही अजून हा विक्रम मोडण्याचा कुणीही प्रयत्न केलेला नाही.
तुम्हांला काय वाटते सलग ६४ दिवसांपेक्षा अधिक काळ हवेत विमान उड्डाण करून हा विक्रम मोडणे शक्य आहे का?

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required