computer

मार्व्हल स्टुडिओ : दिवाळखोर ते सर्वात यशस्वी स्टुडिओ!! कॉमिक्स-कर्जबाजारीपणा-यशस्वी सिनेमे हा प्रवास तर जाणून घ्या..

आपल्या प्रत्येकाच्या लहानपणात आपल्या मित्रांबरोबरच आपले साथीदार जर कोण होते तर ते म्हणजे आपल्याला टीव्हीवर किंवा कॉमिक्समध्ये दिसणारे सुपरहिरो! ना कुठले टेन्शन, ना कुठली चिंता. कॉमिक्समध्ये सुपरहिरोच्या कथा वाचून मोठी झालेली पण एक पिढी आहे. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून कॉमिक्समध्ये खिळून बसण्याची पण वेगळी मजा होती.

आपण या सुपरहिरोंच्या सिरीयल, सिनेमे आणि कॉमिक्स वाचून मोठे झालेलो आहोत. विशेष म्हणजे आजही आपली ही आवड कमी झाली नाही. तितक्याच आवडीने आजही ते सिनेमे बघितले जातात. आपल्या आयुष्यात मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा प्रचंड मोठा वाटा आहे. आपले बालपण भन्नाट करणारे सुपरहिरो आयर्नमॅन, कॅप्टन अमेरिका, हल्क, स्पायडरमॅन हे सर्व मार्व्हलचे मार्व्हल्स (चमत्कार) आहेत.

मार्व्हलची प्रत्येक विशेषता आपल्याला आवडते. पोस्ट क्रेडिट सिनसाठी थांबतानाचे कुतूहल हे वेगळ्या स्तरावरचे असते. मार्व्हलचे एक वेगळे महत्व आपल्या सर्वांच्या आयुष्यात आहे. ज्या लोकांनी विशेष असे मार्व्हलचे सिनेमे बघितले नाहीत, त्यांना देखील मार्व्हलबद्दल निश्चितच कुतूहल आहे. पण एक वेळ होती जेव्हा मार्व्हलने खूप वाईट दिवस बघितले आहेत, जेव्हा त्यांच्यावर कर्ज होऊन दिवाळखोर होण्याची वेळ आली होती. या सर्व अडचणींतून त्यांनी कशी भरारी घेतली हेच आज आपण वाचणार आहोत.

एक काळ होता जेव्हा मनोरंजनाची पुरेसी साधने उपलब्ध नव्हती. कॉमिक्सची चलती असण्याचा तो काळ होता. त्यावेळी मार्टिन गुडमन हे साहसकथा, मासिक आणि कॉमिक्सच्या माध्यमातून प्रकाशक म्हणून प्रसिद्ध झालेले नाव होते. कॉमिक्स मार्केटचा आणखी फायदा करून घेण्यासाठी त्यांनी सुपरहिरो कॉमिक्स प्रकाशित करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी टाईमली प्रकाशन स्थापन केले.

या प्रकाशनाकडून काढण्यात आलेले पहिले कॉमिक्स म्हणजे मार्व्हल कॉमिक्स नं १, यात ह्युमन टॉर्च आणि सब मरीनर असे दोन सुपरहिरो होते. १९३९ साली स्टॅनली मार्टिन लिबर यांनी टाईमली प्रकाशनात ऑफिस असिस्टंट म्हणून नोकरी केली. हे तेच स्टॅनली आहेत ज्यांचा ठसा प्रत्येक मार्व्हल चाहत्याच्या मनावर उमटला आहे. स्टॅनली यांच्याबद्दल अजून एक गोष्ट म्हणजे त्यांनी दुसऱ्या महायुद्धात लष्करात काम केले आहे.

१९४० पासून कॅप्टन अमेरिका कॉमिक नंबर १ च्या माध्यमातून एन्ट्री झाली ती कॅप्टन अमेरिका या सुपरहिरोची. कॅप्टन अमेरिका युद्ध-लष्कर अशा पार्श्वभूमीतून आला आहे हे आपल्याला माहीत आहे. पण त्यामागील कारण म्हणजे त्याकाळी जगभर असलेले युद्धाचे वातावरण आहे. या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी कॅप्टन अमेरिका कॉमिक्समध्ये सादर करण्यात आला होता.

पुढे दुसरे महायुद्ध संपले आणि लोकांचा सुपरहिरोंमधून इंटरेस्ट संपत गेला. स्टॅनली यांनी देखील मग हे सुपरहिरो कॉमिक्स आवरते घेण्याचे ठरवले. याचवेळी त्यांनी अटलास कॉमिक्स म्हणून नवे नाव धारण केले. १९५६ साली मग मार्व्हलचे पर्मनंट स्पर्धक डिसीने त्यांचे हिट कॉमिक्स जस्टीस लीग मार्केटमध्ये आणले. आता इकडे पण स्टॅनली आणि मंडळींना आपण यात उतरले पाहिजे असे वाटले. अटलासचे नाव बदलून आता अधिकृत नवे नाव देण्यात आले. ते म्हणजे मार्व्हल!!! इथून डीसी आणि मार्व्हल खरी स्पर्धा सुरू झाली.

स्टॅनली हा कॉमिक्समधला जादूगार आज जरी समजला जात असला तरी हाच तो काळ होता, जेव्हा त्याने जादू करायला सुरूवात केली. या काळात त्याने एकेक करत फँटास्टिक फॉर, हल्क, स्पायडरमॅन, डॉ. स्ट्रेंज, एक्स मेन असे सुपरहिरो बाजारात आणले. आज दिसणारी मार्व्हलची बहुतांश पात्रे हे १९६० ते १९८० या काळात पडद्यावर आली आहेत.

१९७७ साली पहिल्यांदा स्पायडरमॅन सिनेमा टीव्हीवर आला. त्याच्या पुढच्याच वर्षी सीबीएस वर डॉ. स्ट्रेंज दाखवण्यात आला होता. तरीही मार्व्हल स्टुडिओज अस्तित्वात तोपर्यंत आले नव्हते. १९८६ साली न्यू वर्ल्ड पिक्चर्स या कंपनीने मार्व्हल कॉमिक्स ग्रुप आणि मार्व्हल प्रॉडक्शन यांची खरेदी केली. यानंतर मग मार्व्हल एंटरटेनमेंट लिमिटेड अस्तित्वात आले. दोन वर्षांनी त्यांच्या माध्यमातून द हल्क इन्क्रीडीबल रिटर्न्स हा सिनेमा आला आणि मग ही जादू सिनेमांच्या माध्यमातून सर्वाना आकर्षित करू लागली.

सर्व काही चांगले सुरू होते. एकेक करत नवनवे सुपरहिरो धुरळा उडवून देत होते. मग नेमके असे काय झाले असेल ज्यामुळे मार्व्हलला उतरती कळा लागली?

रॉन परेलमन नावाच्या एक उद्योगपतीने मार्व्हल तगडी रकम देऊन खरेदी केली. पुढच्या दोन वर्षात मार्व्हलला स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करण्यात आले. ४० टक्के शेअर्स ओपन ठेवण्यात आले होते. रॉन हा उद्योगपती होता. मार्व्हलमधून जास्तीतजास्त पैसा कमावणे हेच त्याचे एकमेव ध्येय होते. त्याने मार्व्हलची मर्चंडाईज आणि फ्रेंचायझी मॉडेल तयार करण्याचे ठरवले. यातून मार्केटमध्ये फुल हवा होईल असा त्याचा कयास होता.

मार्व्हलच्या पुस्तकांना एक पॉलिबॅगचे कव्हर लावून त्यात पाच सिरीजची कार्डस ठेवण्याची पद्धत ठेवण्यात आली. यामुळे झाले काय की ज्यांना सिरीज पूर्ण हवी आहे ते जास्तीतजास्त कॉमिक्स घेऊ लागले. रॉनने सगळ्या गुंतवणूकदारांना फ्रेंचाईज मोठे होऊन मर्चंडाईज, स्टिकर्सची विक्री वाढवणार असे सांगितले होते. १९९३ साली मार्व्हलने टॉयबीझ नावाच्या कंपनीत ४६% हिस्सा खरेदी केला. सर्वकाही जणू दणकेबाज सुरू होते.

पण बाजाराचा एक नियम असतो तो म्हणजे अनिश्चितता!! एकावेळी तुम्ही बाजारावर राज करता मात्र दुसऱ्यावेळी बाजार तुमच्यावर राज्य करतो. १९९३ ते १९९६ मार्व्हलला प्रचंड उतरती कळा लागली. मार्व्हलच्या किंमती वाढत गेल्या आणि लोकांनी मार्व्हलकडे पाठ फिरवली. लोकांना मार्व्हलची क्वालिटीही आवडेनाशी झाली होती. मार्व्हलची विक्री ७० टक्यांनी घसरली.

१९९५ साली मार्व्हल कर्जात बुडाली होती. त्यावेळी त्यांना आपल्या २७५ कर्मचाऱ्यांना घरी बसवावे लागले होते. रॉनपुढे मार्व्हल वाचविण्याचे आव्हान होते. त्याने मग टॉयबिझ आणि मार्व्हलच्या एकत्रीकरणाचा ठराव मांडला. याला मार्व्हलच्या शेअरहोल्डर्सकडून विरोध झाला. आता रॉनपुढे दिवाळखोरी जाहीर करण्याशिवाय पर्याय उरला नाही. यामुळे त्याला मार्व्हल परत उभे करण्यासाठी शेअरहोल्डर्सची मर्जी सांभाळण्याची गरज नव्हती.

१९९८ पर्यंत कोर्टात केस चालली. टॉयबीझ आणि मार्व्हलचे एकत्रीकरण करण्यात आले, पण रॉन आणि त्याच्या जवळच्या लोकांना बाहेर काढण्यात आले. आता लढाई-भांडणं आटोपती आल्याने मार्व्हलला सिनेमांमध्ये लक्ष गुंतवण्याची संधी मिळाली होती. यावेळी असा निर्णय घेतला गेला ज्याने मार्व्हलचे भविष्य निश्चित केले. तो म्हणजे स्टॅन लीची मार्व्हलचा चेअरमन म्हणून निवड करणे.

पुढच्या १० वर्षांचा विचार करून सिनेमे निर्मिती करण्याचे ठरविण्यात आले. यात डेअरडेव्हील, एक्स मेन, इलेक्ट्रा आणि फँटास्टिक फोर आणि इतर सिनेमांचा समावेश यात होता. मार्व्हल स्टुडिओ या नावाखाली रिलीज झालेला पहिला सिनेमा म्हणजे ब्लेड. हा १९९८ साली रिलीज झाला होता. हा सिनेमा हिट झाला. नंतर एक्स मेन आणि स्पायडरमॅन रिलीज झाले आणि आता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरू झाला होता.

पण यातून मार्व्हलला काय मोठा हातभार लागणार नव्हता. २००४ हे मार्व्हलसाठी अतिशय महत्वाचे वर्ष समजले जाते. डेव्हिड मैझेल मार्व्हल स्टुडिओत मुख्य अधिकारी म्हणून आला. त्याच्याकडे भविष्याचे अनेक प्लॅन होते. त्याने मार्व्हल प्रॉडक्शन सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण यात मोठा अडथळा होता, तो म्हणजे पैसा!! पण त्याने एका फर्मकडून पैसे मिळतील अशी सोय केली.

पैसा तर उभा राहिला. पण त्यांनी एक अट ठेवली होती. ७ वर्षांत जर का त्यांनी गुंतवलेला पैसा भरून निघाला नाही तर १० मार्व्हल पात्रांचे अधिकार त्यांना द्यावे लागतील. त्यात अँट मॅन, द अवेंजर्स, ब्लॅक पँथर, निक फ्युरी यांचा समावेश होता. डेव्हिड मैझेल आणि त्यांच्या टीमवर प्रचंड दबाव होता. पैसे गुंतवणाऱ्या मेरील लिंच या फर्मने डीलमधून पाय काढण्यासाठी प्रयत्न चालवले होते.

२००५ साली मार्व्हलने पॅरामाऊंट पिक्चर्ससोबत डिस्ट्रीब्युशन डील फायनल केली. त्यांना थॉर, आयर्न मॅन आणि ब्लॅक विडो या पात्रांचे अधिकार देण्यात आले. आता मार्व्हलला उभारी देणारा निर्णय झाला. आयर्न मॅनचे शुटींग सुरू झाले. २००७ उजाडले ते मार्व्हलसाठी नवी पहाट घेऊन! केव्हीन फेग हा २००० सालापासून मार्व्हलसोबत काम करत होता. त्याला ज्युनियर एक्सीक्युटिव्हपासून मार्व्हल स्टुडिओजचा प्रेसिडेंट करण्यात आले.

केव्हीनने आता मार्व्हलची घोडदौड सुरू केली. २००८ साली आयर्नमॅन आला आणि आयर्नमॅनने मिळवलेले यश सर्वाना माहीत आहे. मार्व्हलच्या ७० वर्षाच्या इतिहासात मार्व्हलने तुफान यश संपादित केले होते. यानंतर आजपर्यंत मार्व्हलने मागे वळून बघितले नाही. २००९ साली मार्व्हलला डिज्नीने ४ बिलियन डॉलर्स मोजून ताब्यात घेतले. अवेंजर आणि आयर्न मॅन ३ चे डिस्ट्रिब्युशनचे हक्क देखील त्यांनी घेतले. मार्व्हलमधील अनेक तुफान यशस्वी झालेले निर्णय हे केव्हीन फेगची डोक्यालिटी आहे.

स्टॅनलीचा प्रत्येक सिनेमातील कॅमिओ असो किंवा पोस्ट क्रेडिट सिन असो, या लहान गोष्टी जबरदस्त प्रभावी ठरल्या. यात सर्वात जबरदस्त निर्णय ठरला तो म्हणजे रॉबर्ट डाऊनी ज्युनियरला आयर्नमॅन म्हणून उतरवणे!! मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार करण्याचे त्याचे व्हिजन हॉलिवूड सिनेमाला एका नव्या उंचीवर घेऊन गेली. आज त्यांची नेट वर्थ ही १७ बिलियन डॉलरपर्यंत गेली आहे.

मार्व्हलचे एकाहून एक तुफान असे सिनेमे जगाला वेड लावत गेले असा काळ निर्माण झाला होता. आजही मार्व्हलचे सिरीज आणि सिनेमांची कमी नाही आणि चाहत्यांची कमी तर नाहीच नाही. स्टॅनलीच्या निधनाने प्रत्येक मार्व्हल चाहत्याला वाईट मात्र निश्चित वाटले होते. एंडगेममध्ये स्टॅनलीचा शेवटचा कॅमिओ होता आणि त्याचे शेवटचे वाक्य होते, 'मेक लव्ह, नॉट वॉर'!!

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required