computer

सोशल मिडियावरचे करोडपती :नैराश्य,कॉमेडी,AIB ते क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदार..तन्मय भटबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

एकाच ठिकाणी चिकटण्याचे आणि तिथेच रिटायर होण्याचे दिवस जसे गेले, तसेच फक्त डॉक्टर-इंजिनियर व्हायचेही दिवस गेले. आता लोक सोशल मिडिया वापरत, आपले छंद जोपासत त्यातच आपलं करियर करण्याचं धाडस दाखवते आणि त्यात यशस्वीही होते. यात मग निशा मधुलिकांसारख्या साठी पार केलेल्या आजीबाई येतात आणि विशी-तिशीतले तर बरेच जण येतात. यांचा बोभाटा तर मग नक्कीच व्हायला हवा. म्हणूनच आम्ही एका लेखमालिकेद्वारे या लोकांची ओळख करुन देणार आहोत..

करुयात सुरवात तन्मय भटपासून!! तन्मय भट म्हटलं की डोळ्यांसमोर पटकन "याचं टींडरही झोमॅटो असतं" या शब्दांत रोस्ट झालेलं, उभं-आडवं धूड उभं राहातं. पण हीच त्याची पूर्ण ओळख नाही. हा माणूस कसा घडला, कसा यशस्वी झाला आणि सध्या कोणत्या वाटा तो चोखाळतोय हे आजच्या लेखात जाणून घ्या!

मुंबईतल्या चुन्नीलाल दामोदरदास बर्फीवाला हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या एका मुलाला नेहमीच त्याच्या जास्त वजनामुळे इतर मुलांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असे. त्याला या गोष्टीचा त्रास होऊ नये आणि त्याचे वजन कमी व्हावे म्हणून त्याच्या आई वडिलांनी त्याला सायकल घेऊन दिली. ८ वीत असणाऱ्या या मुलाला प्रोत्साहित करून त्यांनी ६ महिन्यात ५ किलो वजन कमी करण्यास सांगितले. पण त्यातही तो अपयशी ठरल्याने तो अधिक निराश झाला.

त्याला खरंतर मरीन इंजिनिअर व्हायचे होते. पण एके दिवशी शाळेत एका कार्यक्रमात त्याने फक्त ५ मिनिट कॉमेडी करण्याची परवानगी मागितली. योगायोगाने त्याला ती मिळाली आणि तो तब्बल पुढची २० मिनिटं स्टेज गाजवत होता. तेव्हा त्याने मरीन इंजिनिअरिंग सोडून कॉमेडीयन व्हायचा निर्णय घेतला. आम्ही भारतातला आघाडीचा कॉमेडीयन तन्मय भटची गोष्ट तुम्हाला सांगत आहोत.

तन्मयने आपली कॉमेडीची सुरुवात केली ती weirdass ham-ateur night या अभिनेता वीरदासच्या शोपासून केली. २००९ साली राष्ट्रस्तरीय कॉमेडी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. ही स्पर्धा तन्मयने जिंकली होती. त्याने आपले क्षेत्र आता निवडले होते. वयाच्या १८ व्या वर्षी तो मुंबई मिररसाठी लिहीत होता, तर २५ वर्षांचा होईपर्यंत त्याचे १५ टीव्ही शोजसाठी लिहून झाले होते.

तन्मय हा भारतातील चार अशा कॉमेडियन्सपैकी एक आहे जो मुंबईतल्या लोकल हिरोज नावाच्या अखिल भारतीय लाईन-अप कॉमेडीत दिसला होता. याचबरोबर अनेक मोठ्या संस्था जसे टाइम्स ऑफ इंडिया, बीबीसी, व्होडाफोन, ऑडी, ब्रिटिश एअरवेज यांच्यासाठीसुद्धा त्याने काम केले आहे. भावाच्या आयुष्याचा चढता काळ सुरू होता. आता त्याने अजून मोठी झेप घ्यायचे ठरवले.

२०१२ साली त्याने मोठी सुरुवात केली. त्याने एआयबी या भारतातील पहिल्या कॉमेडी पॉडकास्टची सुरुवात केली. जिओ यायच्या आधी हा शो देशभर तुफान लोकप्रिय झाला होता. पुढे या शोने अनेक वळणे घेतली. यामुळे मोठे वादग्रस्त घटना घडल्या. एकदा तर सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचे काल्पनिक वादग्रस्त व्हिडिओ बनवला म्हणून तन्मय भट मोठ्या वादात सापडला. पुढे तो काही काळ डिप्रेशनमध्ये गेल्याच्या बातम्या होत्या.

२०१७ साली जगात आणि देशात मी टू चळवळ सुरू झाली. यावेळी एआयबीशी संबंधीत अनेक नावे पुढे आली. तन्मयला या लोकांच्या कारनाम्यांची माहिती असून तो चूप बसला असाही आरोप त्याच्यावर झाला. एआयबी मात्र त्यानंतर जेमतेमच सुरू राहीले. तन्मय भटचे करियरही अवघ्या ३० वर्षं वयात संपले असेच लोकांना वाटू लागले होते. पण पठ्ठ्या हिमती निघाला. त्याने डिप्रेशनमधून बाहेर पडत स्वतःची लहानपणीच निवडलेली वाट चालण्यास पुन्हा सुरू केली

.सध्या तो त्याच्या तन्मय भट नावाच्या यु ट्यूब चॅनेलवर कॉमेडी, vlog, गेमिंग स्ट्रीम, रोस्टिंगचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. अनेक टिकटॉक व्हिडिओ तसेच इतरही अनेक गोष्टींना तो आपल्या स्टाईलने रोस्ट करतो. या चॅनेलला ३७ लाख फॉलोअर्स आहेत. तर त्याचा आणखीही एक चॅनेल आहे, 'ऑनेस्टली बाय तन्मय भट' या चॅनलवर तो आर्थिक साक्षरता आणि गुंतवणुकीचे धडे लोकांना देत असतो. त्याचा सध्याचा फोकस हा क्रिप्टोकरन्सीवर जास्त आहे. क्रिप्टोकरन्सीबद्दल त्याचे विडिओ या नव्या आभासी चलनासंबंधी विशेष माहिती पुरवत असतात. यात तो स्वतःची गुंतवणूक, त्यात झालेल्या चुका अशा अनेक गोष्टींवर भाष्य करतो. या चॅनलचे ७ लाख २७ हजार सबस्क्रायबर्स आहेत.

एका वेबसाईटच्या मते त्याची वार्षिक कमाई ही १३ कोटींहून जास्त आहे. त्याची युट्यूबव्यतिरिक्त कमाई ही स्पॉन्सरशिप, अफिलियट कमिशन्स, प्रॉडक्ट सेल या माध्यमांतून येते. तसेच त्याची वैयक्तिक शेअर मार्केट आणि क्रिप्टोकरन्सीमधली गुंतवणूकही त्याला अधिकची कमाई करून देतात.

एवढ्या सगळ्या गोष्टी तन्मय भटने ३४ वर्षं वयात केल्या आहेत. उद्योगी असलेला हा भाऊ पुढे कसा प्रवास करतो याकडे त्याच्या चाहत्यांचे आणि टीकाकारांचेही लक्ष असेल.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required