भारतीय हिंदी सिनेमातली गाणं वाजवणाऱ्या या व्हायोलिनवालयाच्या प्रेमात पडलंय पाकिस्तान..

रावळपिंडी माहित आहे ना? हो, तेच तेच..  शोएब अख्तरचं गांव.

तर त्या रावळपिंडी गावात बाहरिया टाऊन नावाचा एरिया आहे. तिथं हा अनामिक पाकिस्तानी मनुष्य रात्री ९ ते १२ च्या दरम्यान व्हायोलिनवर सुंदर गाणी वाजवतो. बरं तो ही गाणी पैसे मिळवण्यासाठी वाजवत नाही बरं.. हा त्याचा छंद आहे. तिथं लोक थांबतात, एखादं गाणं पुन्हा वाजवण्याचा आग्रह करतात आणि तो उत्साहानं-अधिक प्रेमानं ते गाणं वाजवतो. कुणी लक्ष देऊन ऐकत असेल तर त्याला आणखीच हुरूप येतो. 


पाकिस्तानात आपली भारतीय गाणी आणि सिनेमे किती लोकप्रिय आहेत हे तुम्हांला माहित आहेच. हा मनुष्यही  मुख्यत: जुन्या भारतीय हिंदी सिनेमांतली  गाणी वाजवतो. मंडळी, व्हायोलीनवर गाणं वाजवणं सोपं नाहीय बरं.. जर याचा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हांला प्रत्येक शब्द वेगळा ऐकू येईल... अगदी गाण्यातल्या आरोह-अवरोहांसह!! वर मधलं पार्श्वसंगीतसुद्धा स्पष्ट ऐकू येतं बरं!! म्हणूनच पाकिस्ताने पब्लिक याच्या पेमात पडलंय..

आता भारतीयांना आणि त्यातल्या त्यात मराठी लोकांना त्याचं इतकं कौतुक वाटायचं नाही. आपल्या प्रभाकर जोगांनी 'गाणारं व्हायोलिन'द्वारे हा प्रयोग कित्येक वर्षं आधी केलाय. त्यांच्याही व्हायोलिन वादनातला शब्द न्  शब्द मोजून घ्यावा असाच आहे. या पाकिस्तानी माणसाचा व्हिडिओ पाहा आणि खुशाल युट्यूबवर जोगांचं गाणारं व्हायोलिन लावा.. आणि डोळे मिटून ती गाणी फक्त ऐकत राहा.. 


स्वर्गसुख मिळवणं खूप अवघड नाही, हो ना मंडळी?
 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)

©बोभाटा

 

सबस्क्राईब करा

* indicates required