computer

फोटोग्राफरने लग्नाचे सगळे फोटोच डिलिट मारले!! इतका राग येण्यासारखं नवरदेवासमोर नक्की काय केलं होतं?

लग्न म्हटले म्हणजे रुसवे फुगवे आलेच. कधी कुणाला अंगठी नाही म्हणून राग येतो तर कुणाला अजून काही हवे असते. त्यात बिचाऱ्या ज्यांच्या घरी लग्न असते त्यांना डोक्याला ताप होतो. त्यातही लग्नमंडप किंवा इतर लोकांशी बऱ्याचवेळा वाद होतो. या सर्व गोष्टी तशा नेहमी घडणाऱ्या. मात्र आज कधी न ऐकलेली गोष्ट तुम्ही वाचणार आहात.

रेडिटवर एका फोटोग्राफरने एक किस्सा शेअर केला आहे. एका लग्नात घडलेली ही गोष्ट. हा फोटोग्राफर तसा कुत्र्यांचे फोटो काढतो आणि सोशल मिडियावर ते पोस्ट करतो. त्याच्या एका मित्राच्या कमी बजेटच्या लग्नात त्याने फोटो काढावे अशी या फोटोग्राफरला गळ घातली गेली.

२५० डॉलर्स म्हणजेच जवळपास १८ हजार रुपयांमध्ये पूर्ण काम करण्याचे या फोटोग्राफरने मान्य केले. लग्न चालणार होतं सकाळी ११ पासून रात्री ८ पर्यंत आणि साहजिकच फोटोही सकाळपासून काढायचे होते. हे भाऊ सकाळपासून भुकेले होते. साधारण ५ वाजता त्याने आपल्या मित्राजवळ जाऊन जेवणापुरता २० मिनिटांचा ब्रेक देण्याची विनंती केली. तर मित्र बोलला, "एकतर फोटोग्राफर हो नाहीतर विनामानधन चालता हो". फोटोग्राफर भाऊ हे ऐकून चांगलाच भडकला. तरी एकदा त्याने "नक्की का?" असं मित्राला विचारलं.

त्याचा होकार मिळताच त्याने नवरदेवासमोर कॅमेरा काढला आणि सगळे फोटो डिलीट करून टाकले. वर म्हणाला, "आता मी फोटोग्राफर नाही."

तो म्हणतो की तिथे जबरदस्त गरम होत होते. माझ्याजवळ असणारे पाणी संपले होते आणि तिथे पाणीही कुठे मिळत नव्हते. ती वेळ अशी होती की कदाचित मिळणारे सारे २५०डॉलर्स मी एका ग्लास पाण्यासाठी दिले असते आणि पाच मिनिटं कुठंतरी शांत बसून घेतलं असतं.

लग्नासारख्या अतिशय महत्त्वाच्या प्रसंगाचे फोटो किती महत्वाचे असतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही पण नवरदेवाच्या आगाऊपणामुळे त्याला सगळ्या फोटोंपासून हात धुवावा लागला. आता या सर्व राड्यात नेमकी चूक कुणाची असेल? काय वाटते तुम्हाला? आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required