माय नेम ईज रॉजर.. जेम्स बॉण्ड.. लाडक्या जेम्स बॉण्डला श्रद्धांजली!!!

रुपेरी पडद्यावरच्या जेम्स बॉण्ड या व्यक्तीरेखेचं गारूड ज्याच्या मनावर पडलं नाही असा माणूसच विरळा. आपल्या आधीच्या पिढीत सुरू झालेला बॉण्डपटांचा सिलसिला आपली पुढची पिढी तारूण्यात आली तरी अव्याहतपणं सुरू आहे. जबरदस्त कथानक, जोमदार टेकिंग, फॅटसी गॅजेट्स , एकसे बढकर एक मदनिका आणि या सगळ्याबरोबर पडदा व्यापून राहिलेला एमआय६ ब्रिटिश सिक्रेट सर्व्हीस एजंट-जेम्स बॉण्ड.

पहिलावहिला बॉण्ड पडद्यावर रंगवला तो मायकेल केनने जून्या कसिनो रोयालमधे , मग आलं शॉन कॉनरीचं यूग , त्यानंतर रॉजर मूर बॉण्ड बनले, मधेच ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सव्हिसमधे जॉर्ज लॅझॉम्बी दिसला होता. मग दोन सिनेमांपुरता टिमॉथी डाल्टन बॉण्ड झाला, पण नंतर परत पुन्हा रॉजर मूरचं बॉण्ड म्हणून पुनरागमन झालं.

स्त्रोत

 पियर्स ब्रॉसनन, डॅनियल क्रेग असे नवनविन बॉण्ड येत गेले. प्रत्येकाने आपली छबी कोरली. पण खर्‍या अर्थानं बॉण्ड म्हणून लोकांच्या स्मरणात राहिले ते शॉन कॉनरी आणि रॉजर मूर.. दोघेही ब्रिटिश अभिनेते. बॉण्ड रंगवायची दोघांची शैली वेगळी . कॉनरींचा बॉण्ड बराचसा सिरियस आणि फंक्शनल . रॉजर मूर यांनी बॉण्डच्या व्यक्तिरेखेला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं. लेटेस्ट फॅशनचे स्टायलिश सूटस् , चालताना एक मदमस्त अंदाज , भाषेचा खुमासदार लहेजा याबरोबरच बॉण्डच्या रगेल आणि रंगेल व्यक्तीरेखेला हलक्या विनोदी अदाकारीचा चुरचुरीत तडका ही रॉजर मूर यांची देणगी आहे. चेहर्यावर असलेलं खट्याळ हास्य , बेगूमान आत्मविश्वास, अंगावरच्या स्टायलिश कपड्यांना न पेलवणार्या जलद हालचाली, शब्दफेकीचा अप्रतिम नमुना होवू शकतील अशी डायलॉग डिलिव्हरी.... आमच्या मनातला बॉण्ड रॉजर मूरच होते.

स्त्रोत 

  ००७ लायसन्स टू किल, लिव्ह ॲण्ड लेट डाय, व्ह्यू टू ए किल, मुनरॅकर, मॅन विथ गोल्डन गन, द स्पाय हू लव्ह्ड मी, फॉर युवर आईज ओन्ली, ऑक्टोपसी  असे एकापेक्षा एक भारी सिनेमे आणि बॉण्ड म्हणून पडद्यावर रॉजर मूर!!  अख्खी एक पिढी रॉजर मूर यांनी पडद्यावर गुंतवून ठेवली होती. बॉण्डपटांखेरीज  रॉजर मूर यांचे फार सिनेमे आठवत नाहीत. जीन क्लॉड व्हॅन डॅम बरोबर द क्वेस्टमधे ते होते तेआठवतं .


रॉजर मूर हे आयुष्यभर बॉण्ड म्हणूनच जगले आणि आज जेव्हा ते काळाच्या पडद्याआड गेले तरी रॉजर मूर या व्यक्तीपेक्षाही आमच्या मनातला बॉण्ड हरवल्याचं दु:ख जास्त आहे.

लेखक- यशोधन वर्तक

सबस्क्राईब करा

* indicates required