computer

रणबीर कपूरला रूह अफ्जा कसं बाधलं ?

या जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक : रूह अफ्जा  सरबत आवडणारे आणि दुसरे रूह अफ्जा म्हटल्यावर नाकं मुरडणारे ! हे वाक्य वाचल्यावर लगेच तुम्ही पण म्हणाल  ही ज्या त्या ग्राहकाची आवड निवड असते.वापरात येणार्‍या प्रत्येक वस्तूचे काही डाय-हार्ड फॅन्स असतात तर काही ईईई.. यक्क म्हणणारे पण असतात. शेवटी ग्राहक हा राजा असतो आणि गोष्टीतल्या राजाला जशी आवडती आणि नावडती राणी असते तसा हा प्रकार असतो.
अगदी बरोबर आहे पण आता आम्ही उगाच रूह अफ्जाचं नाव घेत नाही आहोत.या आवडणे आणि न आवडणे यावरून थेट कोर्टात एक कसा खटला दाखल झाला याचा किस्सा आज सांगणार आहोत.

२०१३ साली रणबीर कपूर आणि दिपीका पदुकोनेचा 'ये जवानी है दिवानी' हा चित्रपट आला.तरुणाईने या चित्रपटाला भरपूर पैसे मिळवून दिले. ३ इडियट्स नंतर ३०० कोटी रुपयांचा गल्ला जमा करणारा हा चित्रपट होता.या चित्रपटाची कथा नव्या पिढीची कथा असल्याने त्यात बरेचसे वर्त्मानकाळातले उल्लेख होते. नव्या पिढीच्या आवडीनिवडीचा उल्लेख होता.इथपर्यंत सगळंच व्यवस्थित होतं. पण काही दिवसांनी हा चित्रपट जेव्हा टेलीव्हिजनवर दाखवणार असे जाहीर झाले तेव्हा रूह अफ्जा या ब्रॅण्डच्या मालकाने कोर्टाकडे धाव घेऊन हा चित्रपट टेलीव्हीजनवर प्रसारीत करण्यावर बंदी आणण्याची विनंती केली. 

यामागचे कारण होते या चित्रपटातील एक संवाद !! 
तो संवाद असा होता.

रणबीरः ये रूह अफ्जा बहुत बेकार है
तन्वी आझमी: सब ठिक हो जाएगा 
रणबीरः सिवाय ये रूह अफ्जाके... बहुत बुरा है 

हमदर्द फाउंडेशन म्हणजे रूह अफ्जाच्या मालकांनी कोर्टात असं सांगीतलं की 
१ आमचा ब्रँड रूह-अफ्जा १०० वर्षाहूनही जुना ब्रँड आहे. 
२ तो आजही बाजारात विकला जातो कारण लोकांना रूह अफ्जा आवडते.
३ चित्रपटातील संवादामुळे आमच्या ब्रँडची बदनामी होते आहे.
४ या संवादामुळे रूह अफ्जाच्या गुडवील ला धक्का पोहचतो आहे.
५ रूह अफ्जाच्या व्यापारी मूल्याला धोका पोहचतो आहे. 

 

चित्रपट निर्मात्यांकडे यासाठी काहीही समर्पक उत्तर नव्हतं . साहजिकच  हा चित्रपट टेलीव्हीजनवर दाखवण्यास कोर्टाने मनाई केली.जर प्रदर्शित करायचा असेल तर रूह अफ्जाचे संवाद वगळण्याचे आदेश देण्यात आले. 
हे सर्व हमदर्द फाउंडेशनला शक्य झाले कारण त्यांचं नाव 'रूह अफ्जा' त्यांचा लोगो ट्रेडमार्क आणि बौध्दिक संपदेच्या कायद्यानुसार नोंद केलेला होता.बोभाटाचे अनेक वाचक वेगवेगळ्या उद्योगात आहेत.त्यांनी या किश्शाची नोंद घेणे अत्यावश्यक आहे. सोबत बोभाटाचे वाचक  जे उत्तम 'मीमकार' म्हणजे मीम्स बनवणारे आहेत त्यांनी पण योग्य काळजी घ्यायला हवी. मीम्स बनवताना एखाद्या ब्रँडची बदनामी होणार नाही हे बघायला हवे. आतापर्यंत  मीम बनवणार्‍या 'मीमकारा'वर खटला भरण्यात आलेला नाही पण येत्या काळाचे काय सांगावे ? 

 

सबस्क्राईब करा

* indicates required