शक्तिमान परत येतोय, तेही नव्या ढंगात!! जाणून घ्या नक्की काय बदल होणार आहेत!!

आज भारतातील मुलांना आयर्नमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन असे सुपरहिरो माहीत आहेत. पण आजपासून २० वर्षांपूर्वी मुलांना फक्त एकच सुपरहिरो माहीत होता, त्या सुपरहिरोचे गारुड आजवर उतरलेले नाही तो म्हणजे शक्तिमान!! 'अद्भुत अदम्य साहस की परिभाषा है' इतके जरी कानावर आले तरी लोक शक्तिमान टीव्हीवर यायचे त्या काळात हरवून जातात.

रविवारी सकाळी १२ वाजता शक्तिमान पाहण्यासाठी मुलांनी काय काय कारनामे केले आहेत हे आज २५-३० च्या वयात असलेल्या मुलांना विचारा. भारताचा हा पहिला सुपरहिरो न भूतो न भविष्यति असा सुपरडुपर हिट झाला होता. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने गिरकी घेऊन शक्तिमान स्टाईलने उडण्याचा प्रयत्न करून पाहिला आहे.

आता हा शक्तिमान परत येत आहे. सध्या रिमेकचा जमाना आहे, जुन्या काळातील सिनेमे, गाणी नव्या तडक्यासहित मार्केटमध्ये येत असताना शक्तिमान नव्या रुपात लोकांसमोर येत आहे. साहजिक शक्तिमान फॅन्समध्ये कुतूहल तो बनता है. सोनी पिक्चर्सकडून एका व्हिडिओद्वारे शक्तिमानची घोषणा झाली आहे.

या एनिमेटेड व्हिडिओत मुंबई शहर मोठ्या संकटातून जात असताना स्क्रीनवर 'अंधकार और बुराई मानवता को हरा रहे हैं..यही वक़्त है उसके वापस आने का..इंडिया का सबसे लोकप्रिय सुपरहीरो शक्तिमान' हे अक्षरे झळकतात. सोबतच पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री यांचे आयडी कार्ड आणि कॅमेराही दिसतो. यावेळी शक्तिमानचे कपडे पण थोडे बदलण्यात आले आहेत आणि शक्तिमानला फुल मॉडर्न लुक देण्यात आला आहे.

 

फॅन्ससाठी प्लॅन मे थोडा चेंज असा आहे की एक नाही दोन नाही, तर थेट ट्रायलॉजी म्हणजे तीन सिनेमांतून हा शक्तिमान लोकांच्या भेटीला येणार आहे. आता शक्तिमानची भूमिका नेमका कोण करेल हे अजून ठरले नसले तरी एखादा मोठा स्टार या भूमिकेत असेल हेही स्पष्ट आहे. शक्तिमान फॅन्ससाठी सोन्याहून पिवळे असे सगळे यात दिसणार आहे.

या सिनेमाचे डायरेक्शनचे काम देखील तगड्या डायरेक्टरला दिले जाणार आहे. ओरिजिनल शक्तिमान मुकेश खन्ना यांच्याचसोबत मिळूनच हा सिनेमा येत असल्याने जुना शक्तिमानचा प्रॉपर टच याला असेल यात शंका नाही. तसेच सोनी पिक्चर्ससारखे मोठे सिनेनिर्माते यात असल्याने हा नवा शक्तिमान धमाका करेल हे निश्चित...

उदय पाटील

 

सबस्क्राईब करा

* indicates required