computer

अपयशाचे खापर नशीबावर न फोडता चिकाटीने यश मिळवणारा, अचाट कल्पनाशक्तीने रसिकांना मोहवून टाकणारा जादूगार- स्टिव्हन स्पीलबर्ग!!

स्टिव्हन स्पीलबर्ग:स्पीलबर्गने अक्राळविक्राळ आणि भीतीदायक डायनासोर घराघरात पोहोचवला. वास्तविक केवळ "ज्युरासिक पार्क" चित्रपट ही त्याची एकमेव ओळख होऊ शकत नाही. १९७१ मधील "द ड्यूएल" या भय-थरार चित्रपटापासून सुरू झालेला त्याचा प्रवास आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे.
स्टीव्हन स्पीलबर्ग हा अचाट कल्पनाशक्तीने चित्रपट रसिकांना मोहवून टाकणारा जादूगार. पण हा शापित होता.अपयशाचा शाप असलेल्या या जादूगाराची अपयशाला मागे टाकत सतत पुढे जाण्याची ही गोष्ट!!

पूर्वी कुणाला माहित नसलेला डिस्लेक्सिया म्हणजे वाचण्याची अक्षमता असण्याचा आजार 'तारें जमीं पर' पासून सर्वांना माहित झाला आहे. स्टीव्हनला लहान असताना त्याला डिस्लेक्सियाचा सामना करावा लागला. त्याला अभ्यासाचा कंटाळा येत असे आणि लवकरच शाळा देखील सोडावी लागली. त्याचं स्वतःचं असं एक वेगळंच विश्व होतं. या विश्वात तो आपल्या कल्पनाशक्तीने मनसोक्त विहार करत असे. कित्येकदा तर आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे हे देखील त्याला कळत नसे. थोडक्यात सांगायचं तर तो एक असा मुलगा होता, जो मोठा झाल्यावर नक्की काय करणार हे कळणं कठीण होतं. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर त्याचे वडिल त्याला लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया इथे घेऊन गेले.

दहा वर्षांचा असतानां त्याने स्वतःचे आणि त्याच्या मित्रांचे काही व्हिडिओ काढले. इतकंच नव्हे, तर ते पाहाण्यासाठी त्याने तिकिटदेखील ठेवले होते. वडिलांसोबत कॅलिफोर्निया इथे रहात असतानां त्याने युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाच्या फिल्म स्कूलमध्ये ॲडमिशनसाठी अर्ज भरला खरा, पण कमी मार्कांमुळे त्याला नकार देण्यात आला. हे त्याचे पहिले अपयश होते.

'द ड्यूएल' हा स्टिव्हन स्पीलबर्गचा पूर्ण लांबीचा पहिला चित्रपट. सिनेमात महत्वाची पात्र फक्त दोन; एक व्यावसायिक जो आपल्या क्लायंटला भेटण्यासाठी कॅलिफोर्नियाच्या बाहेरील जवळपास निर्जन रस्त्यावरून प्रवास करत आहे आणि दुसरा, केवळ ह्याने त्याला ओव्हरटेक केला म्हणून त्याच्या जीवावर उठलेला एक महाकाय ट्रक. होय एक ट्रक. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे ट्रकचा ड्रायव्हर कधीच दिसत नाही; चामड्याचे बूट घातलेले त्याचे पाय दिसतात, परंतु तरीही त्याची भीती मात्र शेवटपर्यंत वाटत राहते. स्पीलबर्गने दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आणि तो ही तिकीटबारीवर सपशेल आपटला.

स्टीव्हन स्पीलबर्ग हा अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक!! आयुष्यात अनेकदा अपयश वाट्याला येऊनही त्याने खूप काही साध्य केलं. जगातील सर्वात यशस्वी लोक सर्वाधिक अपयशाला सामोरे जातात हे त्याच्या बाबतीत शब्दशः खरं आहे. पण आपल्या अपयशाचे खापर नशीबावर न फोडता त्याने अत्यंत आत्मविश्वासाने आणि चिकाटीने यश प्राप्त केले.

स्टीव्हन स्पीलबर्ग याचा जन्म १९४६ मध्ये सिनसिनाटी, ओहायो येथे झाला. त्याचे बालपण आनंददायक नव्हते आणि त्याला सुरुवातीपासूनच प्रचंड संघर्षाचा सामना करावा लागला. आज जरी त्याला अचाट कल्पनाशक्तीचा दिग्दर्शक म्हणून ओळखले जातं, तरी एक काळ असा होता की आपण बनवलेले चित्रपट लोकांना आवडत नाहीत ह्या निष्कर्षापर्यंत तो आला होता.

प्रेक्षकांचा अनुनय करणारे चित्रपट तो बनवतो असा आरोप त्याच्यावर केला जात असे. त्यामुळेच असेल, पण १९९३ पर्यंत त्याच्या चित्रपटांना सर्वात प्रतिष्ठेचे एक देखील ॲकॅडमी ॲवार्ड म्हणजेच ऑस्कर मिळू शकले नव्हते. १९९३ मधील दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या "शिंडलर्स लिस्ट" ह्या सिनेमाने मात्र समीक्षकांचे म्हणणे खोडून काढले. इतकेच नव्हे तर या चित्रपटाने त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट संगीत अशी तीन ॲकॅडमी ॲवार्डस जिंकली.

त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला १९७९ मध्ये त्याने "१९४१" हा चित्रपट बनवला. हा एक निखळ विनोदी चित्रपट होता. जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केल्यानंतर कॅलिफोर्नियातील लोकांना अशी भीती वाटू लागते की आपल्या शहरावरही जपानचा हल्ला होईल. हा चित्रपट पडला अशी वदंता होती, परंतु प्रत्यक्षात या चित्रपटाने बऱ्यापैकी धंदा केला होता. अर्थात त्याने नंतर काढलेल्या चित्रपटांच्या तुलनेत त्या चित्रपटाने खूपच कमी पैसे कमावले, परंतु निराश न होता तो पुढच्या सिनेमाच्या तयारीला लागला. स्टीव्हन स्पीलबर्गची ही खासियत होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अपयशाने खचून न जाता नव्या उमेदीने तो पुढील चित्रपटाची घोषणा करत असे.

त्याचा 'जाॅज' हा चित्रपट देखील तुफान चालला, ज्यामध्ये शार्क मासा हा प्रमुख खलनायक होता. 'रेडर्स ऑफ दि लाॅस्ट आर्क' आणि 'स्टार वाॅर्स' ह्या मालिका प्रेक्षकांना आवडल्याच, पण "क्लोज एन्काऊंटर्स ऑफ दि थर्ड काइंड" आणि "ईटी" हे चित्रपट देखील तुफान चालले. "ज्युरासिक पार्क" चित्रपटाने त्याचे स्वतःचेच सर्व विक्रम मोडीत काढले.

"कोणत्याही परिस्थितीत धीर सोडू नका. एक दिवस असा येईल, जेव्हां जगाला तुमची दखल घ्यावी लागेल". त्याचे हे शब्द म्हणजे अपयशी लोकांसाठी अमूल्य ठेवा आहे.