क्रूर सिरियल किलर्स: खून केल्यानंतर त्यांच्या मेंदूचे सूप करून पिणारा विकृत मारेकरी-राजा कोलंदर!!

सिरीयल किलर्समध्ये अनेक गोष्टींपैकी साम्य असलेली एक गोष्ट म्हणजे त्यांचा सणकीपणा.. गुन्हे करतांना क्रूरतेची पातळी गाठणे हे या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. संवेदनशील माणसाच्या काळजाला पीळ पडावा इतकी क्रूर कृत्ये त्यांनी केलेली असतात. महिन्याभरापूर्वी द इंडियन प्रीडेटर नावाची सिरीज येऊन गेली. या सिरीजचे प्रचंड कौतुक झाले. या सिरीजची अतिशय मनाला हात घालणारी मांडणी बघितल्यावर कौतुक होणे साहजिक होते. पण ही सिरीज एका खऱ्या सिरीयल किलरच्या आयुष्यावर आधारित आहे, हे अनेकांना माहीत नाही. त्यातही तो सिरीयल किलर क्रूरतेची किती हद्द ओलांडणारा होता हे देखील अनेकांना माहीत नसते. आज आपण राजा कोलंदर नावाच्या अशाच एका सिरीयल किलरचा हादरवून सोडणारा प्रवास वाचणार आहोत. 

अलाहाबाद येथे शंकरगढचा राम निरंजन कोल नावाचा हा इसम १९६२ साली जन्माला आला. इतरांसारखाच कामधंदा करून त्याचा संसार त्यावेळी सुरू होता. काळ आता ९० च्या दशकाकडे सरकत होता. राम कोलची बायको जिल्हा परिषदेत निवडून आली. राजकारणात प्रस्थ निर्माण झाले. तसे रामला गुन्हेगारी जगताचेही आकर्षण निर्माण झाले. गुन्हेगारी जगतातील अनेकांचा हेतू हा दहशत निर्माण करणे हाच असतो. या रामचाही दहशत निर्माण करण्याचा हेतू साध्य झाला होता. 

गावातच त्याने अड्डा तयार केला होता. इथून तो छोटे-मोठे गुन्हे करून दहशत माजवू लागला. त्याचा सायकोपणाचा एक नमुना म्हणजे त्याने गोमतीदेवी नाव असलेल्या आपल्या बायकोचे नाव फुलनदेवी केले होते. तर एका मुलाचे नाव कलेक्टर आणि दुसऱ्याचे आमदार ठेवले होते. यावरून त्याला मोठ्या गोष्टींचे किती आकर्षण होते याचा अंदाज येतो.

कधीकधी काही गुन्हेगारांचे लहान-सहान गुन्हे उघडकीस येतात तेव्हा ते पुढे जाऊन इतके मोठे कांड करू शकतो यावर कुणाचाच विश्वास नसतो. राजा कोलंदरबाबत तेच झाले. त्याची गोष्ट जगासमोर आली तेव्हा उत्तर प्रदेश अक्षरशः हादरले. 

राम निरंजन कोल राजा कोलंदर कसा झाला यामागेही स्टोरी आहे. तो कोल नावाच्या समाजाचा आहे. त्याची दहशत बघून त्याचे जातभाई त्याला राजा म्हणू लागले. तोही आपल्याला राजा म्हणावे असे फर्मान सोडत असे. अशा पद्धतीने त्याचे राजा कोलंदर असे नामकरण झाले. नंतर तर त्याचे खरे नाव काय हेसुद्धा कुणाला माहीत नव्हते. 

१९९८ साली एका युवकाच्या खुनात त्याचे नाव समोर आले. त्याचे नाव जगासमोर येण्याची ही पहिली घटना. यावेळी तो गायब झाला आणि पुढे विशेष काही घडले नाही. सर्व काही सुरळीत सुरू होते. म्हणजे त्याच्या आयुष्यात सर्व सुरळीत सुरू होते. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्याचे निघालेले धिंडवडे जगासमोर यायचे होते. कधीकधी एक अशी घटना समोर येते जी मागील-पुढील अशा अनेक घटनांची साखळी समोर घेऊन येते. ही साखळी जगाला हादरवून सोडते. अशीच या साखळीतील पहिली घटना घडली १४ डिसेंबर २००० रोजी. 

प्रयागराज म्हणजेच तेव्हाच्या अलाहाबादच्या 'दैनिक आज' या वर्तमानपत्राचे प्रसिद्ध पत्रकार धीरेंद्र सिंग गायब झाले. सिनेमात दाखवतात तसा एकदम प्रामाणिक पत्रकार, असा पत्रकार ज्याने भल्याभल्यांना जमिनीवर आणलेले असते. कामावर गेलेले धीरेंद्र परत येत नाहीत आणि सर्व चौकशी केल्यावरही त्यांचा पत्ता लागत नाही म्हटल्यावर त्यांचे कुटुंबीय पोलिसांकडे गेले. पोलिसांनी तपास सुरू केला. हा तपास काय वळण घेईल याचा अंदाज तेव्हा कुणालाही नव्हता. 

याच काळात पोलिसांना धीरेंद्र सिंग आणि राजा कोलंदर यांच्यात काहीतरी बिनसले असल्याची खबर मिळाली आणि राजाला उचलण्यात आले. धीरेंद्र सिंह गायब होऊन ८ दिवस झाले असल्याने त्यांचे काही बरेवाईट झाले असल्याची सर्वांना शंका होती. पण राजा काहीही बोलण्यास तयार नव्हता. यादरम्यान त्याने दुसरे खून कबूल केले. पण धीरेंद्र सिंह यांच्याबद्दल तो तोंड उघडत नव्हता. शेवटी त्याच्या बायको मुलांची ढाल करून पोलिसांनी त्याला बोलते केले, तेव्हा त्याने जे सांगितले ते धक्कादायक होते.

 

राजा बोलू लागला आणि सर्व सुन्न होऊन ऐकत होते. धीरेंद्र सिंग यांच्या खुनाचा पाया रचला गेला तो १९९८ साली. एका प्रकरणात धीरेंद्र सिंग यांच्या भावाने राजाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यात धीरेंद्र सिंग यांचे त्याला पाठबळ होते. तसेच अजून एक कहाणी म्हणजे धीरेंद्र सिंग यांना पत्रकार असल्याने त्याला राजाचे सर्व कारनामे माहीत असल्याने देखील त्याचा खून झाला असावा अशी शंका लोकांना आजही आहे. 

धीरेंद्र सिंग यांना विश्वासात घेऊन राजाने त्याच्या फार्महाऊसवर बोलवून घेतले. तिथे राजाचा मेहुणा वक्षराज याने पाठीवर गोळी चालवत धीरेंद्रचा खून केला. त्यांनी मग त्याचे धड आणि डोके वेगळे करत दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. धीरेंद्रची मोटारसायकल स्वतःच्या व्याह्याला दिली, मोबाईल स्वतः ठेवला, तर बूट हे वक्षराजने ठेऊन घेतले. 

इथवरची स्टोरी म्हणजे चिल्लर वाटावी असे पुढे घडले. पोलिसांनी पुढील तपास करण्यासाठी त्याचे घर गाठले. त्याच्या घरात त्याची एक डायरी सापडली. ही डायरी म्हणजे क्रूरतेचा चालताबोलता दस्तावेजहोता. इथे पोलिसांना एक खुनी नाही, तर एक सिरीयल किलर सापडला होता. ज्याची क्रूरता ही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारी होती. 

या डायरीतील माहितीनुसार त्याने एकूण १४ लोकांचा खून केला होता. एखादा जराही नडला तर तो त्याचा खून करायचा. त्याच्या डोक्यातून मेंदू बाहेर काढायचा आणि त्याचा सूप करून प्यायचा. असा सर्व पाशवी कारभार तो करत असे. त्याची अशी अंधश्रद्धा होती की असे केल्याने त्याला दैवी शक्ती प्राप्त होईल. 

राजा कोलंदरची चौकशी करून जेव्हा त्याने फेकलेली प्रेते शोधली तेव्हा डायरीतील प्रत्येक गोष्ट खरी असल्याचे समजून आले. या सर्व खुनांचा पोलीस शोध घेत होते. पण यातून समोर काही येत नव्हते. पण शेवटी धीरेंद्र सिंगच्या खुनाच्या निमित्ताने राजा कोलंदरचा खरा चेहरा समोर आला. त्याच्या विरुद्ध न्यायालयात १० वर्षं केस चालली आणि २०१२ साली त्याला आणि त्याचा मेव्हणा वक्षराज या दोघांना जन्मठेप सुनावण्यात आली.

राजा कोलंदर अजूनही जिवंत आहे. तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे. द इंडियन प्रीडेटर वेबसिरीजमध्ये राजा कोलंदरच्या मानसिक स्थितीपासून तर हा सर्व घटनाक्रम अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. सिरीयल किलर म्हणून समोर आलेले बहुतांश लोक इतके क्रूर आहेत हे जगाला माहीत नसते, पण त्यांच्या मेंदूत सुरू असलेले चक्र त्यांच्याकडून एकेक गैरकृत्य करून घेत असते.

सबस्क्राईब करा

* indicates required