computer

जॅक डॅनीअल्स ही तुमची आवडती व्हिस्की असेल तर ही गोष्ट वाचलीच पाहीजे !!

आईबाबांनी सांगितलेल्या मुलीशी निमूटपणे लग्न करून संसार थाटणार्‍या पिढीतल्या पोरांचं जसं एक हवंहवंसं, पण शक्य न झालेलं 'कनेक्शन' असतंय, तशीच काही अवस्था दारु पिणार्‍यांची असते. त्यांचा घरोबा ब्लेंडर्स प्राइड किंवा मॅक्डॉवेल नंबर वनसोबत झालेला असला तरी पण त्यांचं जुनं फसलेलं अफेअर 'जॅक डॅनिअल्स' सोबत असतंय. आता दारु या विषयात फारसं गम्य नसलेल्या लोकांना त्यामागचा 'गम' कळणार नाही, पण 'जॅक डॅनिअल्स'  ही अशी चीज आहे जी प्यायली नसेल त्यांना "हाय ! कमबख्ततूने पी ही नहीं" हा डायलॉग एकदम फिट्ट बसेल.

चला तर मंडळी, सध्याच्या ड्राय सिझनमध्ये फक्त  'जॅक डॅनिअल्स' च्या स्टोरीवर समाधान मानून घ्या आणि वाचा बोभाटाचा आजचा जॅक डॅनिअल्सचा स्पेशल एपिसोड !

सुरुवातीला ज्यांना जॅक डॅनिअल्स म्हणजे हा कोण बाबा? असा प्रश्न पडला असेल त्यांच्यासाठी थोडीशी अधिक माहिती देतो आहे. 'जॅक डॅनिअल्स' हा अमेरिकन व्हिस्कीचा एक ब्रँड आहे. अमेरिकन व्हिस्की असं लिहिण्याचा खास उद्देश असा आहे की स्कॉच व्हिस्की ही whisky असते, तर अमेरिकन व्हिस्की whiskey असते. पण मग स्कॉच नसेल तर ही कोणती व्हिस्की आहे? या पुढच्या प्रश्नाचे उत्तर आहे की ही बरबन जातीची व्हिस्की आहे. मक्यापासून बनवलेली अमेरिकन व्हिस्की !!

आज आम्ही हा ब्रँड कसा जन्माला आला हे सांगितल्यावर तुम्हीसुध्दा पुढच्या बैठकीत सुरुवातीचे चार थेंब एका अज्ञात काळ्या गुलामासाठी अर्पण कराल!!

साधारण १८५० च्या दरम्यान आपल्या कथेचा हिरो 'जॅक डॅनिअल' आठ एक वर्षाचा असेल. तो तेव्हा टेनेसीमधल्या एका वाण्याकडे - 'डॅन कॉल'कडे कामाला लागला. त्याची हुशारी ओळखून डॅन कॉलने त्याला त्याच्या एका काळ्या गुलामाच्या हाताखाली कामाला ठेवले. त्या काळी अमेरिकेत गुलामगिरी होती. डॅन कॉल वाणी होता आणि सोबत त्याला चर्चचे 'मिनिस्टर' म्हणूनही काम बघायचे असायचे. त्याला वेळ नसल्याने त्याच्या दारुच्या भट्टीची जबाबदारी त्याने जॅक डॅनिअलवर सोपवली. भट्टीचे काम बघणार्‍या काळ्या गुलामाचे नाव होते 'नाथन निअरेस्ट ग्रीन'. असे म्हणतात की जॅकला नाथनच्या हाताखाली सोपवताना डॅन कॉल म्हणाला की "हे बघ, अंकल ग्रीनसारखी व्हिस्की कोणीच गाळू शकत नाही." अंकल ग्रीनला त्यानी सूचना दिल्या की हा पोरगा व्हिस्की गाळण्यात एक नंबर तरबेज झाला पाहिजे, त्याला मदत कर. हा नाथन निअरेस्ट ग्रीनकाका जी व्हिस्की बनवायचा त्या व्हिस्कीलाच आपण आज 'जॅक डॅनिअल्स' व्हिस्की म्हणून ओळखतो. मग नेथन निअरेस्ट ग्रीनचे काय? तो तर गुलाम होता. त्याला मरेपर्यंत ही एक नंबर व्हिस्की बनवण्याचे श्रेय कोणीही दिले नाही. नाव झाले त्याच्या शिष्याचे, म्हणजे जॅक डॅनिअलचे!! अमेरिकन गुलामगिरीच्या इतिहासात नाथन निअरेस्ट ग्रीन हा एक गुलाम होता, त्याला लँडीस अँड ग्रीन नावाच्या कंपनीने विकले होते.

पण खरंतर १८६५ च्या काळातच गुलामगिरी संपली होती. पण अंकल ग्रीन मालकाकडेच कामाला राहिला. त्यानंतर जॅक डॅनिअलने स्वतःची डिस्टीलरी सुरु केली. अंकल ग्रीनची मुलं आणि नातवंडं पण जॅक डॅनिअल्सच्या डिस्टीलरीमध्येच कामाला होती. आजच्या तारखेस जॅ़क डॅनिअल्सचे दिड कोटी क्रेट दरवर्षी विकले जातात. मात्र अंकल ग्रीनचे नाव बरीच वर्षे विस्मृतीत गेले होते. परंतु २०१७ साली फॉन विव्हर नावाच्या एका लेखिकेने अंकल निअरेस्ट ग्रीनच्या नावाने एक फाउंडेशन उभे केले आणि  "Uncle Nearest 1856 Premium Whiskey" नावाच्या व्हिस्कीची निर्मिती केली. त्यानंतर ब्राऊन फोरमन कार्पोरेशन या कंपनीने, म्हणजे ' जॅक डॅनिअल्स' व्हिस्की या ब्रँडची मालकी असलेल्या कंपनीने 'नाथन निअरेस्ट ग्रीन' चा अधिकृत उल्लेख जॅक डॅनिअल्स व्हिस्कीचा निर्माता म्हणून केली. गुलामगिरी १८६५ साली संपली, पण श्रेय मिळाले २०१७ साली! 

आम्ही या आधीच्या लेखात जे म्हटले होते ते पुन्हा एकदा म्हणतो, "एखाद्याची कल्पना चोरणं म्हणजे अब्जावधी रुपयांचा मामला आहे. तसा या विधानावर तुमचा विश्वास बसणार नाही म्हणा... पण आपल्या ओळखीच्या अनेक गोष्टी या चोरीतूनच आलेल्या आहेत. पण मग मूळ कल्पना ज्याची असेल त्याचं काय?  तो बिचारा गरीब असेल तर गरीबीतच मरेल. एखादा चिकट लढवय्या असेल, तर तो नुकसान भरपाई मिळवेल! पण त्यापलिकडे काही नाही. या दुनियेचा न्याय असा आहे की शेवटी नफ्याचं डबोलं चोराच्याच हातात राहतं."

आता वाचू या जॅक डॅनिअल्सच्या उर्वरित आयुष्याबद्दल!!

दारुबंदीचा काळ वगळता - हो, अमेरिकेत पण काही वर्षं दारुबंदी होती- चाळीस वर्षं जॅक डॅनिअल्स कंपनीचा व्यवसाय बघत होता. आजन्म अविवाहित राहिल्याने त्याने त्याच्या पुतण्यांच्या हाती हा ब्रँड सोपवला. जॅक डॅनिअल्सच्या मृत्यूची मात्र एक वेगळीच कथा आहे. कदाचित ती काल्पनिकही असेल, पण इथे सांगायला हरकत नाही.  मृत्यूपूर्वी काही दिवस आधी जॅक डॅनिअल तिजोरी उघडायला गेला. पण चुकीचे नंबर फिरवले गेल्याने तिजोरी उघडली नाही. रागाच्या भरात त्याने तिजोरीला लाथ मारली आणि त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. काही दिवसांतच त्या जखमेचे विष अंगात भिनले आणि त्याचा मृत्यू झाला.

वाचकहो, ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. यानंतर परदेशातून माघारी येताना ड्यूटी फ्री शॉपमध्ये जेव्हा जॅक डॅनिअल्सची बाटली दिसेल तेव्हा बोभाटाचा हा लेख नक्कीच तुम्हाला आठवेल. 

हा लेख शेअर करा आणि कसा वाटला ते सांगायला कंमेंटबॉक्स मोकळाच आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required