computer

सूरराई पोटरू चित्रपट थेट ऑस्करच्या शर्यतीत पोचलाय? ऑस्करची निवड प्रक्रिया समजून घ्या!!

भारतीय चित्रपट आणि त्यातही टॉलीवूडचे चित्रपट तर आजकाल सगळीकडेच हवा करत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या चित्रपटांची दखल घेतली जात आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला सूरराई पोटरू हा तमिळ चित्रपट थेट ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला आहे. गेल्या वर्षी कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपट सृष्टीही झाकोळून गेली होती, पण या वर्षाच्या सुरुवातीलाच चित्रपट क्षेत्रात एक चांगली बातमी येऊन थडकली आहे.

तमिळ मधील सूरराई पोटरु हा चित्रपट गेल्या वर्षी म्हणजे १२ नोव्हेंबर २०२० मध्ये अमेझॉनच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. लॉकडाऊन काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित होणारा हा पहिलाच तमिळ चित्रपट ठरला आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद असल्याने हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला गेला. या चित्रपटाला रसिक प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांचीही चांगली दाद मिळाली.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत चित्रपटाचे निर्माते राजशेखर यांनी, सूरराई पोटरु ऑस्करच्या शर्यतीत शामिल होत असल्याची माहिती दिली. उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट निर्देशक, बेस्ट ओरिजिनल स्कोअर आणि इतरही अनेक प्रकारामध्ये या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. आजच अकॅडमी स्क्रीनिंग रूममध्ये हा चित्रपट पोहोचला असल्याचेही त्यांनी या ट्विट मध्ये म्हटले आहे.  अमेझॉन प्राईमच्या ट्विटर हँडलने या ट्विटला रीट्विट करून दुजोराही दिला आहे.

तमिळ मधील प्रसिद्ध अभिनेता सुरिया याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. त्याच्या कारकिर्दीला यामुळे निश्चितच वेगळे वळण लाभेल. सुरियाच्या चाहत्यांमध्ये यामुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. त्याच्या असंख्य चाहत्यांनी याबद्दल त्याचे अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सुरिया व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये परेश रावल, अपर्णा बालमुरली आणि मोहन बाबू यासारखी दिग्गज कलाकार मंडळी आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीतही सुरियाने योगदान दिले आहे. सुधा कोंगरा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

चित्रपटाचे कथानक काय आहे?

या चित्रपटाचे कथानकही तितकेच ताकदीचे आहे. बैलगाडीतून प्रवास करणारा एक गावकरी गावासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने कसा झपाटून जातो आणि स्वतःची एअरलाईन्स स्थापन करतो, त्याच्या यशाची ही गोष्ट आहे. हे कथानक डेक्कन एअरलाईन्सचे संस्थापक कप्तान जी. आर. गोपीनाथ यांच्या आयुष्यावर आधारित सिंपल फ्लाय या पुस्तकावर बेतलेले आहे. त्यांच्या संघर्षाची ही कथाच मुळी मनाचा ठाव घेणारी आहे. नेदूमारन राजांगम हे यातील मुख्य पात्र. नेदूमारन सर्व थरातील लोकांना हवाई प्रवास परवडावा म्हणून धडपडत असतो आणि शेवटी यशस्वी होतो.

ऑस्करच्या शर्यतीत पोचला म्हणजे काय?

हा चित्रपट सध्या ऑस्करच्या स्क्रीनिंग रूम मध्ये पोहोचला असला तरी अजून बरीच लढाई बाकी आहे. स्क्रीनिंग रूम मध्ये पोहोचणे ही ऑस्करच्या शर्यतीतील फक्त पहिली पायरी आहे. स्क्रीनिंग रूममधून पुढच्या राउंडमध्ये जाण्यासाठी या चित्रपटाला भरपूर मते मिळवावी लागतील. दुसऱ्या राउंड मधून नामांकन मिळण्यासाठीही त्याला अजून काही मते मिळवावी लागतील. आधी पाहणी, मग मते, मग आणखी काही मते, मग लॉबिंग आणि मग नामांकनासाठी निवड, अशी ही बरीच मोठी प्रक्रिया आहे.

कोणताही चित्रपट ऑस्करच्या स्क्रीनिंग रूममध्ये प्रस्तुत करण्यासाठी आधी १२,५०० डॉलर्स म्हणजे जवळजवळ ९,१२,००० रुपये इतके प्रवेश शुल्क मोजावे लागते. त्यानंतरच चित्रपट परीक्षणासाठी सादर केला जातो. यावेळी ऑस्करच्या परीक्षणासाठी ऑनलाईन चित्रपट स्वीकारले जात आहे. त्यासाठी डीव्हीडीची गरज नाही. स्क्रीनिंग टीमला अॅपल टीव्ही आणि अॅपल टीव्ही 4k अॅप वरून हे स्क्रीनिंग पाहता येऊ शकते. याच्या पुढची प्रक्रिया मात्र नेहमीसारखीच राहिल.

सुराराई पोटरुला या सगळ्या दिव्यातून पार पडावे लागेल. तेंव्हा कुठे ऑस्करसाठी नामांकन मिळेल. मात्र ऑस्करच्या शर्यतीत दाखल होणे ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. सुरिया आणि त्याच्या संपूर्ण टीमला यासगळ्या प्रक्रियेतून पार पडून यश मिळवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required