computer

या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'च्या विद्यार्थ्यांना तुम्ही ओळखू शकता का? फोटो पाहून घ्या !!

हिंदी सिनेमा गाजवणाऱ्या अनेक मंडळींनी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ या संस्थेमधून अभिनयाचे धडे घेतले आहेत. नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, अनुपम खेर, नावाजुद्दिन सिद्दिकी, पंकज त्रिपाठी अशी काही गाजलेली नावं सहज घेता येतील. जाने भी दो यारों, मंडी, बधाई हो, शुभमंगल ज्यादा सावधान या चित्रपटातून झळकलेल्या नीना गुप्ता या देखील याच संस्थेच्या विद्यार्थिनी. त्यांनी १९८० साली एनएसडी मधून शिक्षण पूर्ण केलं. नुकतंच त्यांनी आपल्या एनएसडीच्या दिवसांना उजाळा देण्यासाठी त्यांच्या सहकालाकारांचे फोटो शेअर केले होते.

आज हे अभिनेते-अभिनेत्री यशस्वी तर आहेतच पण  दिग्गज म्हणून ओळखले जातात. चला तर त्याकाळी हे कलाकार कसे दिसायचे ते पाहूया. फोटो खाली नाव दिलेलं आहे, पण ते न पाहता तुम्हाला ओळखता येतं का पाहा.

१.

आज पंकज कपूर म्हटलं की म्हातारा असंच चित्र डोळ्या समोर येतं, पण पंकज कपूर हे तरुणपणी चांगले हँडसम होते. दुर्दैवाने त्यांच्या वाट्याला आलेली पात्रं तरुण नव्हती.  १९८२ साली आलेल्या गांधी चित्रपटातून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या 'ऑफिस ऑफिस' मालिकेने त्यांना घराघरांत पोहोचवलं. त्यांची सर्वात पहिली मालिका 'करमचंद'ही त्याकाळी गाजली होती.

२.

सुश्मिता मुखर्जी यांनी खलनायकी भूमिकांपासून ते अगदी विनोदी पात्रांपर्यंत सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. पंकज  कपूर यांच्या करमचंद मालिकेत त्यांनी किट्टी हे पात्र साकारलं होतं. लोकांमध्ये ते चांगलंच प्रसिद्ध झालं. रोहित शेट्टीच्या गोलमाल सिनेमातील त्यांचं पात्र अजरामर म्हणता येईल असंच आहे.

३.

फोटोखाली नाव नसतं तर सतीश कौशिक यांना ओळखणं कठीण गेलं असतं. त्यांची सर्व गाजलेली पात्रं ही त्यांचं तारुण्य ओसरल्यानंतरची आहेत. मिस्टर इंडियामधलं 'कॅलेंडर' हे त्यांचं अजरामर पात्र. १९८३ साली आलेल्या 'मासूम' चित्रपटापासून त्यांच्या चित्रपटातील करियरची सुरुवात झाली. गाजलेल्या जाने भी दो यारों चित्रपटाचे संवादही त्यांनी लिहिले. पुढे १९९३ सालापासून त्यांनी दिग्दर्शक आणि अभिनेता असं दुहेरी काम सुरु केलं. त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेले चित्रपट तुफान गाजलेले आहेत. गोविंदा आणि सतीश कौशिक यांची जोडी त्याकाळी प्रसिद्ध होती. 

मराठीतल्या गाजलेल्या आणि पुरस्कार मिळवलेल्या 'लालबाग परळ' सिनेमातही सतीश कौशिक दिसले होते. स्वतःच्या विनोदी इमेजला फाटा देऊन त्यांनी 'लालबाग परळ'मध्ये गंभीर भूमिका साकारली होती. 

४.

अनु कपूर यांनी १९७६ साली एनएसडी मध्ये प्रवेश मिळवला. त्यांचा अभिनय बघून श्याम बेनेगल यांनी त्यांना पत्र पाठवलं. या पत्रात त्यांच्या अभिनयाची प्रशंसा तर होतीच पण सोबतच 'मंडी' (१९८३) चित्रपटात काम करण्याची संधी देण्यात आली होती. अनु कपूर हे त्या अभिनेत्यांमधले एक आहेत ज्यांना तरुणांच्या भूमिका फारशा मिळाल्या नाहीत. गाजलेल्या 12 Angry Men चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये (एक रुका हुआ फैसला) अनु कपूर यांनी एका म्हाताऱ्याचं पात्र साकारलं होतं.

५.

एनएसडीतील अनेक विद्यार्थ्यांनी 'गांधी' चित्रपटातून आपल्या करीयरची सुरुवात केली. आपल्या बॉलीवूडचे बापुजी म्हणजे अलोकनाथ हे सुद्धा एनएसडी संस्थेत शिकलेले आहेत. त्यांनी 'गांधी' चित्रपटात तय्यब मोहम्मद नावाचं पात्र साकारलं होतं.

६.

अनुपम खेर हे १९७८ साली एनएसडी मधून पदवी घेऊन बाहेर पडले. सुरुवातीला काही नाटकात काम केल्यानंतर १९८४ साली त्यांना 'सारांश' सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. गम्मत म्हणजे तरुण असूनही त्यांची आयुष्यातली पहिली भूमिका एका जख्ख म्हाताऱ्याची होती. हा चित्रपट त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर गाजवला. याच चित्रपटाने ऑस्करच्या परदेशी चित्रपटांच्या यादीत भारताचं प्रतिनिधित्व केलं.

७.

ह्या घ्या खुद्द नीना गुप्ता. नीना गुप्ताचं आयुष्य वादळी म्हणावं असंच गेलं. विव्हियन रिचर्डसन सोबतचे संबंध आणि त्यानंतर मुलीचे स्वीकारलेले एकल मातृत्व, उतारवयात लग्न आणि सोबत करियरमधली उतरंड त्यांनी पाहिली. त्यांच खाजगी आयुष्य त्यांच्या करियरमधली बाधा बनून नेहमी येत राहिलं. बरीच वर्ष त्यांना काम मिळत नव्हतं. काम मिळत नाही हे ट्विट करण्याचं धाडसही त्यांनी दाखवलं. सुदैवाने त्यांना कामं मिळालीही. बधाई हो मधली उतार वयातल्या गरोदर महिलेचं पात्र साकारण्याची हिम्मत त्यांनी दाखवली. बधाई हो नंतर त्यांच्याकडे येणाऱ्या कामाची रीघ वाढली आहे, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. 

सबस्क्राईब करा

* indicates required