'नॅशनल सिनेमा डे'च्या निमित्ताने २३ तारखेला पाहा फक्त ७५ रुपयांत सिनेमा!! हा दिवस साजरा का होतोय? तो पुढे का ढकलला?

यंदाचे वर्ष बॉलिवूडसाठी प्रचंड नैराश्यवादी आहे. एकामागून एक मोठया अभिनेत्यांचे आणि बिग बजेट सिनेमे पडत असताना काय करावे हे बॉलिवूडच्या दिग्गजांना सुचत नव्हते. या कारणास्तव आणि सिनेमांचे यश साजरे करण्यासाठी, तो यशस्वी करणाऱ्या रसिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतातील मल्टिप्लेक्स असोसिएशनने १६ सप्टेंबरला नॅशनल सिनेमा डे साजरा करण्याचे घोषित केले होते. त्यादिवशी सिनेमा थिएटर्समध्ये कुठलाही सिनेमा कुठल्याही स्क्रीनवर बघितला तरी त्यासाठी फक्त ७५ रुपये मोजावे लागतील अशीही यासोबत घोषणा करण्यात आली होती. 

अशात रणबीर कपूर आणि आलिया भटचा ब्रह्मास्त्र आला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर कोटींच्या कोटी उड्डाणे घेतली. हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी देशभर नॅशनल सिनेमा डे साजरा करण्यात येणार असे घोषित करण्यात आले होते. यामुळे १६ रोजी ब्रह्मास्त्रचा आनंद निम्म्या पैशात घेऊ म्हणून अनेकांनी तयारी करून ठेवली होती.

पण या आनंदावर काहीसे विरजण पडले आहे. कारण ज्या पद्धतीने ब्रह्मास्त्र सुसाट कमाई करत आहे, त्यामुळे या कमाईला धक्का बसू नये यासाठी नॅशनल सिनेमा डे पुढे ढकलण्यात आला आहे. आता १६ ऐवजी २३ सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येणार असून त्यादिवशी सिनेमाघरांमध्ये जो सिनेमा लागला असेल तो बघता येणार आहे. यासाठी एकतर आताच ब्रह्मास्त्र बघून नंतर थेटरमध्ये दुसरा बघावा किंवा मग ब्रह्मास्त्र साठी २३ सप्टेंबरपर्यंत थांबावे असा उपाय लोकांसमोर असणार आहे. 

या विषयी मल्टिप्लेक्स असोसिएशनने सविस्तर निवेदन दिले आहे. पुनश्च एकदा थेटर भरु लागल्याने प्रेक्षकांना धन्यवाद देण्यासाठी अशा भन्नाट पद्धतीने हा नॅशनल सिनेमा डे साजरा केला जाणार आहे. देशातील तब्बल ४००० स्क्रीन्सवर एकाच वेळी इतक्या कमी किंमतीत सिनेमा पाहता येण्याची ही पहिलीच वेळ असेल. यात पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलीस, कार्निव्हल, मिराज, सिटीप्राईड, एशियन, मुक्टा A2, मुव्ही टाईम, व्हेव्ह, M2K, डेल्हाईट आणि इतर बड्या ब्रँड्सच्या थिएटर्समध्ये सिनेमा पाहता येणार आहे. 

नॅशनल सिनेमा डे ची ही आयडिया आली ती अमेरिकेतून. ३ सप्टेंबर रोजी संपूर्ण अमेरिकेत ३ डॉलरला लोकांना सिनेमा पाहता आला. तब्बल ३,०००० स्क्रीन्सवर अशा पद्धतीने स्वस्तात सिनेमा दाखवला गेला. अमेरिकेतील अनुभव पाहायचा तर स्वस्त तिकीट दराच्या दिवशी सहापट अधिक अमेरिकनांनी सिनेमे बघितले. भारतातले सिनेमा प्रेम बघितले तर अमेरिकेपेक्षा या दिवशी जास्त झुंबड उडण्याची शक्यता आहे.

या माध्यमातून लोकांना सिनेमा थेटर्सकडे खेचण्याचा मल्टिप्लेक्स असोसिएशनचा प्रयत्न दीर्घकाळासाठी यशस्वी होती की नाही येत्या काही काळात येणाऱ्या सिनेमांना कसे यश मिळते याने समजणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required