बघा एका आम आदमीची कहाणी आता डॉक्युमेंट्रीच्या रुपात !!!
दिग्दर्शक विनय शुक्ला आणि खुशबू रंका या जोडगोळीनं मिळून एक डॉक्युमेंट्री बनवलीय. ‘अॅन इंसिग्नीफीकंट मॅन’. डॉक्युमेंट्रीच्या केंद्रस्थानी आहेत ‘अरविंद केजरीवाल. अर्थात अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी!! असं म्हटलं जातंय की क्राउड फंडिंगने तयार केलेली ही सर्वात मोठी फिल्म असेल. या डॉक्युमेंट्रीचा नुकताच रिलीज झालेला ट्रेलर आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
तर मंडळी, आता तुम्ही थोडे अस्वस्थ झाला असाल. अरविंद केजरीवाल यांच्यावर डॉक्युमेंट्री? ४९ दिवसात राजीनामा देणाऱ्या माणसावर डॉक्युमेंट्री? सामाजिक कार्याचं राजकारण करणारा? खोकणारा मुख्यमंत्री? आणि यांच्यावर डॉक्युमेंट्री वगैरे वगैरे....
अण्णा हजारे यांच्यासोबत लोकपालचा लढा देत असताना हा माणूस सगळ्यांना दिसला. त्याआधी ‘माहिती अधिकाराचा कायदा’ आणण्यासाठी त्यांनी लढा दिला. २००६ साली त्यांच्या नेतृत्वासाठी ‘रेमन मॅगसेसे पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवण्यात आलं. आणि मग एके दिवशी त्यांनी या सामाजिक क्षेत्रातून थेट आम आदमी पार्टी उभारली आणि दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. हा खूप मोठा प्रवास या डॉक्युमेंट्रीमध्ये बघायला मिळेल हे ट्रेलर पाहतानाच दिसतंय.
सेन्सॉर बोर्डचे माजी अध्यक्ष ‘पहलाज निहलानी यांनी ही डॉक्युमेंट्री-कम-फिल्म रोखून धरली होती. त्यांनी असं सांगितलं होतं की ही फिल्म आधी पंतप्रधान व अन्य राजकारण्यांना दाखवण्यात यावी आणि त्यांनतरचं रिलीज करावी. अखेर पुढच्या महिन्यात १७ नोव्हेंबर रोजी फिल्म रिलीज होणार आहे.
अरविंद केजरीवाल यांच्याबद्दलचं मत ज्याचं त्याने ठरवावं. पण एक डॉक्युमेंट्री म्हणून या फिल्मकडे स्वतंत्रपणे बघण्याची गरज आहे. चित्रीकरणाची पद्धत, पार्श्वसंगीत, विषयाची मांडणी या दृष्टीने फिल्म चांगली असण्याची शक्यता आहे.





