computer

बॉलीवूडवर टीका करणारा, फ्रांसवरून पाणी, हॉलंडवरून दूध आणि लंडनवरून चहा मागवणारा हा केआरके आहे तरी कोण?

बॉलिवूडमध्ये अनेक सुपरस्टार आणि स्टार आहेत. त्याचबरोबरीने अनेक वादग्रस्त कलाकारही आहेत. जसे प्रत्येक सिनेमात मसाला टाकण्यासाठी एक साईड हिरो असतो तसे बॉलिवूडमध्ये हे साईड हिरो असतात. या कलाकारांना सिनेमात काम मिळो वा न मिळो, त्यांची कला दिसो वा न दिसो पण तोंडात येईल ते बरळून नाव कमावणे हे त्यांना चांगले जमते. अशा वादाच्या बाबत राखी सावंत ही बॉलीवूडची राणीच म्हणावी लागेल. पण सध्या तिलाही मागे टाकत एक गडी बॉलिवूडला घाम फोडत आहे.

केआरके नावाने प्रसिद्ध असलेला कमाल रशिद खान हंस आपल्या आगळ्या वेगळ्या सिनेपरिक्षणामुळे बॉलिवूड स्टार्ससाठी डोकेदुखी ठरत आहे. सिनेपरीक्षण करत असताना तो अतिशय वाईट शब्दांमध्ये बॉलीवुडकरांचा पाणउतारा करत असतो. त्याचवेळी आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून किंवा ट्विटरवरूनही खळबळजनक वक्तव्य करतो. लोकांना चटपटीत गोष्टी हव्या असतात आणि त्याच तो पेरत असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करून देखील चालत नाही.  ज्या सेलिब्रिटीजना तो टार्गेट करतो त्यांना आणि त्यांच्या फॅन्सच्या मनात, शिवाय ज्या फिल्म्सना तो नावे ठेवतो त्यांच्या फॅन्सच्या मनात केआरकेबद्दल प्रचंड राग आहे, पण त्याच्याविषयी कुतुहलही आहे. आजच्या लेखातून आपण हे कुतूहल शमवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

केआरकेचे मूळ नाव आहे राशीद खान पण त्याने स्वतःच्या नावापुढे कमाल जोडून स्वतःला केआरके म्हणवून घेतले आहे. देशातील लाखो लोकांसारखा तो हिरो होण्यासाठी काही वर्षांपूर्वी मुंबईत आला. कित्येक दिवस संघर्ष करून त्याला काही मोठे काम मिळाले नाही, मग त्याने काही कमी बजेटच्या हिंदी आणि भोजपुरी सिनेमांमध्ये काम केले. तिथून थोडे पैसे जमा करून त्याने स्वतः सिनेनिर्मिती करायला सुरुवात केली. 

या काळात त्याने देशद्रोही नावाचा सिनेमा तयार केला आणि सिनेमा बॉक्सऑफिसवर आपटला असला तरी या सिनेमाने तयार केलेली काँट्रॅव्हर्सि त्याला बिगबॉसच्या घरात घेऊन गेली. बिग बॉसचे घर हे विचित्र गोष्टी करण्याचीच जागा असली तरी, केआरके बाहेर येऊन देखील सुधारला नाही. अभिनेत्री असिनला रोज सकाळी किस पाठवणे असो की सारा खानला प्रपोज करणे असो तो बातम्यांमध्ये झळकत होता. 

केआरकेचा दावा आहे की तो मुंबईत २० हजार स्क्वेयर फुटच्या घरात राहतो. फ्रांसवरून पाणी, हॉलंडवरून दूध आणि लंडनवरून चहा मागवतो. फेकायचे तर लांबचे फेकायचे हे सूत्र त्याने अवलंबल्याचे दिसून येते. पण त्याच्याकडे खरोखर चांगला पैसा आहे असे अनेक माध्यमांनी नोंदवले आहे. आखाती देशांमध्ये मजूर पाठवण्याचे काम आणि कापडाचा व्यवसाय करत असल्याने त्याची चांगली कमाई होते. बॉलिवूडची गोची इथेच होते त्याच्यावर बहिष्कार टाकून पण त्याला फरक पडत नाही, कारण तो पैशांसाठी बॉलिवूडवर अवलंबून नाही. गेले अनेक वर्ष तो सिनेपरिक्षण या एकमेव अंगाने बॉलिवूडशी जोडलेला आहे आणि याच गोष्टीने बॉलिवूडला घाम फोडला आहे.

टेली चक्करच्या एका अहवालानुसार हा पठ्ठ्या टकला आहे. पण ही गोष्ट लिक होऊ नये यासाठी तो झोपताना सुद्धा विग लावून झोपतो. ही गोष्ट बिगबॉसच्या घरातून बाहेर पडली होती. पण ती गोष्ट देखील त्याने सगळी ताकद लावून दाबली. त्याचे वय देखील किती याबद्दल संभ्रम आहे. एका मुलाखतीत त्याने ३९ सांगितली होती, तर त्याच्या वेबसाईटवर ३३ आहे. त्याच्याकडे बघून मात्र तो ४० पेक्षा कमी वयाचा असेल असे वाटत नाही.

वर्सोवाला त्याने ऑफिस तयार केले आहे. या ऑफिसचा पुढचा भाग पूर्ण काचेचा असून त्यावर मोठ्या अक्षरात 'आर' लिहिले आहे. तिथे सगळीकडे त्याचा बंदूक हातात घेतलेला फोटो लावून तो काय सिद्ध करू इच्छितो हे त्यालाच माहीत. शाहरुख खानच्या घराचे नाव आहे मन्नत त्याच धर्तीवर केआरकेने दुबईमध्ये घर घेऊन त्याचे नाव जन्नत ठेवले आहे. 

केआरके नुकतेच सलमान खानच्या राधे सिनेमावरून त्याच्यावर प्रचंड टीका केल्याने सलमान खानने त्याच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. यावर उत्तर देताना केआरकेनी उलट धमकी देत 'तुला रस्त्यावर आणेन' म्हणाला. आजवर केआरकेने अनेक सेलिब्रिटींना अंगावर घेतले पण कोणीही त्याला शांत करू शकला नाही. आता स्वतः बॉलीवुडचा भाऊ केआरकेच्या मागे लागला आहे. आता केआरके शांत होतो की सलमानला पण त्याच्यापुढे हात टेकावे लागतात ते येत्या काळात समजेलच...

सबस्क्राईब करा

* indicates required