computer

आयकर खात्याने थकित कर वसूलीसाठी संगीतकाराला दिलेल्या विचित्र आणि रंजक ऑफरची गोष्ट!! शेवटी निष्पन्न काय झालं?

कल्पना करा, एखाद्या छानशा हॉटेलात तुम्ही शेवटच्या ३० मिलीचा आस्वाद घेत आहात. आजूबाजूला भारून टाकणारे वातावरण आहे. बरोबर मित्रांची छान कंपनी आहे. एखाद्या हॉट टॉपिकवर चर्चा चालू आहे. आणि तेवढ्यात तुमच्या टेबलापाशी एक आजोबा येऊन बसतात आणि म्हणतात की "मी माझ्या आयुष्यातल्या चार छान छान आठवणी तुम्हाला सांगणार आहे. त्या ऐकून तुम्ही मला थोडे पैसे द्याल का?" अशावेळी तुमच्या मनात पहिला विचार येईल, 'आजोबांना आज जरा जास्तच झालेली दिसतेय'.

आता आम्ही म्हटले, "तुमचे जाऊ द्या, पण अशाच चार आठवणींच्या मोबदल्यात आयकर खात्यानेच भागीदारी करून पैसे कमवायचा प्रयत्न केला होता." तर तुम्ही म्हणाल, "आजोबांचे जाऊ द्या, बोभाटाच्या लेखकालाच जरा जास्त झालीय बहुतेक!"

पण हे खरे आहे.

तुम्हाला माहितीये? एका माणसाच्या आठवणींच्या मोबदल्यात आयकर खात्याने भागीदारीत पैसे कमवायचा प्रयत्न केला होता. ही सत्यघटना अमेरिकेत घडलेली आहे, आणि त्या माणसाचे नाव आहे विली नेल्सन.

हा विली नेल्सन तिकडचा प्रसिद्ध गीतकार आणि संगीतकार. लोकसंगीताच्या दुनियेतील मोठे नाव. अमेरिकेत कुठल्याही छोट्या शहरातील एखाद्या बारमध्ये जा, तिथे तुम्हाला याचे एक तरी गाणे ऐकू येईलच. त्याच्या नावावर शेकडो गाणी असली तरी त्यापैकी सगळ्यात जास्त प्रसिद्धी वाट्याला आलेला अल्बम म्हणजे 'हू विल बाय माय मेमरीज?' याचे कारण म्हणजे या अल्बमची गोष्ट जरा विचित्र आहे.

मुळात या अल्बमची निर्मिती विली नेल्सनला त्याचा कर चुकता करता यावा म्हणूनच झाली होती. ही इतिहासातील एक अद्वितीय घटनाच म्हणावी लागेल. या नेल्सन महाशयांची कारकीर्द जितकी गाजली तितकेच त्यांचे टॅक्सबद्दलचे किस्सेही. झाले होते असे- या नेल्सनने संपत्ती तर अफाट कमावली, पण जेव्हा टॅक्स भरण्याची वेळ आली तेव्हा हात वर केले. पुढे त्याचा कराचा थकलेला हप्ता इतका वाढला की त्याच्यावर तब्बल १६.७ दशलक्ष डॉलर एवढे थकित कर्ज जमा झाले. यात कर्ज आणि ते न चुकवल्याने झालेला दंड या दोन्हींचा समावेश होता. अमेरिकेच्या आयकर खात्याच्या इतिहासात ही बहुधा पहिलीच आणि एकमेव केस असेल, ज्यात वैयक्तिक कर्जाची रक्कम इतकी प्रचंड होती. त्याच्या वकिलाने खटपटी लटपटी करून ही रक्कम ६ दशलक्ष डॉलरवर आणली. तरी तेवढे तरी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न होताच. नेल्सनकडे तेवढेही पैसे नव्हते. त्यामुळे त्याने तेही भरले नाहीत.

शेवटी नोव्हेंबर १९९० मध्ये आयकर खात्याने त्याच्या घरावर धाड टाकून त्याची सगळी मालमत्ता ताब्यात घेतली. त्याचे राहते घर, चार शहरांमधील त्याच्या वीस मालमत्ता, त्याचा रेकॉर्डिंग स्टुडिओ, त्याच्या मालकीची रँच (उत्तर अमेरिकेत जनावरांची पैदास करण्यासाठी असलेल्या विस्तीर्ण कुरणांना रँच म्हणतात), वाद्ये, काही रेकॉर्डिंग्ज या सगळ्यावर जप्ती आली. यातून फक्त त्याची आवडती ट्रिगर नावाची गिटार सुटली. तीही त्याच्या मुलीने आपल्या घरावर धाड पडणार याची कल्पना आल्यावर ती आधीच घराबाहेर हलवली होती. पण या जप्तीनंतरही फारसे बिघडले नाही. त्याचे मित्र आणि फॅन्स त्याची सुटका करण्यासाठी पुढे सरसावले. त्यांनी त्याची मालमत्ता आणि घर परत मिळवण्यासाठी निधी उभारला.

पण मुळात नेल्सन या सगळ्यात अडकलाच कसा?

१९८४ मध्ये आयआरएस (इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिस - आपल्याकडील आयकर खात्यासारखा अमेरिकेतील विभाग) ने त्याच्या संपत्तीची चौकशी करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी त्याचा करांचा तपशील तपासला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले, की या माणसाला करातून सूट मिळण्यासाठी केलेल्या गुंतवणूकांवर मोठ्या प्रमाणावर करसवलत देण्यात आली होती. ही सवलत कायदेसंमत नव्हती. त्यामुळे ती नाकारून उलट त्याला करापोटी सहा दशलक्ष डॉलर्स, त्यावरील सहा वर्षांसाठीच्या व्याजापोटी आणि दंडाच्या रकमेपोटी दहा दशलक्ष डॉलर्स एवढी रक्कम आकारण्यात आली. प्रत्यक्षात नेल्सनला करातून सवलत मिळावी यासाठी प्राईस वॉटरहाऊस (पीडब्लूसी) या त्याच्या त्यावेळच्या अकौंटिंग फर्मने ओव्हरसीज टॅक्स शेल्टर वापरले होते, जे टॅक्स शेल्टर नव्हतेच. हे नंतर बेकायदेशीर असल्याचे आढळून आले. नेल्सनने आपल्या आर्थिक अरिष्टासाठी प्राईस वॉटरहाऊसला जबाबदार ठरवत त्यावर ४५ दशलक्ष डॉलरचा दावा ठोकला. (पुढे पीडब्लूसीने यावर मार्ग काढत तडजोड करण्याची तयारी दाखवल्याने हे प्रकरण सेटलमेंट होऊन मिटले.)

१९९० पर्यंत थकित कराची रक्कम जवळपास दुप्पट झाली. काहीच तोडगा न निघाल्याने शेवटी आयआरएसने मालमत्तेवर जप्ती आणून तिचा लिलाव करण्याचे ठरवले. प्रत्यक्ष धाडीदरम्यान जे काही जप्त केले तेही पुरेसे नव्हते.

आणि इथे या कथेत ट्विस्ट आला. तो म्हणजे नेल्सन आणि आयआरएस यांच्यातील अनोखा करार.

या करारानुसार नेल्सनने आपल्या संगीतरचनांचा एक अल्बम प्रसिद्ध करावा आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा आयआरएसला द्यावा असे ठरले. या अल्बमचे शीर्षक होते : 'द आयआरएस टेप्स : हू विल बाय माय मेमरीज?' या अल्बममधील रचना स्वतः नेल्सनने लिहिल्या होत्या आणि त्याच्या लाडक्या ट्रिगर या गिटारवर त्या ध्वनिमुद्रित केलेल्या होत्या. आयआरएसच्या इतिहासातील हा कदाचित पहिला आणि एकमेव प्रयोग असेल. या टेपची किरकोळ विक्रीची किंमत प्रति टेप १९.९५ डॉलर एवढी ठरवण्यात आली होती. त्यापैकी आयआरएसला प्रति टेप तीन डॉलर एवढी रक्कम त्याचे सध्याचे कर्ज फेडण्यासाठी दिली जाणार होती. याशिवाय या अल्बमच्या विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नावरील कर म्हणून प्रति टेप दोन डॉलर आयआरएसकडे जमा होणार होते.

पण प्रत्यक्षात या अल्बमला म्हणावे तितके यश मिळाले नाही. कराराप्रमाणे कर्ज पूर्ण चुकते करण्यासाठी कमीत कमी चार दशलक्ष कॉपीज विकल्या जाणे गरजेचे होते. तसे झाले नाही. आयआरएसला यामधून केवळ ३.६ दशलक्ष डॉलर एवढी रक्कम गोळा करता आली. परंतु तोपर्यंत नेल्सनने प्राईस वॉटरहाऊसला कायद्याच्या कचाट्यात पकडून नुकसान भरपाई देण्यास भाग पाडले. कोर्टाबाहेर समझोता करून प्राईस वॉटरहाऊसने त्यांची लाज वाचवली. याखेरीज मधल्या काळात त्याला इतरही काही कामे मिळाली होती. त्यामुळे काही वर्षात त्याला उरलेले कर्ज चुकते करता आले.

त्यावेळच्या एका आयआरएस अधिकाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे ते (आयआरएस) नेहमी करदात्यांचे हित जपण्यासाठी प्रयत्न करत, त्यातूनच कर चुकता करण्याची ही नामी क्लृप्ती प्रत्यक्षात आली.

आणि नेल्सनचे काय झाले? या घटनेनंतर त्याने परत कामाला सुरुवात केली. पुढील वीस वर्षांत त्याने भरपूर काम केले. अनेक रचना केल्या, अल्बम्सची निर्मिती केली. चांगले नाव आणि पैसे मिळवले.

आपल्या देशातही कर न भरणाऱ्यांची, तो चुकवणाऱ्यांची कमी नाही. अशा लोकांच्या बाबतीत आपल्याकडील आयकर खात्यानेही असा उपाय करून पाहिला तर कितपत यशस्वी होईल? तुम्हाला काय वाटते?

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required