computer

गोवा आणि हिप्पी यांचे नाते का जुळले असावे? जगभरच्या हिप्पींचा इथला एकच पत्ता काय होता?

पण काही म्हणा, मनसोक्त आणि उन्मुक्त जगण्याची एक पद्धत म्हणजे हिप्पी शैली. कोणतेही पाश नाहीत, कोणत्याही एकाच संस्कृतीशी, देशाशी निगडीत नाहीत अशी ही जीवनपद्धत. ही हिप्पी स्टाईल साधारण १९६०च्या दरम्यान पाश्चात्य जगात उदयास आली आणि बघता बघता ही जगभर पसरली. मनाला येईल तसे जगायचे, मन करेल त्या दिशेला जायचे, चित्रविचित्र आकाराची आणि भडक रंगांचे कपडे घालायचे, केस वाढवायचे, कायम नशेत राहायचे, थोडक्यात काय तर, रूढ जगाचा कोणताही नियम न पाळणे म्हणजे हिप्पी जीवन!!. अशा या मनस्वी हिप्पी तरुणांना भारतातील गोव्याची विशेष भुरळ पडली आणि गोवा म्हणजे जणू यांच्यासाठी एक हक्काचे घरच झाले.

गोवा आणि हिप्पी यांचे नाते जुळण्यामागे नेमके काय कारण होते? जाणून घेऊया या लेखातून.

हिप्पींच्याही आधी गोव्यात आले ते डच आणि पोर्तुगीज. उर्वरित भारत इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला असला तरी पोर्तुगीजांनी मात्र गोव्याची सत्ता सोडली नव्हती. गोवा मुक्ती संग्राम जोर धरत असतानाच दुसरीकडे मात्र हिप्पी जीवनाची भुरळ पडलेले तरुण गोव्याकडे आकृष्ट होत होते. गोव्यातले मुक्त वातावरण आणि सर्वसमावेशक संस्कृती यामुळे गोव्यात हिप्पी चळवळ चांगलीच फोफावली.
गोव्यात येणारे हे तरुण युरोप किंवा अमेरिकेतून आलेले असत. लंडन किंवा ॲमस्टरडॅममधून निघालेले हे तरुण जीवानातील आनंद लुटत लुटत आशियाकडे वळले. मग भारताकडे आणि मग गोव्याकडे. त्यांच्या या मुक्त प्रवासात गोवा हे त्यांचे एक कायमचे ठिकाण बनेल याची कदाचित त्यांनीही कल्पना केली नसेल. गोव्यातील सोनेरी समुद्र किनारे, पर्यटकांना मिळणारी जिव्हाळ्याची वागणूक, हिप्पी जीवनासाठी आवश्यक असणारी सांस्कृतिक बहुविधता, पाश्चात्य जीवनशैलीचा इथल्या जनमानसावर असलेला प्रभाव आणि एकूणच वातावरण यामुळे हिप्पीजना त्याकाळी गोवा म्हणजे त्यांचे माहेर वाटले नसते तरच नवल.

गोव्याच्या भूमीत या हिप्पी लोकांना आपले अंतिम ठिकाण सापडले होते जिथे त्यांना अडवणारे कुणीही नव्हते. उलट त्यांच्या जीवनशैलीला इथले वातावरण पोषकच होते.

पोर्तुगीजांनी ४५० वर्षे गोव्यावर राज्य केले. या काळात त्यांनी गोव्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. १९६० च्या दशकात भारतीयांनी गोव्यावर कब्जा मिळवलाच. यानंतर गोवा हे स्वतंत्र राज्य न राहता भारताचाच एक भाग बनले. गोवा मुक्त झाला असला तरी, तिथले अन्न, संस्कृती, आणि स्थापत्यशैली या सर्वांवर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव जाणवत होता. गोव्यातील एकंदर जीवनशैली ही शांत-निवांत अशा पद्धतीची होती.

गोव्याच्या सौंदर्याने हिप्पीजना अधिकच भुरळ घातली. लांबलचक समुद्र किनारे आणि गोंय लोकांचे आदरातिथ्य या सर्वांमुळे हिप्पीजना गोवा सोडून जाण्याचे मनच होत नव्हते. दुसरे एक कारण म्हणजे गोव्यात नशिले पदार्थांची खरेदी-विक्री करणे अगदी सुलभ होते. कारण अजून या छोट्या राज्याची पोलीस यंत्रणा पूर्णतया सक्षम झाली नव्हती. नशिल्या पदार्थांचे सेवन हे तर हिप्पी संस्कृतीचे एक प्रमुख लक्षण!! अशा सगळ्या अनुकूल वातावरणामुळे सुरुवातीला आलेल्या हिप्पी तरुणांना गोवा सोडून दुसरीकडे कुठे तरी भटकत जावे असे वाटलेच नाही. गोव्यात तेव्हा पायाभूत सुविधांची कमी असली तरी खुली आणि मोठी बाजारपेठ आणि स्थानिक लोकांचे मिळून मिसळून राहणे या सवयीमुळे हिप्पीजना गोवा हेही आपलेच घर असल्यासारखे वाटले तर त्यात नवल काहीच नव्हते.

गोव्यातल्या अंजुना गावात तर त्यांना अगदी त्यांच्या मनासारखे मुक्त वातावरण मिळत होते. अंजुनामध्ये हिप्पीजना फारच सवलत मिळाली. हिप्पी म्हणजे सतत भटकणारे, त्यांना त्यांचा असा विशिष्ट पत्ता नव्हता. अशा हिप्पी लोकांना गोव्यातल्या अंजुना गावच्या एका कॅफेत हक्काचा पत्ता मिळाला होता. आपल्या घरातून काही मागवायचे असेल किंवा आपल्या पाहुण्यांसाठी काही पाठवायचे असेल तर ते या अंजुना गावातल्या दिएगो उर्फ जो बनानाच्या पत्त्यावर येई. त्यामुळे दूर देशीच्या हिप्पींना आपल्या नातेवाईकांशी संपर्क राखणे सुलभ झाले. हिप्पी,साठी येणारे प्रत्येक पत्र असो की ख्रिसमस कार्ड, ते C/O – जो बनाना या पत्त्यावरच येत असे. आजही अंजुना गावात ज्यो बनानाचा हा कॅफे आहे. आता त्याचा मुलगा टोनी तो कॅफे चालवतो. टोनीने त्याकाळी त्याच्या वडिलांनी हिप्पीजच्या पत्रांसाठी ठेवलेला लाकडी बॉक्स अजूनही जपून ठेवला आहे.

गोव्यातील बाजारपेठेत हिप्पींना आवश्यक असणाऱ्या वस्तू तर मिळतच, पण हिप्पीजना स्वतःला एखादा व्यवसाय करायचा असेल किंवा वस्तूची विक्री करायची असेल तर त्यासाठी गोवन बाजारपेठ एक उत्तम संधी ठरली. एट फिंगर एडी नावाचा एक हिप्पी गोव्यात सूप किचन नावाचे शॉप चालवत असे, सोबतच अंजुना मधील सामान्य लोकांना तो त्यांचे नवे रस्ते शोधण्यातही मदत करत असे.

गोव्यातील सामाजिक वातावरण हे पाश्चिमात्य धाटणीचे होते. बाहेरून येणाऱ्या हिप्पींना इथे कधीच परकेपणा जाणवत नसे. त्यामुळेच इथे हे हिप्पी इथेच रुळले. अर्थात, नंतर नंतर गोव्यातील या हिप्पी चळवळीला उतरती कळा लागली. एकाच ठिकाणी थांबण्यात हिप्पींना तसाही रस नव्हताच. आयुष्याच्या पुढच्या वाटा धुंडाळण्याच्या इच्छ्ने ते गोव्यातूनही बाहेर पडले आणि गोव्यातील ही हिप्पी चळवळ हळूहळू थंडावत गेली.

गोव्यात हिप्पीजनी सांस्कृतिक आदानप्रदानामध्ये कशी भर घातली आणि इथे हिप्पी चळवळ कशी स्थिरावली होती हे पुढील फोटो पाहिल्यास समजून येईल.

काही हिप्पी गोव्यातच स्थायिक झाले, त्यांनी आपापले व्यवसाय सुरु केले. १९६०च्या दशकातील ही चळवळ १९८०च्या दशकापर्यंत पूर्णतः विस्कळीत झाली. गोव्यात आजही भरपूर पर्यटक येतात, पण हे हिप्पी नसतात. तर मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबे असतात ज्यांना गोवा आणि गोव्यातील सामाजिक वातावरण पाहण्याची उत्सुकता असते, मात्र काहींना हे वातावरण फारसे रुचत नाही. स्थानिक गोवेकर मात्र आजही येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे स्वागत तितक्याच आत्मीयतेने करतात.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required