computer

अमुकतमुक रेल्वे स्टेशन समुद्रसपाटीपासून किती उंच आहे हे स्टेशनच्या पाटीवर का लिहिले असते ?

भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातले सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज लाखो भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात. स्वस्त आणि जलद सेवेसाठी रेल्वेला पर्याय नाही. रेल्वे फक्त प्रवाशांसाठीच नाही, तर मालवाहतूकीसाठीही महत्वाची आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान रेल्वेने भारताच्या कानाकोपऱ्यात अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि या साथीच्या लढाईत सर्वात महत्वाचे योगदान दिले. रेल्वेचा प्रवास कुठल्याही वयात केला तरी अनेक आठवणी देतो. रेल्वे स्टेशनवर वाट पाहत असतानाही अनेक गोष्टी आपल्याला दिसतात ज्याचे कुतूहल मनात असते. म्हणजे पाहा, स्टेशनचे नाव लिहिलेला पिवळ्या रंगाचा बोर्ड! या बोर्डावर शहर किंवा गावाच्या नावाशिवाय बोर्डवर समुद्र सपाटीपासूनची उंचीही लिहिली जाते. कधी प्रश्न पडलाय का? ती उंची का लिहिलेली असते. आज आपण त्याचे कारण समजून घेऊयात.

रेल्वे स्टेशन छोटे असो अथवा मोठे, प्रत्येक ठिकाणी पिवळ्या रंगाचा बोर्ड लावलेला असतो. या बोर्डवर शहराचे नाव हिंदी, इंग्रजी आणि उर्दूमध्ये लिहिलेले असते. त्याच्याखाली समुद्र सपाटीपासूनची उंचीचा उल्लेख केलेला असतो. समुद्र सपाटीपासूनची उंचीच का घेतात? कारण पृथ्वीची उंची सर्व ठिकाणी वेगवेगळी असते. कुठेतरी जास्त उंच आहे आणि कुठेतरी कमी आहे. पृथ्वीची एकसमान उंची मोजण्यासाठी आपण समुद्र पातळी वापरतो. तसेच प्रतिकूल परिस्थितीनंतरही समुद्रसपाटीची उंचीत जास्त चढ -उतार होत नाही. एकसमान उंची मोजण्यासाठी वैज्ञानिकांना एका अशा प्रकारच्या बिंदूची गरज होती जे एकसमान दिसेल.

आता तुम्ही विचार करत असाल की, रेल्वे स्टेशनवर हे लिहून काय फायदा होणार ?तर रेल्वे स्टेशनवर समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिल्याने प्रवाश्यांना फायदा होत नाही, तर याचा फायदा रेल्वेच्या ड्रायव्हरला होतो. रेल्वेचा लोको पायलट (ड्रायव्हर) याच्या मदतीने ट्रेनचा वेग कधी नियंत्रित करायचा याचा विचार करतो. जर ट्रेन उंचीच्या दिशेने जात असेल तर लोको पायलट ट्रेनचा वेग आणि इंजिनमधील शक्ती किंवा टॉर्क वाढवतो. आणि जर ट्रेन उतारावर जात असेल, तर लोकपायलट ब्रेकिंग सिस्टमचा वापर करून ट्रेनचा वेग नियंत्रित करतो. म्हणजे समजा, एखादी रेल्वे 100 मीटर समुद्र सपाटीच्या उंचीवरून 200 मीटर समुद्र सपाटीच्या उंची पर्यंत जात असेल तर लोको पायलटला निर्णय घेण्यास सोपे जाते. तो निर्णय घेऊ शकतो की 100 मीटर अधिक चढासाठी त्याला इंजिनला किती पावर द्यावी लागेल. जर रेल्वे खालच्या दिशेने येत असेल तर लोको पायलटला किती ब्रेक लावावा लागेल आणि किती वेग ठेवावा लागेल या सर्व गोष्टी त्याला कळतात.

एकंदर ही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केलेली सोयच आहे. माहिती आवडल्यास जरूर कमेंट करा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required