computer

एका हास्यास्पद बंदीची गोष्टःउत्तर कोरियात अकरा दिवसांसाठी हसण्यावर बंदी !!

द डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया म्हणजेच उत्तर कोरिया.या देशाच्या नावात जरी पीपल्स रिपब्लिक असले तरी, या देशात जनमताला काडीचीही किंमत नाही हे अनेकदा स्पष्ट झालेले आहे. किम जोंग उन यांचे वडील किम जोंग-इन यांच्या कालावधीपासून उत्तर कोरियातील नागरिकांच्या स्वातंत्र्याचे सातत्याने आकुंचन होत आलेले आहे. 

किम जोंग ऊन यांची हुकुमशाही राजवटही जगापासून लपून राहिलेली नाही. त्यांच्या या हुकुमशाही राजवटीत नेहमीच काही ना काही चमत्कारिक फतवे निघत असतात, असाच एक चमत्कारिक फतवा त्यांनी त्यांचे वडील किम जोंग इल यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त काढला आहे. या फतव्या नुसार संपूर्ण देशाने अकरा दिवसांचा दुखवटा पाळायचा आहे. या अकरा दिवसात लोकांना हसण्यावर, मोठ्याने रडण्यावर, टाळी वाजवण्यावर, शॉपिंग करण्यावर, दारू पिण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अगदी या अकरा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तरीही लोकांनी मोठ्याने रडायचे तर नाहीच पण, अकरा दिवसांचा हा राष्ट्रीय दुखवटा संपल्याशिवाय त्यांचे दहन किंवा दफन विधीही करायचे नाहीत. या अकरा दिवसात घरात कुणाचा वाढदिवस असेल तर तोही साजरा करायचा नाही. रेडीओ एशिया फ्री या वाहिनीवरून हे सगळे नियम जाहीर करण्यात आले आहेत. शुक्रवार पासून पुढे अकरा दिवस तिथे हे नियम लागू असतील. 
 

अकरा दिवसाचे हे राष्ट्रीय सुतक लोकं पाळतात की नाही याकडे लक्ष देण्यासाठी पोलिसांना एक्स्ट्रा ड्युटी लावण्यात आल्याचे समजते. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या अधिकाऱ्यांनीही डोळ्यात तेल घालून संपूर्ण परिस्थितीची पाहणी करायची आहे, असाही नियम जरी केला आहे. 

जे कोणी नागरिक या नियमांचे उल्लंघन करताना दिसतील त्यांना ‘आयडियालॉजिकल क्रीमिन्ल्स’ समजून उचलून नेण्यात येते ते कायमचेच. हे गुन्हेगार पुन्हा कधीच परत येत नाहीत. 
 

किम जोंग इल यांनी १९९४ ते २०११ पर्यंत उत्तर कोरियाची सत्ता सांभाळली. १७ डिसेंबर २०११ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी किम जोंग ऊन दरवर्षी त्यांच्या कबरीवर फुले अर्पण करतात आणि तिथे शोकसभा भरवली जाते. दरवर्षीच त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दहा दिवसांचा राष्ट्रीय शोक पाळला जातो. यावर्षी त्यांची दहावी पुण्यतिथी असल्याने त्यात आणखी एका दिवसाची भर घालण्यात आली आहे. 
अकरा दिवसांसाठी कोरियातील लोकांचे जणू जगणेच थांबणार आहे. कदाचित आता त्यांना अशा ‘नियमबद्ध’ जगण्याची सवयच झालेली असावी. 

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required