computer

'बँड-एड'ची जन्मशताब्दी : एका नवविवाहितेचं बोट कापल्याने बँड-एडचा जन्म कसा झाला ?

थोरामोठ्यांची जन्मशताब्दी साजरी करणे हे समजू शकतो, पण चिकटपट्टीची जन्मशताब्दी? शीर्षक वाचून आश्चर्यच वाटलं असेल. पण तुमच्या आमच्या लहानपणीच्या धडपडण्याचा इतिहास आठवा. त्या धडपडीचा खरचटणे हा अविभाज्य भाग होता. मग एकदा रडत रडत पाण्याने जखम धुवून झाली की मदतीला यायची 'बँड-एड'ची चिकटपट्टी. ती पट्टी लावली पुन्हा एकदा खेळ सुरु व्हायचा. चार दिवसांत जखम भरूनही यायची. तर या वर्षी 'बँड-एड'ची जन्मशताब्दी आहे. या निमित्ताने ऐका बँड-एडच्या जन्माचा गमतीदार किस्सा!

हे सगळं घडलं १९२० साली! जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीत कापूस खरेदीचे काम करणार्‍या अर्ल डिक्सन या तरुणाचं जोसेफाइन नाइट नावाच्या मुलीशी लग्न झालं. नव्या लग्नाच्या नवलाईचे दिवस होते. प्रेमाचा मार्ग पोटातून जातो या उक्तीवर भरवसा असणारी जोसेफाइन स्वयंपाक तर उत्तम करणारी होतीच, पण ती जरा धांदरटच होती. रोज तिचं बोट भाजायचं, नाही तर सुरीने बोट कापलं जायचं. बारीकसारीक जखमांवर पट्ट्या बांधण्याचं काम अर्थातच नवर्‍याला म्हणजे अर्ल डिक्सनला करावं लागायचं. पण बांधलेली पट्टी जागेवर टिकेल तर शपथ!

बिचारा अर्ल डिक्सन पट्ट्या बांधूनबांधून कंटाळून गेला. मग एक दिवस त्याच्या मनात एका आयडियाची कल्पना आली. त्याने सुती पट्टीचे छोटे छोटे तुकडे करून क्रिनोलीन म्हणजे फ्रॉकच्या अस्तरासाठी वापरल्या जाणार्‍या जाड आणि चिवट कापडाच्या पट्टीवर चिकटवले. अशा पट्टीचे तुकडे त्याने थोड्याथोड्या अंतराने चिकट्पट्टीवर चिकटवून ठेवले. आता जोसेफाइनचे काम सोपे झाले, कापले-भाजले की तुकडा कापायचा आणि जखमेवर लावायचा.

रोजच्या कटकटीतून मोकळा झालेला अर्ल आपल्या कल्पनेवर इतका खूष झाला की त्याने हा सगळा प्रकार जॉन्सन अँड जॉन्सनच्या मालकाला सांगितला. त्यालाही ही कल्पना इतकी आवडली की त्याने त्याचे व्यापारी उत्पादन सुरु केले. त्याला नाव दिले BAND-AID® (जर्मन भाषेत बँड म्हणजे पट्टी).

सुरुवातीला जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीसुध्दा बँड-एड हाताने बनवायची. पण विक्रीचा आकडा हवा तसा वाढेना. मग १९२४ साली स्टरिलाइझ्ड(निर्जंतुक) बँड-एड बनवणारी मशिनरी तयार झाली आणि बँड-एडचे मास प्रॉडक्शन सुरु झाले. विक्री जोरात सुरु झाली. लोकप्रियता वाढवण्यासाठी काही वर्षानी कंपनीने शोभिवंत BAND-AID® बनवायला सुरुवात केली. सध्या जगभरात जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने विक्रीचा १०० बिलियन डॉलरचचा आकडा गाठलेला आहे.

आता पुढची कथा ऐका. बँड-एड अल्पावधीत इतकं लोकप्रिय झालं की कोणतीही औषधी चिकटपट्टी स्वतःला बँड-एड म्हणवून घ्यायला लागली. ते टाळण्यासाठी बँड-एड हा ट्रेडमार्क नोंदवण्यात आला. यामुळे नावाच्या चोर्‍या थांबल्या खर्‍या, पण अमेरिकेत पेटंट कायदा वेगळाच आणि थोडा विचित्रच आहे. एखादी संकल्पना अति लोकप्रिय झाली की त्यावरचे मालकी हक्क संपवून त्या कल्पनेला -उत्पादनाला 'जेनेरीक' बनवले जाते. याचे एक उदाहरण बघू या! 'अ‍ॅस्पिरीन' हे बायर फार्मा कंपनीचे उत्पादन आहे. बायर फार्माने त्या नावाने रजिस्टर्ड ट्रेडमार्क बनवला. पण ते इतके लोकप्रिय झाले की Genericized trademark या कायद्याअंतर्गत नंतर सर्वच कंपन्यांना 'अ‍ॅस्पिरीन' हे नाव वापरायची मुभा मिळाली.

बँड-एड ला पण जेनेरीक करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत, पण अजूनही ते सफल झालेले नाहीत. पण ते होऊ नये म्हणू कंपनीला सतत सतर्क रहावे लागते. आपल्याकडे भारतात Band-Aid ही मिळते, Banded मिळते आणि Band-Id पण मिळते. पण खरेदी करताना नीट बघा "BAND-AID® Brand Adhesive Bandages" असे पूर्ण वाक्य असलेलेच खरे बँड -एड हे लक्षात ठेवा!!

सबस्क्राईब करा

* indicates required