computer

हात पाय आणि शरीर थरथरतं ? मग हे ५ आजार कारणीभूत असू शकतात !!

हात पाय आणि शरीर थरथरने एक गंभीर समस्या आहे. याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. अनेकांना वाटते होतं असे त्यात काय? पण हा समज चुकीचा आहे. जर तुमचे हात किंवा पाय परत परत थरथरत असतील तर हे नसांमध्ये काहीतरी समस्या असल्याचे लक्षण असते. जर नेहमी नाही पण कधी कधी तुमच्या शरीराला थरथर किंवा कंप जाणवणं ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. कदाचित हे मेंदूच्या काहीतरी आजाराचे लक्षण असू शकतं. अनेकदा लोक याकडे समस्या म्हणून पाहत नाहीत आणि दुखणं वाढतं. दुखणं अति झाल्यास व्यक्ती कोमात जाण्याचासुद्धा धोका असतो, काहीवेळा अपंगत्व येण्याची शक्यता असते. तेव्हा वेळीच डॉक्टरचा सल्ला घेणं कधीही चांगलं. पण साधारणत: शरीर थरथरण्यामागे काय कारणं असतात हे आज आपण बघणार आहोत.

1) दारू सोडणं

मंडळी, अनेकदा दारू सुटता सुटत नाही.  मग लोक दारू सोडण्याचा संकल्प लांबणीवर टाकतात.  याने होतं असं की शरीराला दारुची सवय होते आणि काही काळ दारूपासून दूर राहिल्यावर हातपाय थरथरतात. याला withdrawl symptoms म्हणतात. ते टाळण्यासाठी लोक परत दारू प्यायला लागतात. तर हे चुकीचे आहे राव!! अशावेळी डॉक्टरचा सल्ला घेणे योग्य असते. 

2) झोपेचा आजार

झोपेसंबंधी जर तुम्हांला एखादा आजार असेल तर तेव्हाही शरीर थरथरते. जेव्हा शरीरात हवा जाण्याच्या मार्गात काही अडचण निर्माण होते तेव्हा शरीर कंप पावू शकते.

3) मल्टीपल सक्लेरोसीस

या आजाराची तशी बरीच इतर लक्षणंही आहेत आणि तो नक्की कशामुळे होतो हे अजून निश्चित झालेलं नाहीय. पण शरीरातल्या काही अवयवांना, विशेषत: मानेला वगैरे विजेचा शॉक बसल्यासारखे वाटते. या आजारामुळे इतरपण न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होतात, आणि यामुळे शरीर थरथरण्यासारख्या समस्या पण निर्माण होऊ शकतात. 

4) स्ट्रोक

रक्तस्त्राव झाल्यावर मेंदूपर्यंत रक्ताचा पुरवठा व्यवस्थित रीतीने होत नाही, याकारणाने स्ट्रोकची समस्या निर्माण होते. याचा थेट प्रभाव मेंदूवर पडतो. शरीर थरथरण्याच्या प्रमुख कारणांमध्ये स्ट्रोकचा समावेश होतो. 

5) पार्किन्सन रोग

हा रोग शरीर आणि मेंदू या दोघांत नीट समन्वय नसल्याने होतो. शरीराचे अवयव स्थिर राहात नाहीत आणि सतत थरथर जाणवते. 

शरीर थरथरण्याला फक्त हेच आजार कारणीभूत असतात असं नाही, तसेच कित्येकदा वेगवेगळ्या रोगांची लक्षणं एकत्रित दिसू शकतात, पण कधीकधी तितका गंभीर आजार झालेला नसूही शकतो. पण वेळीच खबरदारी घेणं हे पुढे जाऊन निस्तरण्यापेक्षा कधीही चांगलं. गरज पडल्यास दुसऱ्या डॉक्टरला दाखवून दोन डॉक्टरांचे  तुमच्या आजाराबद्दल एकच मत आहे का हे ही पाहता येईल.
मंडळी, तेव्हा वेळीच खबरदारी घ्या आणि निरोगी जगा..

 

लेखक : वैभव पाटील