computer

ऑक्सिजन पातळी चांगली आहे की नाही? या पध्दतीने सहा मिनिटे चाला आणि पटकन जाणून घ्या!!

अमेरिकन थोरॅसिक सोसायटीने २००२ साली 6 Minute Walk Test ची निर्मिती केली. शारीरिक क्रियेच्या दरम्यान तुमच्या शरीराला किती प्रमाणात ऑक्सिजनची गरज पडते, हे तपासण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो. ६ मिनिटांच्या कालावधीत आपण किती अंतर चाललो, शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण किती कमी जास्त झालं, चालल्या नंतर धाप लागते का, या गोष्टी बारकाईने तपासल्या जातात.

आज 6 Minute Walk Test बद्दल सांगायचं कारण म्हणजे, सध्या कोविडच्या प्रादुर्भावामुळे शरीराला पुरेसा प्राणवायू मिळतोय की नाही हे तपासण्यासाठी ही चाचणी गरजेची ठरत आहे. फुफ्फुसाचे आरोग्य तपासण्यासाठी तसेच, कोविड सोबत होणाऱ्या न्युमोनिया सारख्या आजाराचे घरच्या घरी निदान करण्यासाठी या चाचणीचा वापर करण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणा देत आहे. आजच्या लेखातून या चाचणीची पूर्ण प्रक्रिया समजून घेऊया.

6 Minute Walk Test करण्यापूर्वी.

१. चालण्यासाठी आधाराची गरज भासत असल्यास काठी किंवा वॉकरचा वापर करू शकता.

२. चालताना सुटसुटीत वाटतील आणि आरामदायक असतील असे कपडे घाला.

३. चाचणीपूर्वी अल्पाहार घ्या.

४. चाचणीपूर्वी तुमची रोजची औषधे घेतली तर चालतील.

५. चाचणीच्या २ तास पूर्वी व्यायाम करू नका.

6 Minute Walk Test दरम्यान

(व्यक्तीचं वय ६० वर्षांपेक्षा जास्त असेल तर चाचणीची वेळ ३ मिनिटे करावी. जर एखाद्या व्यक्तीला दम्याचा त्रास असेल तर ही चाचणी करू नये.)

१. तर्जनी किंवा मधल्या बोटावर ऑक्सिमीटर लावा

२. निरोगी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ९४ किंवा त्यापेक्षा जास्त असते. चाचणीपूर्वी तुमच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ९४ पेक्षा जास्त आहे की नाही याची खात्री करून घ्या. ऑक्सिमीटरवर दाखवत असलेले प्रमाण लिहून ठेवा.

३. यानंतर चालायला सुरुवात करा. ६ मिनिटाच्या कालावधीत थोडावेळही न थांबता चालत राहा.

४. चालताना दम लागतोय का किंवा चक्कर येत आहे का हे तपासत राहा.

6 Minute Walk Test नंतर

१. चाचणीनंतर ऑक्सिजनचे प्रमाण तपासून पाहा. हे प्रमाण ९३ च्या खाली गेलेले नसावे. किंवा चाचणीपूर्वी ऑक्सिजनचे जे प्रमाण होते ते ३ ने कमी झालेले नसावे.

२. ऑक्सिजनचे प्रमाण १ किंवा २ क्रमांकाने कमी झाले असल्यास घाबरण्याचे कारण नाही. पण असे झाल्यास त्या व्यक्तीने दिवसातून जास्तीजास्त दोन वेळा ही चाचणी करून ऑक्सिजनच्या प्रमाणावर नजर ठेवणे आवश्यक आहे.

३. ऑक्सिजनचे प्रमाण ९३ किंवा चाचणीपूर्व ऑक्सिजनच्या प्रमाणापेक्षा ३ ने कमी झाले असेल, तर ही धोक्याची घंटा आहे. त्या व्यक्तीने लवकरात लवकर आरोग्य चाचणी करावी.

४. चालताना धाप लागत असेल किंवा चक्कर येत असेल तर हे न्युमोनियाचे लक्षण असण्याची शक्यता असते.

सध्याच्या माहितीनुसार आपण सगळ्यांनी ही चाचणी करत राहणे आवश्यक आहे. प्रत्येक चाचणीनंतर ऑक्सिजनच्या प्रमाणात होणारे बदल तपासावेत. आठवड्याभराच्या तपासणीनंतर तुम्हाला स्वतःला आपल्या शरीरातील ऑक्सिजनच्या प्रमाणाचा अंदाज येईल. या प्रमाणात किती बदल होत आहेत यावरून तुमचं शरीर निरोगी आहे की नाही हे तुम्ही स्वतःच तपासू शकता.

मग हा लेख वाचल्यानंतर करताय ना 6 Minute Walk Test?

सबस्क्राईब करा

* indicates required