computer

कोरोनाने झोप उडवली? ह्या घ्या चांगल्या झोपेसाठी ६ अफलातून टिप्स....

चांगली झोप ही आरोग्यासाठी किती महत्वाची असते हे सर्वांनाच माहित आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रभाव जसजसा वाढत चालला आहे, तसतशी आधीसारखी झोप मिळणे दुरापास्त झाले आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर कोरोनाने लोकांची झोप उडवली आहे.

पण लोकहो, चांगली झोप ही कधी नव्हे ती अशावेळी महत्वाची झाली आहे. झोप ही थेट आपल्या प्रतिकारशक्तीशी संबंधित असते. जर पुरेशी झोप मिळाली नाहीतर प्रतिकारशक्ती कमकुवत होण्याचा धोका असतो आणि प्रतिकारशक्ती कमकुवत असली की वायरसच्या संक्रमणाची भीती असते. याचाच अर्थ तुम्ही कशी झोप घेता हे तुम्ही कोरोनापासून किती सुरक्षित आहात हे ठरवत असते.

म्हणूनच आम्ही तुमच्या चांगल्या झोपेसाठी काही टिप्स देणार आहोत.

1) झोपण्याची वेळ निश्चित असू द्या.

लॉकडाऊनमध्ये अनेकांचे वेळापत्रक बिघडले आहे. सकाळी उठून ऑफिसला जायचे नसल्याने रात्री उशिरापर्यंत जागण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना वर्क फ्रॉम होम करावा लागत असल्याने त्यामुळेही वेळापत्रक पाळता येत नाहीये. पण तुम्हांला या सगळ्यातून मार्ग काढून तुमच्या झोपेची वेळ निश्चित करता यायला हवी. चांगल्या झोपेसाठी ते अत्यावश्यक आहे.

2) जास्त झोपू नका.

सध्या बाहेर जाण्यावर बंधन असल्याने दिवस दिवसभर बेडवर पहुडलेले असणे हे प्रत्येक घरातलं चित्र झालं आहे. त्यातच झोपेचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. जास्त झोप म्हणजे चांगली झोप हे समीकरण चूक आहे. ७-८ तासांची चांगली झोप तुमच्या तब्येतीसाठी चांगली असते.

3) व्यायाम करा.

सध्या जरी जिम बंद असल्या तरी घरच्या घरी केलेला हलका व्यायाम तुम्हाला चांगली झोप येण्यासाठी निश्चितच मदत करू शकतो. अनेकांना सध्या बाहेर पडता येत नसल्याने व्यायाम न करण्याची पळवाट सापडली आहे. पण इच्छा असेल तर घरीही चांगला व्यायाम करता येऊ शकतो.

4) बातम्या कमी बघा.

आता तुम्ही म्हणाल बातम्या बघण्याचा आणि झोपेचा काय संबंध? पण हो, बातम्या आणि झोपेचा खूप मोठा संबंध आहे. आजकाल सतत झादून सगळ्या चॅनेल्सवर कोरोनासंबंधीच बातम्या दाखवत असतात. त्याने तुमच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता वाढते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या झोपेवर होतो.

5) स्क्रीनपासून दूर रहा.

लॉकडाऊनमध्ये इंटरनेट आणि टीव्ही ही दोन्ही लोकांच्या मनोरंजनाची मोठी साधनं बनले आहेत. काम पण लॅपटॉपवर करावे लागत असल्याने दिवस आणि रात्र स्क्रीनसमोरच व्यतित करावा लागत आहे. पण आवश्यक तितकाच वेळ स्क्रीनसमोर बसले की झोपेत सुधारणा होऊ शकते. त्याचबरोबर झोपण्याआधी १ तास स्क्रीन बंद केल्यास त्यामुळेही झोपेत सुधारणा होण्यात मदत होते.

6) दारू कमी प्या.

दारू पिल्यावर चांगली झोप येते हा बऱ्याच लोकांचा अंदाज असतो आणि म्हणूनच रात्री झिंगून झोपणे हा लोकांचा महत्वाचा छंद आहे. पण दारू पिल्याने आपल्याला हवी तशी आरोग्यदायी झोप येत नाही.

तर वाचकहो, हे उपाय करून तुम्ही चांगली झोप घेऊ शकता. स्वस्थ झोपा, स्वस्थ राहा आणि मजेत जगा!!

 

लेखक : उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required