f
computer

मेंदू तल्लख आणि तरतरीत ठेवण्याचे ७ उपाय !!

शरीर सुदृढ राहावं म्हणून आपण सगळेच व्यायाम करतो. वजन वाढलं की वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतो. खेळाडू सतत सराव करत राहतात. अभिनेता किंवा अभिनेत्री चेहऱ्यावरचे तेज टिकवण्यासाठी व्यायामासकट वेगवेगळे उपाय करत राहतात. म्हातारी होत चाललेली माणसं तरुण दिसण्यासाठी धडपडत असतात. पण मेंदू तरुण राहावा, मेंदू तल्लख राहावा, विचार चपळ राहावेत यासाठी मेंदूचे व्यायाम कोणीच करत नाही.

मेंदू हा इतर अवयवांसारखाच आहे. वापरला तर धावतो, नाही वापरला की गंज चढतो. आठवा, मोबाईल हातात येण्यापूर्वीचे दिवस. कमीत कमी १०० ते २०० टेलिफोन नंबर सहज लक्षात राहायचे. आता जेमतेम २० ते २५ नंबर लक्षात राहतात.

आज आम्ही तुम्हाला मेंदू तल्लख, चपळ, तरतरीत आणि यंग फॉरेव्हर राहण्यासाठी काही व्यायाम सुचवतो आहे. 

१. वाद्य वाजवायला शिका

एखादे वाद्य वाजवायला शिका. होतं काय, हे शिकताना अनेक सरगम (नोटेशन्स) लक्षात ठेवायला लागतात. सोबतच एखादा स्वर ऐकल्यानंतर तो कोणत्या नोटेशनचा भाग आहे,  हे पण लक्षात ठेवावं लागतं. 

उदाहरणार्थ, ‘सागर किनारे’ हे गाणं ऐकल्यावर मुकेशचं ‘यही है तमन्ना तेरे घर के सामने’ हे गाणं आठवणं ही नोटेशन लक्षात असण्याची खूण आहे. किंवा एखादी सुरावट ऐकल्यावर जुन्या स्मृती चाळवल्या जाणं ही पण नोटेशन लक्षात असण्याची खूण आहे. याखेरीज महत्वाचा मुद्दा असा की वाद्य वाजवताना मेंदू आणि हात या दोन्हीमध्ये समन्वय राहतो. 

२. तोंडी हिशोब करा

कॅल्कुलेटर आल्यानंतर तोंडी गणितं करण्याचं आपण सगळेच विसरलो आहोत. कोपऱ्यावरचा भाजीवाला जो हिशोब तोंडी करू शकतो,  तो तोंडी हिशोब चार डिग्र्या असणारी माणसं सुद्धा करू शकत नाहीत. बघा स्वतःची परीक्षा घ्या. १९ चा किंवा २३ चा किंवा २९ चा पाढा आठवतोय का? नसेल आठवत तर आजच पुन्हा एकदा पाढे पाठ करायला सुरुवात करा. यामुळेही मेंदू तल्लख राहतो.

३. गत आयुष्यातील प्रसंगांना आठवून बघा

कधीतरी एखाद्या रविवारी आठवून बघा आपल्या गत आयुष्यातील अनेक प्रसंगांना!! उदाहरणार्थ, २६ जुलैचा पूर आला तेव्हा तुम्ही कुठे होता आणि घरी कसे पोहोचलात? तेव्हा तुमच्यासोबत कोण होतं? तुम्ही किती वाजता घरी पोहोचलात? सगळं आठवण्याचा प्रयत्न करा आणि एखाद्या कागदावर नोंद करा. यामुळे मेंदूचा झोपी गेलेला भाग खडबडून जागा होईल. अर्थातच अशा व्यायामाने जुनी नावं, ठिकाणं, नाती, सगळं काही आठवायला लागेल. मेंदूला पुन्हा एकदा स्मरणशक्ती ताजी ठेवण्याची सवय लागेल.

४. नवीन भाषा शिका

आता असा एक उपाय बघू ज्यामुळे मेंदूची क्षमता वाढत जाईल. यासाठी सोपा व्यायाम आहे नवीन भाषा शिकण्याचा. भाषेतले शब्द हे मनावर उच्चारातून आघात करतात. त्यामुळे जुने शब्द, जुनी भाषा, यांचे संवर्धन तर होतेच, सोबत नवीन भाषेचे शब्द स्मरणशक्ती वाढवतात. स्वर्गीय विनोबा भावे यांना चौदाहून अधिक भाषा लिहिता वाचता येत होत्या. त्यांचे चरित्र वाचले तर असे लक्षात येईल की त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांची स्मरणशक्ती तरतरीत होती. 

५. एरोबिक व्यायाम करा

मेंदूच्या चलनवलनाचा सर्व भर प्राणवायू आणि शुद्ध रक्त यावर असतो. आपल्या अन्नातून मिळणाऱ्या उर्जेपैकी २५ टक्के उर्जा एकटा मेंदू खर्च करत असतो. यासाठी रोज एखादा एरोबिक व्यायाम करणे जरुरी आहे.

६. चित्रकला, विणकाम, यासारखा एखादा व्यायाम करा

दृष्टी आणि हात यांचा समन्वय राहावा म्हणून चित्रकला, विणकाम, यासारखा एखादा व्यायाम करावा. हे शक्य नसल्यास रोज एक शब्दकोडे सोडवा. त्यामुळे मोटर स्कील वाढीस लागते. पन्नाशी पुढच्या सर्वांनी हा व्यायाम नक्की करा. 

७. स्वयंपाक करायला शिका

एखादी पाककृती करताना दृष्टी, गंध, चव या तिन्हीची गरज असते. म्हणजे स्वयंपाक करायला शिकलात, तर पाचपैकी चार इंद्रियं कामाला लागतात. 

 

येणाऱ्या स्पर्धात्मक युगात जर टिकून राहायचे असेल तर हे मेंदूचे व्यायाम अत्यंत आवश्यक आहेत.

 

आणखी वाचा :

मेंदू ताजातवाना ठेवण्याच्या ७ अफलातून ट्रिक्स !!

या 3 प्रयोगातून तुम्ही तुमच्या स्वप्नांना कंट्रोल करू शकता राव !!

सबस्क्राईब करा

* indicates required