computer

जगात ८ वा खंड आणि ६ वा महासागर जन्माला येतोय ? कुठे आणि कसं घडतंय हे ?

जग सात खंड आणि ५ महासागरांनी तयार झालं आहे हे आपण शाळेत शिकलोच आहोत. यापुढे कदाचित हा अभ्यासक्रम राहणार नाही. याचं कारण असं की नवीन पिढीला आठ खंड आणि ६ महासागरांचा इतिहास आणि भूगोल शिकवला जाईल. हे आम्ही कशाच्या जोरावर बोलत आहोत? अहो जमिनीखाली बऱ्याच घडामोडी घडत आहेत आणि जगाचा नकाशा बदलत आहे.

पण.. पण काळजीचं कारण नाही. कारण बदल घडून पृथ्वीचा चेहरा बदलायला लाखो वर्षं आहेत. अचूक सांगायचं झालं तर १० लाख वर्ष.

जग हे फार मंद गतीने विकसित झालं आहे. जगात होणारा हा नवीन बदलही असाच मंद गतीने होणार आहे. त्याची सुरुवात मात्र आतापासूनच दिसू लागली आहे. गेल्यावर्षी आफ्रिकेतली एक भलीमोठी भेग चर्चेत होती. केनिया देशात जमिनीचे दोन तुकडे पडले होते. आफ्रिका खंड विभागला जातोय अशा बातम्या येत होत्या. तुम्हीसुद्धा व्हायरल झालेले फोटो पाहिले असतीलच. आजच्या लेखाचा विषय याच गोष्टीशी निगडीत आहे.

आठ खंड आणि ६ महासागरांचा जन्म कसा होणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीची रचना समजून घ्यावी लागेल. पृथ्वी ही जवळजवळ २० टेकटॉनिक प्लेट्सने (भूखंड) तयार झाली आहे. सोप्या भाषेत पृथ्वी २० वेगवेगळ्या भूखंडांनी तयार झाली आहे. या वेगवेगळ्या भागांमध्ये होणाऱ्या हालचालींनीच भूकंप येतो, ज्वालामुखीचा स्फोट होतो, नवीन पर्वत आणि डोंगर-दऱ्या निर्माण होतात. तसेच इतर बरेच बदल घडत असतात.

स्रोत 

आता जाऊया आफ्रिकेला. आफ्रिकेच्या उत्तर पूर्व भागात सुदानला लागून इथिओपिया नावाचा देश आहे. या देशाच्या अगदी मधोमध पृथ्वीच्या ३ टेकटॉनिक प्लेट्स येऊन मिळतात. अरेबियन (आफ्रिकेच्या उत्तरेकडचा भाग), न्युबियन (पश्चिम आफ्रिका) आणि सोमालियन प्लेट (पूर्व आफ्रिका). असे हे तीन भूखंड आहेत. हा भाग ग्रेट रिफ्ट व्हॅली म्हणून ओळखला जातो. समस्या इथेच आहे.

हे तीनही भूखंड आपल्या जागेपासून सरकत आहेत. अरेबियन भूखंड इराणला जाऊन भिडतोय तर सोमालियन भूखंड भारताकडे निघालाय आणि न्युबियान भूखंडाने बाकीच्या दोघांपासून संबंध तोडायचं ठरवलंय. एकूण सगळा भूगोल बदलायच्या मार्गावर आहे. याची खरी लाक्षणिक सुरुवात २००५ पासून झाली आहे असं मानलं जातं. इथिओपियात अवघ्या १० दिवसांत जमिनीला ६० किलोमीटर लांब भेग पडली होती. तेव्हापासून आजपर्यंत आफ्रिकेच्या पूर्वेकडे जमिनीला तडे जातच आहेत. एकंदरीत चित्र असं आहे की न्युबियन आणि सोमालियन प्लेट यांच्यात प्रचंड दरी निर्माण होऊन दोन्ही भाग वेगळे होणार आहेत. असं झालं तर मधल्या जागेत समुद्राचं पाणी शिरून तिथे एका नवीन महासागराचाच जन्म होईल.

काय घडणार हे आपण समजून घेतलं, आता हे का घडत आहे हेही समजून घेऊया.

आफ्रिकेच्या ज्या भागातून दोन्ही प्लेट्स विभक्त होतात तिथल्या भूखंडाखाली एक प्रकारचा फुगवटा तयार झाला आहे. याला Afar Plume म्हणतात. पृथ्वीच्या भूभागाखाली धगधगता लाव्हारस आहे. ह्या लाव्हारसाच्या उष्णतेमुळे पृथ्वीच्या आवरणावर असे फुगवटे तयार होत असतात. एका ठराविक पातळीनंतर ह्या फुगवट्यांमुळे जमिनीवर भेगा पडतात. परिणामी पृथ्वीवर दऱ्या निर्माण होतात.

आफ्रिकेच्या जमिनीखाली या घडामोडी अत्यंत धीम्यागतीने घडत आहेत. इथे एक महत्त्वाची गोष्ट नमूद करायला हवी की आफ्रिकेचे दोन तुकडे होऊन वेगळा खंड तयार होणार का आणि नव्या महासागराला वाट मिळणार का या गोष्टीवर वैज्ञानिकांत मतभेद आहेत. काही वैज्ञानिक म्हणतात की दोन्ही प्लेट्स वेगळ्या होतील पण समुद्र निर्माण होण्याइतपत त्यांच्यात दरी पडलेली नसेल.

नेमकं काय घडणार हे आपल्याला नक्कीच सांगता येणार नाही. हा बदल पूर्ण होईल तोपर्यंत मानवाच्या हजारो पिढ्या गेलेल्या असतील्. पण असं असलं तरी जमिखालच्या हालचाली समजून घेणं नक्कीच मजेशीर आहे.

आजचा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समधे नक्की सांगा!!

सबस्क्राईब करा

* indicates required