computer

प्रत्येक आठवड्याला माणूस ५ ग्रॅम प्लास्टिक खातो? खरं की काय?

मंडळी, माणूस दरवर्षी अब्जावधी किलो प्लास्टिक समुद्रात फेकून देतो. प्रत्येकजण प्लास्टिक हाताने उचलून समुद्रात फेकत नसला तरी बरचसं प्लास्टिक नंतर समुद्रातच जाऊन मिळतं. हे काही वेगळं सांगायला नको की समुद्रात गेल्यानंतर प्लास्टिकचं विघटन होत नाही. या प्लास्टिकमुळे मग अनेक समस्या उद्भवतात.

आजचा आपला विषय प्लास्टिकच्या समस्यांबद्दल नाहीय, तर माणूस स्वतः पसरवलेल्या प्रदूषणामुळे स्वतःचं कसं नुकसान करून घेतोय हा आहे.

गेल्या काही वर्षात जगभरात करण्यात आलेल्या ५० वेगवेगळ्या संशोधनातून असं आढळलं आहे की माणसाच्या पोटात दर आठवड्याला ५ ग्रॅम प्लास्टिक जातं.  हे प्लास्टिक हवेतून, आपल्या अन्नातून आपल्याला मिळत असतं.

राव, एका आठवड्याला ५ ग्रॅम याप्रमाणे हिशोब केला तर वर्षभरात आपण जवळजवळ २५० ग्रॅम प्लास्टिक खातो.

हे कसं शक्य आहे ?

त्याचं असं आहे की प्लास्टिकचं विघटन होत नाही, तर त्याऐवजी त्याचे लहानलहान तुकडे होतात. याच तुकड्यांना मायक्रोप्लास्टिक म्हणतात. हे मायक्रोप्लास्टिक आपल्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सुलभ मार्ग म्हणजे पाणी. पाण्यातून हे लहानलहान कण आपल्या पोटात जातात आणि आपल्याला पत्ताही लागत नाही.

मायक्रोप्लास्टिकचं स्रोत असलेली आणखी एक गोष्ट म्हणजे शिंपले. जगभरात अनेकठिकाणी शिंपले खाल्ले जातात. या शिंपल्यांना इतर माश्यांप्रमाणे धुतलं जात नाही, त्यामुळे या शिंपल्यांमध्ये असलेले मायक्रोप्लास्टिक जाशेच्या तसे पोटात जातात.

मंडळी, वर्ल्ड वाईल्डलाईफ फर्म (WWF) ने म्हटलंय की आपल्याला अजूनही नक्की आकडा समजलेला नाही. कारण ही फक्त प्राथमिक माहिती आहे. आपल्या जेवणात मायक्रोप्लास्टिकचे कण किती असतात यावर आणखी संशोधन व्हायचं आहे.

WWF म्हणतं की “ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. प्लास्टिक आपल्या पोटात जाण्यापासून रोखायचं असेल तर जे प्लास्टिक निसर्गात फेकले जाते त्यावर बंदी यायला हवी. यासाठी प्रत्येक देशातील सरकारने, व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी मिळून यावर काम केले पाहिजे.”

तर मंडळी, ज्याप्रकारे व्हेल, डॉल्फिन माशांच्या पोटात प्लास्टिकचे ढिगारे सापडतात तशीच गत माणसाचीही होऊ शकते असं म्हणायला हरकत नाही.

बोभाटा पब्लिक, तुम्हाला याबद्द्द्ल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा!!