पक्ष्यांनाही सनस्ट्रोकचा धोका? प्रखर उन्ह तर खरेच, पण माणूसही याला कसा कारणीभूत आहे?

पक्ष्यांनाही सनस्ट्रोकचा धोका. प्रखर उन्ह तर खरेच, पण माणूसही याला कसा कारणीभूत आहे?
उन्हाचा याही वर्षी थोडा वर सरकला आहेच. उन्हामुळे होणारी लाहीलाही सर्वांनाच असह्य होत आहे. वाढत्या उष्णतेने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने डीहायड्रेशन होऊन आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. दुर्दैवाने हे फक्त माणसांच्या बाबत होत आहे असे नाही तर प्राणी आणि पक्ष्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
आकाशात उडणारे पक्षी उन्हामुळे आणि डिहायड्रेशनमुळे आकाशातून खाली पडत आहेत. रोजच्या रोज अशा हजारो पक्षांना हा उन्हाचा त्रास होत आहे. अहमदाबाद येथे जीवदया ट्रस्ट कडून एक प्राणिरुग्णालय चालवले जाते. या ठिकाणी रोज हजारो पक्षांवर उपचार करण्यात येत आहेत. पश्चिम गुजरात हा अधिक तापमानाचा प्रदेश आहे. म्हणून तिथे उष्णतेची धग जास्तच जाणवत आहे.
दरवर्षीच पक्षांना हा त्रास होतो पण यावर्षी याचे प्रमाण खूपच वाढले आहे. या ट्रस्टसोबत गेली १० वर्षे पक्ष्यांना मदत करणारे मनोज भावसार हेच सांगतात. सनस्ट्रोकने आकाशातून उडताना खाली पडलेल्या या पक्ष्यांवर उपचार करताना डॉक्टर त्यांच्या तोंडात पाण्याचे इंजेक्शन देऊन आणि व्हिटॅमिन देऊन त्यांना वाचवत आहेत. फक्त पक्षीच नाही, तर अनेक प्राण्यांना तिथे उपचारांसाठी आणले जात आहे.
गुजरातच्या आरोग्य मंत्रालयाकडून गुजरातमधील प्रत्येक दवाखान्यात उष्णतेमुळे आजारी पडणाऱ्या लोकांवर उपचार करणारा एक वेगळा वॉर्ड असावा असे निर्देश देण्यात आले आहेत. यंदाचा उन्हाळा हा संपूर्ण दशकातील अतिशय दाहक उन्हाळा असल्याची नोंद करण्यात आली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम किती धोक्याच्या पातळीकडे गेला आहे हे यावरून सिद्ध होते.
ऑक्सफोर्ड येथील बेन क्लार्क यांनी या सर्व प्रकाराला माणसांमुळे झालेली पर्यावरणाची हानी याला जबाबदार आहे असे मानले आहे. कमी-कमी होत जाणारी जंगले वातावरणात पुरेशा प्रमाणात ग्रीनहाऊस गॅस सोडतात. यातून दुष्काळ, पूर, वणवा अशा ढीगभर समस्या निर्माण होतात. दक्षिण आशिया तर या उष्णलाटेत आधी होरपळून निघतो.
फ्रेडरिक ओत्तो नावाचे एक शास्त्रज्ञ सुद्धा ही गोष्ट मान्य करतात की, सध्याच्या उष्णतेच्या लाटेला पर्यावरण बदल जबाबदार आहे. आता हे सर्व काही प्रमाणात तरी कमी करायचे असेल तर आपल्याला स्वतःपासून सुरुवात करत होईल तेवढी पर्यावरणाची काळजी घ्यावी लागेल.