computer

डिप्रेशन समजून घेऊया... डिप्रेशनला तुमच्या मेंदूतली ही रसायनं कारणीभूत आहेत!!

आजकाल डिप्रेशनवरती खूप लिहिलं जात आहे. दिपिका पादुकोण आणि इतर सेलेब्रिटीज तर त्यावर बोलत आहेतच, पण आपल्या आजूबाजूचे लोक, मित्रमैत्रिणीही त्यांच्या डिप्रेशनबद्दल उघडपणे लिहित आहेत. ते स्वत: नैराश्यातून बाहेर आले आहेत, येत आहेत, प्रयत्न करत आहेत आणि इतरांना नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहेत. दु:ख आणि नैराश्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक दु:खी माणसाला नैराश्य येईलच असे नाही आणि प्रत्येक सुखी माणसालाही नैराश्य नसेलच असेही नाही. एकदा का हे मान्य केलं की पुढच्या बऱ्याच गोष्टी सगळ्यांसाठी सुरळीत होऊ शकतील. 

तुम्हांला हे तर माहित आहेच की आपल्या भावभावना हा सगळा केमिकल लोचा असतो. साहजिकच माणूस डिप्रेस असण्यामागे मेंदूमधल्या केमिकल्सचा मोठा हात असतो. वेगवेगळी केमिकल्स वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात. आज आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी डिप्रेशनसाठी कारणीभूत असणाऱ्या काही महत्त्वाच्या केमिकल्सबद्दल आणि त्यांच्या मेंदूवर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलणार आहोत. 

माणसला नैराश्य जाणवू देणारी मुख्य केमिकल्स आहेत- डोपामाईन, सेरेटोनिन, नोरापिनेफ्रिन. चला जाणून घेऊयात यांचा आपल्या मेंदूवर नक्की कसा आण काय परिणाम होतो. 

डोपामाईन एका प्रकारची रीवॉर्ड सिस्टीम आहे. जेव्हा तुमच्या जगण्याला मदत करणारी एखादी गोष्ट तुम्ही करता तेव्हा डोपामाईन स्त्रवायला सुरुवात होते.  उदाहरणार्थ सेक्स, जेवणे, शी-शू करणं, एखादा खास नातेवाईक किंवा जवळचा मित्र भेटला तरी त्यासोबतच्या भावनिक जवळीकतेमुळेही डोपामाईन स्त्रवायला सुरुवात होते. हे डोपामाईन नावाचं केमिकल हृदयाचे ठोके, रक्तदाब, श्वासाचा वेग या आणि अश्या बऱ्याच गोष्टींवर प्रभाव पाडत असतं. 

डोपामाईनचा पुरेसा पुरवठा आपल्या मानसिक संतुलनासाठी आवश्यक असतो. डोपामाईन लेव्हल वाढली की आपण आनंदी गाणी म्हणणे, डान्स करणे, हसणे, स्माईल देणे वगैरे गोष्टी सहज करतो. डोपामाईन कमी झालं की आपण कमी हसू लागतो, घरातून कमी बाहेर पडू लागतो, लोकांचा सहवास टाळू लागतो, अंधारात बसणं आवडायला लागतं. थोडक्यात, शरीरातलं डोपामाईन कमी झालं की माणूस दु:खीकष्टी होतो.

आपल्याला आवडणारी गोष्ट करूनही आपला मूड ठीक होत नसेल तर आपल्या शरीरातलं डोपामाईनचं संतुलन बिघडलं असण्याची शक्यता आहे. उदा. आवडणारं गाणं आपल्याला नकोसं होतं. सिनेमा शौकीन असूनही पाच मिनिटांत एखाद्या सिनेमाचा कंटाळा येतो. गेम आवडत असले तरी गेम खेळू वाटत नाही. खवय्ये असूनही तुम्हांला जेवण कमी जातं, वगैरे वगैरे.. अशी लक्षणं असल्यास तुमच्यातलं डोपामाईन कमी झालंय असं समजावं. बरेचदा फेसबुकवर पोस्ट टाकून शंभर-दोनशे लाईक आल्याने शरीरात डोपामाईन वाढतं आणि आपल्याला तात्पुरतं बरं वाटू शकतं. पण हा दीर्घकालीन उपचार नाहीय. 

डिप्रेशनचं निदान झाल्यास औषधातून डोपामाईन वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. डोपामाईन वाढलं की आपण आपल्या रोजच्या रुटीनला लागतो. मग डोपामाईन वाढवणाऱ्या औषधांचा डोस हळूहळू कमी केला जातो. तोवर शरीराची डोपामाईन तयार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी इतर औषधोपचार केले जातात किंवा शारीरिक आणि बौद्धिक व्यायाम करवले जातात. 

शरीराची डोपामाईन तयार करण्याची क्षमता अपंग झाल्यावर येणारं डिप्रेशन हे औषधं आणि योग्य वातावरणातून बरं केलं जाऊ शकतं. फक्त तुम्ही डॉक्टर गाठा. सतत कंटाळा किंवा उबग आल्यासारखं होऊन फेसबुक बंद करून गप्प पडून राहावं अशी इच्छा होत असेल तर आपल्या इतर आवडणाऱ्या गोष्टी करण्याच्या आपल्या इच्छाशक्तीकडे लक्ष द्या. सतत फेसबुक सोडून जायची इच्छा होणे हे सुद्धा डोपामाईन डेफिसीएन्सीचं लक्षण असू शकतं. 

डोपामाईनच्या कमतरतेमुळे येणारं डिप्रेशन सहज उपचार होण्यासारखं आहे. त्यामुळे "Keep Calm and Consult a Psychiatrist!"

(नोरापिनेफ्रीन)

नोरापिनेफ्रीन (Norepinephrine) नावाचं अजून एक केमिकल असतं शरीरात वाहणारं. या नोरापिनेफ्रीनला स्ट्रेस हार्मोन म्हणतात. धोक्याच्या परिस्थितीत आपलं शरीर वेगाने रिऍक्ट व्हावं लागतं त्यात या केमिकलची मदत होते. या केमिकलमुळे हार्टबिट, श्वासाचा वेग, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर तात्पुरतं वाढतं. नोरापिनेफ्रीन आपल्याला अभ्यासात किंवा इतर कामात लक्ष केंद्रित करायला मदत करतं. तसचं एखाद्या कामातल सातत्य सुद्धा वाढवतं. स्मरणशक्तीची तल्लखता म्हणजे गरजेचं असेल तेव्हा गोष्टी आठवणं यासाठीसुद्धा नोरापिनेफ्रीन मदत करत असतं.  नोरापिनेफ्रीन जास्त झालं तर एखाद्या गोष्टींबद्दलचं आपलं हट्टी वागणं वाढत जातं. जसं अक्षर कोरून काढणं, सगळ्या गोष्टी एका ओळीत ठेवणं वगैरे वगैरे. संशयी वृत्ती बळावण्यासाठीसुद्धा नोरापिनेफ्रीन शरीरात जास्त प्रमाणात असणं कारणीभूत असू शकतं. त्याउलट नोरापिनेफ्रीन कमी झाल्यास एखाद्या गोष्टीत लक्ष न लागणं, विसरभोळेपणा, मन न रमणं, किंवा थेट झोपाळूपणा वाढणं वगैरेसुद्धा होऊ शकतं.

आपल्या रोजच्या आयुष्यात गरम भांडं हाताळताना पडतं तेव्हा आपण एकदम प्रतिक्रिया देतो. कदाचित आपण भांडं धरायला हात एकदम पुढं करतो किंवा तो भाजेल म्हणून मागे करतो. कधीकधी एकदम गाडी समोर आली की दचकून मागे होतो. अशाप्रसंगी आपण प्रतिक्रिया न देता जागच्या जागी थिजून जात असू तर काहीतरी केमिकल लोचा असू शकतो. किंवा एक पान वाचून पुढच्या पानावर जाताना आत्ता काय वाचलं न आठवणं, आपण चर्चा करताना नेमका शब्द न आठवणं अश्या गोष्टी होत असतील तर एकदा मानसोपचारतज्ज्ञसोबत बोलून घ्यायला काही हरकत नाही. तसंच भांडं पडलं तर हृदयाची वाढलेली धडधड, श्वासोच्छवास लगेच कमी न होणं, दचकल्यावर खूप वेळ घाम फुटत राहणं आणि हातपाय गळून गेल्यासारखं होत असेल तर नोरापिनेफ्रीन जास्त प्रमाणात आणि एकदम स्त्रवत असण्याची शक्यता आहे. अशावेळी सुद्धा सायकाट्रीस्टसोबत कन्सल्ट करायला काहीच हरकत नाही. 

शरीरात नोरापिनेफ्रीचा एक सतत प्रवाह सुरु असतो. तो कमी आल्यास डिप्रेशनची लक्षणं दिसू शकतात. अर्थात नोरापिनेफ्रीन कमी असल्यास ADHD(Attention-deficit/hyperactivity disorder) सारखे इतर मानसिक आजारसुद्धा असू शकतात हेही लक्षात घ्यायला हवं. एखाद्या गोष्टीत कितीही इंटरेस्ट असूनसुद्धा त्याचे डिटेल्स लक्षात राहत नसतील तर नोरापिनेफ्रीन कमी पडत असल्याची शक्यता असते. अशी लक्षणं आपण सहज ओळखू शकतो आणि लगेच औषधोपचार घेणं गरजेचं आहे हे लक्षात येईल.

आता पाहूया तिसऱ्या केमिकलबद्दल. ते आहेत सेरेटोनिन. या केमिकलच्या कमीजास्त होण्याची लक्षणं फेसबुक वापरणाऱ्या बऱ्यापैकी लोकांना स्वतःमध्येच सापडतील. एका महिन्यात अचानक हायपर होऊन एखादा प्रॉब्लेम चटाचट सोडवणं, पझल सोडवण्यात, चेस खेळण्यात एक्सपर्ट होणं, कुठले कुठले संदर्भ हवे तेव्हा आठवणं आणि लगेच पुढच्या महिन्यात अगदी नावं, पत्ते, रस्ते न आठवणं, मागच्या महिन्यात सोडवलेल्या कोड्यांसारखी कोडी न सुटणं, बुद्धीबळ किंवा तत्सम खेळांत स्ट्रॅटेजी सोडून कसेही खेळून हरणं वगैरे. सेरोटॉनिन कमी पडणे हे डिप्रेशनचं एक कारण असू शकतं.

"आजकाल मला गोष्टीचं लक्षात रहात नाहीयेत!"
"एकच गोष्ट डोक्यात फिरत राहते!"
"हात-पाय सतत डीहायड्रेशन झाल्यासारखे दुखतात!"
"डोळे उघडू वाटत नाहीत!"

या सोप्यासोप्या गोष्टीसुद्धा डिप्रेशनची लक्षणं असू शकतात. 

आम्ही इथं ढोबळमानाने नैराश्याची कारणं आणि लक्षणं देण्याचा प्रयत्न केला आहे. पण यादी इतकीच नाही. पण या नमुन्यांमधून आपण हळूहळू नैराश्याकडे वाटचाल करतोय का हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. तेव्हा मेडिकल हेल्प घ्या, आजकाल सहज मिळते आणि डिप्रेशनसाठी गोळ्या घेणं जराही लज्जास्पद नाहीय. लगेच तुम्ही "वेडे" वगैरे होत नाही. स्वस्थ राहा, लोकांत मिळूमिसळून राहा, आपल्या भावनांबद्दल किमान काही जवळच्या लोकांशीतरी मोकळेपणाने बोला. आयुष्य खूप सुंदर आहे, ते छानपणे आपण जगूया आणि आपल्याभोवतालच्या लोकांचे आयुष्यही सुंदर बनवूयात.

लेखक : आशिष शिंदे

सबस्क्राईब करा

* indicates required