computer

एकेकाळी नर्सचे आयुष्य कसे असायचे ? जागतिक परिचारीका दिनानिमित्त वाचा बोभाटाचा खास लेख

एक जमाना असा होता की 'नर्स' हा शब्द उच्चारला तरी लोकं नाक मुरडायचे.केवळ अनाथ-विधवा-परित्यक्ता अशा महिलांसाठी राखून ठेवलेले क्षेत्र म्हणजे नर्सिंग असा त्या काळचा समज होता.त्यातही एक फरक असा होता की थोड्याफार शिकलेल्या महिलांनाच नर्स होण्याची संधी मिळायची बाकीच्या महिलांना 'मिड वाइफ' म्हणजे सुईण होण्याचीच संधी मिळायची. पण करणार काय तो काळच असा सामाजिक गैरसमजाचा होता.घर सुटलेल्या महिलांना राहण्याची हक्काची जागा आणि पोट भरण्याची आणि भविष्यात नियमित उत्पन्नाचा आधार यासाठी नर्स हे एकमेव करियर होते. 

त्याकाळी एखाद्या नर्सचे आयुष्य कसे होते हे सांगणारी एक कादंबरी आमच्या वाचनात आली. त्या कादंबरीचा एक भाग खास 'बोभाटा'च्या वाचकांसाठी आज देतो आहोत.वाचा 'एका ठिपक्याची रांगोळी' ह्या कादंबरीतील एक प्रकरण !

******

चाकोरीबाहेर जाऊन चाकोरी न सोडण्याचं तंत्र आज्जीला खासच जमलं होतं .
आज्जी तेव्हा विठ्ठल सायन्नाला म्हणजे ठाण्याच्या सिव्हील हॉस्पीटलला दाई होती.
चौथी पास झालेल्या बायांना तेव्हा मिड वायफरीला प्रवेश मिळायचा.
ठाण्यात तेव्हा अडलेली बाळंतीण सोडवण्यासाठी गरीबांसाठी असं हे एकच हॉस्पीटल होतं.
तेव्हा मालती बाई चिटणीसांच पण हॉस्पीटल नसावं. वैद्य किंवा देवधर तेव्हा नव्हतेच.
सांगायचं ते काय की आज्जी दिवसभर बाळंतपणं करण्यात गुंतलेली.

******
ननूमामा म्हणजे आज्जीच्या सवतीचा मुलगा.त्याला त्याच्या मामानी हट्ट करून नंदुरबारलाच ठेवून घेतला होता.
माझी आई तेव्हा दुसरीत.कन्या शाळेत.तिला एकदा शाळेत रवाना केलं की आज्जी सिव्हीलला यायची.

ड्युटी असो नसो दिवसभर तिथेच काम करायची.
सैपाक करणं हे तिच्या आवडीचं काम नव्हतं अशातला भाग नाही पण दिवसभर सिव्हीलमध्ये असली की दोन्ही वेळचं जेवण मेस मध्येच व्हायचं .

रात्री खोलीवर जाऊन सतरंज्या झटकून पडलं की दिवस संपायचा.
ननूमामा नंदुरबारला असला तरी त्याच्या मामाचं अनंतचतुर्दशीला एक  कार्ड यायचं .
त्यात त्याच्या बहीणीची अविधवा नवमीची तिथी आणि आजोबांची तिथी कुठल्या तारखेला आहे त्याचा तपशील देऊन वर एक टिपणी
असायची. "पेन्शन तुमच्या नावावर असल्याने ही जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे."
त्यावर आज्जी पण एक पत्र लिहून टाकायची. "माझ्या पसार्‍यात मला तिथी सांभाळायचं काही जमायचं नाही पण अमावस्येला काय ते करीन."

******
सर्वपित्री अमावस्येला ती सोबतच्या दोन दाया आणि दोन वॉर्ड बॉइजना मेस मध्ये बोलवायची.त्यांच्या थाळ्या मागवायची.

एक्या-तुक्या सासरा आणि नवरा यांच्यासाठी.

सरल आणि निर्मला -दोन सवतींसाठी.

त्यांच्या समोर थाळ्या आल्या की त्यांना नमस्कार करायची.

एक्यातुक्याला विडीकाडीसाठी बारा आणे .बायांना लुगडी आणि बांगड्यांसाठी सात रुपये.

झाली तिथी पार पडली.

मग कधीतरी आई विचारायची "आई, अगं तुझ्या आईबाबांचं काय "
त्यावर आज्जीचं उत्तर ठरलेलं असायचं "अगं माझे आईबाप पुण्यात्मे !!!
ते बसलेत अमृताच्या वाट्या पित ते कशाला येतायत मेसमध्ये जेवायला

******
"तुझ्या बापाची गोष्ट वेगळेय.त्याचा जीव आहे ना माझ्यावर '"
हे म्हण्ता म्हण्ता तिचा आवाज चिरकायचा.
हा एकच दिवस असा की आज्जी रात्री जेवायची नाही.
रात्री एका ऐवजी दोन सतरंज्या घालायची .
एका सतरंजीवर पांढरी चादर घालायची. रंगीत धाबळी हांतरायची. उशाशी चांदीचा प्याला भरून दूध ठेवायची. .........
आणि रात्रभर जागीच असायची.
(आज्जी तेव्हा जेमतेम सत्तावीस वर्षाची असेल)

******

सबस्क्राईब करा

* indicates required